मी बी.एस्सी (रसायनशास्त्र) अंतिम वर्षांला शिकत आहे. मी नोकरी करत बहि:शाल पद्धतीचे शिक्षण घेऊ शकतो का?

रोहित चव्हाण

तू नोकरी करून मुक्त विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम करू शकतोस.

 

मी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक आहे. मी राज्यशास्त्र विषयात तसेच इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या समाजशास्त्र विषयात बी.एड. केले आहे. भविष्यात सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी डीटीएड  अथवा इतर महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी एम.ए. करताना राज्यशास्त्र विषय निवडू की शिक्षणशास्त्र निवडू याबाबत मार्गदर्शन करावे.

वि. बि. पवार

तुम्हाला राज्यशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या विषयांपकी कोणत्या विषयात अधिक गती आणि आवड आहे यावर योग्य तो निर्णय घेता येईल. दोन्ही विषयांत पदव्युत्तर पदवी घेतल्यास दोन्हीकडे संधी मिळू शकते. तथापि, केवळ एम.ए. केल्यानेच प्राध्यापक होण्याची संधी मिळेल या भ्रमात राहू नये.

 

मी पुणे विद्यापीठातून बी.कॉम. केले आहे. सध्या ऑफिस असिस्टंट म्हणून कार्यरत आहे. मला माझे क्षेत्र बदलायचे असून अकाऊंट्समध्ये करिअर करायचे आहे. त्यासाठी पीजीडीबीएम आणि त्यानंतर सीआयएमए अभ्यासक्रम करायचा आहे. अकाऊंट्स क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मी दोन्ही अभ्यासक्रम करू की फक्त पीजीडीबीएम करू?

अनिरुद्ध चव्हाण

अकाऊंट्स क्षेत्रात यश मिळवण्यासाठी पीजीडीबीएम अभ्यासक्रम करण्याची गरज नाही. हा अभ्यासक्रम वित्त/ विपणन/ मनुष्यबळ विकास यांसारख्या क्षेत्रातील व्यवस्थापकीय कौशल्य निर्मितीसाठी असलेला अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम तुझ्या आवडीच्या क्षेत्राशी निगडित आहे. उत्तमरीत्या केलेले एम.कॉमसुद्धा तुला अकाऊंट्स क्षेत्रात यश मिळवून देऊ शकेल.

 

  मी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये बीई केले आहे. पण मला अद्याप नोकरी मिळालेली नाही. मी आता कोणता अभ्यासक्रम करू किंवा मला नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध होतील?

मंगेश मोरे

बीईचा अभ्यासक्रम करताना कुठेतरी कमी पडल्याने  नोकरी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुझ्या विषयातील ज्ञान हे अधिकाधिक परिपूर्ण कसे करता येतील हे बघावे. आता कोणताही अभ्यासक्रम केला की लगेच नोकरी मिळेल अशी स्थिती राहिलेली नाही. त्यामुळे इंग्रजीत बोलणे, लिहिणे, सादरीकरण आदींमध्ये कौशल्य मिळवायला हवे. एमटीएनएल, बीएसएनएल किंवा खासगी दूरसंचार क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. गेट परीक्षा उत्तीर्ण केल्यास सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन पुढे अध्यापनाच्या क्षेत्रातही जाता येईल. बँक किंवा राज्य अथवा संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन शासकीय नोकरीमध्ये येता येईल. सीडॅक या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन व्हीएलएसआय डिझाइन आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एम्बेडेड सिस्टिम डिझाइन हे करिअर घडवू शकतील असे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मात्र, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पदवी परीक्षेत ५५ टक्के गुण मिळणे अपेक्षित आहे.

संपर्क संकेतस्थळ- cdac.in

 

भूगोल विषयातून मी बी.ए.च्या अंतिम वर्षांची परीक्षा देत आहे.  राज्यसेवा परीक्षेसाठीही हा विषय अभ्यासत आहे. मला एम.ए. करायचे आहे. मला नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतील?

निकिता आयरे

राज्यसेवेच्या परीक्षेद्वारा शासनाच्या विविध प्रकारच्या वरिष्ठ पदांसाठी निवड होऊ शकते. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे केंद्र शासनाच्या वरिष्ठ पदांसाठीही निवड होऊ शकते. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेद्वारे तू केंद्र शासनाच्या दुय्यम श्रेणीच्या पदांसाठी पात्र ठरू शकतेस. बँकांच्या परीक्षा देऊन कारकून अथवा बँक प्रोबेशनरी ऑफिसरची संधी मिळू शकते. पोलीस उपनिरीक्षक तसेच विक्रीकर निरीक्षकांच्या पदासाठी होणाऱ्या परीक्षासुद्धा देता येतील. नेट/सेट करून ठेवल्यास अध्यापनाच्या क्षेत्रातही संधी मिळू शकेल.

मी फूड टेक्नॉलॉजीमध्ये शिकत आहे. मी उत्तीर्ण झाल्यावर लगेच नोकरी करू की उच्च शिक्षण घेणे उपयुक्त ठरेल? जर उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास कोणते घेऊ?

मनोज खेडकर

आजच्या स्पध्रेच्या युगात पदव्युत्तर पदवी किंवा उच्चस्तरीय अभ्यासक्रम करणे हे कधीही चांगले. तथापि, तुला उत्तम दर्जाची प्लेसमेंट आणि भरगच्च पगाराची नोकरी मिळाल्यास तीसुद्धा करायला हरकत नाही. पदवी अभ्यासक्रमात वेगवेगळे विषय शिकवले जातात. यापकी तुला सर्वाधिक कळलेला, गती असलेला विषय पदव्युत्तर पदवीसाठी निवडावा, असे वाटते.

 

मी कृषी अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांत शिकत आहे. पुढे मी डिझायिनगमध्ये काही करू शकतो का?

रोहित िहगे

तुला प्रॉडक्ट डिझायिनगचा अभ्यासक्रम करून कृषी क्षेत्रासाठी नव्या, उपयुक्त प्रभावी अशी शेतीची उपकरणे आणि अवजारे यांच्या डिझाइन करणे शक्य आहे.

 

माझी शैक्षणिक अर्हता बॅचलर ऑफ होम सायन्स इन न्युट्रिशन अ‍ॅण्ड डायटेशियनआहे. एमपीएससीद्वारे कोणते पद मिळू शकेल?

अंजली कातकडे

काही मोठी शासकीय रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांना न्युट्रिशनिस्ट व डायटेशियनिस्टची गरज भासते. ज्या शासकीय महाविद्यालयात हे विषय पदवी अथवा  पदव्युत्तर स्तरावर शिकवले जातात, त्या ठिकाणी अध्यापकांची पदे असतात. ही पदे बहुतेक वेळा एमपीएससीद्वारे भरली जातात. याशिवाय अधिकारी पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा तुला देता येतील.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.