‘‘लवकर सगळी कागदपत्रं आणा, बँक स्टेटमेंट्स, फॉर्म १६, सगळ्या अवांतर उत्पन्नाचं स्पष्टीकरण.. फार वेळ नाही आपल्याकडे. सगळे जण शेवटपर्यंत थांबलात तर कसं होईल,’’ विद्या अतुलला सांगत होती. अतुलसारखे दोन-चार सोडल्यास बाकी सगळे कॉर्पोरेट क्लायंट होते. तो गेल्यावर तिने दुसऱ्या फायलीत डोकं घातलं इतक्यात हळदीकुंकवाचं बोलावणं करणारा दामलेकाकूंचा संदेश आला. पण पुढच्या सेकंदाला ती ते आमंत्रण विसरूनही गेली. तिला आज तीन तरी ग्राहकांच्या फाइल्स पूर्ण करायच्या होत्या.

विद्या नाशकात वाढली, शिकली, सी.ए. झाली. एका माहितीतल्या कुटुंबातल्याच मुलाशी, प्रसादशी रीतसर ‘बघून’ लग्न झालं. तोही सी.ए.च होता. तो ८-१० व्यावसायिकांसाठी काम करत असे, पण त्याची स्वत:ची व्यवसायाची जागा नव्हती. लग्नानंतर तो थोडं काम घरी घेऊन येऊ  लागला. विद्यानं त्याला घरून मदत करायला सुरुवात केली. दरम्यान, त्यांना आशय आणि केतकी ही दोन मुलं झाली. व्यवसायाचा पसारा वाढल्यावर त्यांनी एक जुना मोठ्ठा बंगला विकत घेतला, खालच्या मजल्यावर ऑफिस आणि वर घर होतं. त्यांच्याकडे येणारे ग्राहकही वाढले. हाताखाली १२-१५ मदतनीस आले. प्रसाद बाहेर फिरतीची कामं करायचा, तर विद्या कचेरी सांभाळत असे. आशय आठवीत आणि केतकी सहावीत होती.

वर्षांअखेर जवळ आली होती. अनेक ग्राहकांचे आयटी रिटर्न्‍सचे काम करायचे होते. सर्व कर्मचारीही गेला महिनाभर उशिरा बसून काम करत होते. प्रचंड ताणाचा एक तवंगच साचून राहिला होता जणू. विद्या कामात पूर्ण बुडालेली होती. एक फाइल संपवून तिनं दुसरीत लक्ष घातलं होतं. कर्मचाऱ्यांना उरलेल्या आठवडय़ाची कामं वाटून दिली होती. जे ती नंतर रोज तपासत असे. अचानक रामू, त्यांचा गडी आला. ‘‘आईनी आत्ताच बोलावलं आहे.’’ विद्याच्या मनात विचार धावू लागले. मुलांचे संध्याकाळचे खाणे तर तिने सकाळीच ठरवले होते. भाज्या चिरायला, निवडायला, पोळ्यांना बाई होत्या. त्यांच्यासाठीही संध्याकाळची कामे तिने लिहून ठेवली होती. आता काय?

‘‘काय झालं, काही महत्त्वाचं आहे का?’’

‘‘लगेच येऊन जायला सांगितलंय,’’ रामूनं निर्विकार चेहेऱ्याने सांगितले.

विद्या हातातले काम तसेच टाकून वर सासूबाईंच्या खोलीत शिरली. ‘‘काय झालं आई?’’

‘‘बरं झालं आलीस. मी काय म्हणते, आज संध्याकाळी आभा येणार आहे तेव्हा सुरळीच्या पाटवडय़ा केल्या तर कसं होईल? छान बेत बनेल बघ.’’

