रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी २०१३-१४ साठी मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी भाडेवाढ टाळल्याचे भासवले असले तरी अन्नधान्य, शेंगदाणा तेल, कोळसा तसेच डिझेल, केरोसिन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या मालवाहतुकीच्या भाडय़ात साडेपाच ते आठ टक्क्य़ांपर्यंत वाढ केल्याने अन्नधान्याच्या किंमती तसेच इंधनाच्या किंमती कडाडणार असून वीजही महागणार आहे.
अन्नधान्य, कडधान्य आणि शेंगदाणा तेलाच्या मालवाहतुकीत सहा टक्के वाढ केली गेल्याने अन्नधान्याच्या किंमतीत वाढ होणार आहे. युरिया खतवाहतुकीच्या भाडय़ात ५.८ टक्के वाढ केल्याने खत सबसिडी विधेयकावरही परिणाम होणार आहे. धान्य आणि डाळींच्या मालवाहतुकीसाठी आता १३०७ किलोमीटरच्या टप्प्यामागे टनासाठी १,३२६ रुपये ८ पैशांऐवजी १,४०३ रुपये ६ पैसे मोजावे लागतील. शेंगदाणा तेलाच्या वाहतुकीसाठी ही वाढ १६५० किमीच्या अंतरासाठी टनामागे १,७४६ रुपये ६० पैशांवरून १,८४८ रुपयांवर गेली आहे. युरिया खतांच्या ८८६ किमी अंतर वाहतुकीकरिता सध्या टनामागे ८६९ रुपये ६० पैसे मोजावे लागत होते. आता त्यासाठी ९२० रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे यात अन्य पूरक सेवांसाठीचे शुल्क आणि गर्दीच्या मोसमासाठीचे अतिरिक्त शुल्क समाविष्ट नसल्याने खरी भाववाढ कमालीची झाल्याचा अंदाज आहे.
*  इंधनही कडाडले
डिझेल, केरोसिन आणि स्वयंपाकासाठीच्या गॅसच्या मालवाहतुकीत तब्बल ५.७९ टक्के वाढ झाल्याने या इंधनाच्या किंमतीही कडाडण्याची शक्यता आहे.  प्रत्येक टनामागे डिझेल वाहतुकीसाठी ९८४ रुपये ८० पैशांऐवजी १,०४१ रुपये ८० पैसे, केरोसिनसाठी ८८६ रुपये ३० पैशांऐवजी ९३७ रुपये ६० पैसे आणि एलपीजी अर्थात स्वयंपाकाच्या गॅससाठीही आता ९३७ रुपये ६० पैसे मोजावे लागणार आहेत. अन्य पूरक सेवांसाठीचे शुल्क आणि गर्दीच्या मोसमासाठीचे अतिरिक्त शुल्क समाविष्ट नसल्याने खरी भाववाढ आठ टक्क्य़ांवर जाण्याची शक्यता आहे. या भाववाढीने डिझेल, केरोसिन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किरकोळ बाजारातील विक्रीदरात किती वाढ होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
*  कोळसा पेटणार
कोळशाच्या मालवाहतूक दरात ५.७ टक्क्य़ांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे कोळसा क्षेत्रावर परिणाम होणार नसला तरी विजेचे दर मात्र वाढणार आहेत. या दरवाढीमुळे कोळशाच्या वाहतुकीसाठी दर टनामागे ६८५ रुपये १० पैशांऐवजी ७२४ रुपये ८० पैसे मोजावे लागतील. कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. नरसिंग राव यांनी सांगितले की, या मालवाहतुकीतील दरवाढीचा फटका कोळसा क्षेत्राला अथवा कोल इंडियाला बसणार नाही तर तो ऊर्जानिर्मिती कंपन्यांना सोसावा लागेल. त्यामुळे विजेचे दर मात्र वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते कोळसाचा वापर होणाऱ्या ऊर्जा, सिमेंट आणि पोलाद क्षेत्रात या दरवाढीमुळे भाववाढ अटळ आहे. वीजबिलात एक टक्का वाढ होईल, असा अंदाजही वर्तविला जात आहे.