*  मी बी.कॉमच्या द्वितीय वर्षांला आहे. पण मला शेफ बनायची इच्छा आहे. त्यासाठी मला शिक्षण घ्यायचे आहे. मला कुठे संधी मिळेल?

– किरण कारकूड, पुणे.

किरण तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट किंवा हॉटेल व हॉस्पिटॅलिटी अ‍ॅडमिनिस्टेशन या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवता येईल. या अभ्यासक्रमाद्वारे तुम्ही तुम्हाला इच्छा असलेल्या क्षेत्रात प्रवेश मिळवू शकाल. मुंबईतील दादर येथील इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेने दीड वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन आणि १२आठवडय़ांचा सर्टिफिकेट कोर्स इन कुकरी हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रमसुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. संपर्क – ँ३३स्र्://६६६. ्रँेू३ंल्ल.ी४ि/स्र्१ॠ१ंे हे अभ्यासक्रम केल्यानंतर तुम्हाला पंचतारांकित हॉटेल्स / उपाहार गृहे/मोठय़ा कॉर्पोरेट्समधील किचन आदी ठिकाणी संधी मिळू शकते. स्वत:चा व्यवसायही सुरू करू शकता.

*  मी बी.एस्सी बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतली आहे. एमपीएस्सीमार्फत रेंज फॉरेस्ट ऑफिसरसाठी घेण्यात येणारी परीक्षा देऊ  शकतो का ?

-विष्णू पाटील

तुम्ही जर गणित या विषयासह बायोटेक्नॉलॉजी या विषयातील पदवी घेतली असेल तर रेंज फॉरेस्ट ऑफिसर या परीक्षेसाठी पात्र ठरू शकता.

*  माझ्यासमोर करिअरसाठी ब्युटी पार्लर, पोलीस दल आणि शासकीय सेवा हे तीन पर्याय आहेत. मला ब्युटी पार्लर, पोलीस दल या दोन क्षेत्रांची आवड आहे. मी दोन्ही क्षेत्रांत एकाच वेळी करिअर बनवू शकते का?

-अश्विनी दिगोळे

अश्विनी तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की, ब्युटी पार्लर आणि पोलीस दल या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. त्यांच्यासाठी उमेदवारामध्ये लागणारे गुण आणि गुणवत्ता निरनिराळ्या आहेत. पोलीस दलात जाण्यासाठी पोलीस हवालदार /पोलीस निरीक्षक/ पोलीस उपअधीक्षक/पोलीस अधीक्षक या क्रमाने जावे लागेल. यासाठी वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा द्याव्या लागतात. त्या द्यायच्या तर पूर्ण लक्ष केंद्रित करून भरपूर अभ्यास करावा लागतो. पण तुम्हाला ब्युटी पार्लरचीही आवड असेल तर या क्षेत्रातही उत्तम करिअर करता येणे शक्य आहे. त्यासाठी चांगल्या संस्थेतील अभ्यासक्रम आधी पूर्ण करा. त्या क्षेत्रातील पूर्ण ज्ञान मिळवा. हे क्षेत्र सेवा क्षेत्र आहे. तुम्ही ग्राहकांना कोणत्या दर्जाची सेवा देता, यावर तुमचे करिअर अवलंबून असते.

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com