विद्याला हा प्रकार नवा नव्हता. सुरुवातीच्या काळात ती हे सगळं सांभाळायचीच. लग्नही नवं होतं आणि कामाची तशी सुरुवातच होती. त्यामुळे घरचं सगळं रीतसर करायला वेळ मिळायचा. सुरुवातीला विद्या जेव्हा घरूनच थोडं काम बघायची, तेव्हाही काम सुरु असले तरी सासूबाई लहानसहान गोष्टींसाठी तिच्याकडे यायच्या. उदा. केसाला तेल लावून दे, आज आमटीत मीठ थोडं जास्त पडलं होतं का गं,  रामू कुठे गेला.आला नाही अजून.. तिच्या कामात मग दिवसभर व्यत्यय येत राहायचे. खूप राग यायचा तिला. कालांतरानं त्यांनी व्यवसाय सुरू केला. काम वाढले, कर्मचारी वर्ग वाढला, एकंदरच सगळा पसारा वाढला. प्रसाद बाहेरची कामं तर विद्या कचेरीतली कामे पाहायची. तिची तारेवरची कसरतच होती. मुले मोठी होती पण अजून हातावेगळी नव्हती. त्यामुळं कचेरीची सगळी जबाबदारी पेलत घरच्या जबाबदाऱ्याही विद्यावर होत्या. वरकड मदतीला बायका आल्या पण स्व यंपाक मात्र विद्या स्वत:च करत असे. मुलांचे डबे, संध्याकाळचा नाश्ता आणि मदतनीस बायकांना कामाची यादी दिल्यावर मगच ती खाली कचेरीत येत असे. कामाचा व्याप वाढल्यावर घरातले स्वयंपाकाचे चोचले, जेवणावळी, सततचे कार्यक्रम कमी झाले होते. सगळे बदलले, बदलला नाही तो फक्त सासूबाईंचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन! तिच्या वाढत्या जबाबदाऱ्यांची त्यांनी कधीच फारशी दखल घेतली नाही. घराखालीच कचेरी आल्यावर विद्याला अपेक्षा होती, आता तरी जरा सुटका होईल. कामात नीट लक्ष देता येईल. पण आपले काय चालले आहे, कोणत्या पातळीवरचे काम आपण करत आहोत, त्यात काय ताण आहेत? वेळेची कोणती बंधने आहेत, हे सासूबाईंनी कधीच मनाला लावून घेतले नाही. त्यांच्यासाठी विद्या कायमच हाताशी असलेली गृहिणीच राहिली. घर आणि स्वयंपाकाच्या विश्वापुरती मर्यादित.

आताही विद्याची वर्षांअखेरीची कामाची घाई विसरून त्या स्वत:ची मुलगी आल्यावर खायला काय करावे, यातच अडकलेल्या होत्या. पण आता त्याची थोडी सवय झाली होती. तिने शांतपणे म्हटलं, ‘‘छान सुचलं की तुम्हाला. सांगते रमाला तयारी करून ठेवायला.’’ आणि ती आल्या पावली परत निघाली. ‘‘अगं निघालीस काय लगेच. घरात बाकी सामान आहे का? जरा घरात पण लक्ष देत जा. माझा प्रसाद आहे ते कामाचं सगळं बघायला.’’

हे ही नवं नव्हतं. मी ऑफिसच्या कामाचा कितीही भार उचलला तरी ते प्रसादचं ऑफिस आणि मी त्यात फावल्या वेळात वरकड कामं करणारी!

‘‘हो पाहते हां,’’ म्हणत तिनं सवयीनं पाय काढला आणि ती परत कचेरीत दाखल झाली.

लग्न नवं असताना तिचे आणि प्रसादचे खूप वाद व्हायचे. प्रसादने आईला समजवावं अशी तिची अपेक्षा असायची.

तो म्हणत असे, ‘‘काय समजावू मी तिला? तिचे आयुष्य, तिचा अनुभव आणि तिचं जग केवळ स्वयंपाकापुरते आहे. तुझे शिक्षण, कर्तबगारी, करिअर हे सगळे तिला कसे कळणार?’’

प्रसाद मुळचा स्वभावानं अतिशय चांगला आहे, त्याला आपली किंमत आहे, या विचाराने तीही याकडे दुर्लक्ष करायला शिकली. पण आज अचानक रागाची एक सणक तिच्या डोक्यात येऊन गेली. ती सवयीने दाबत तिने कामात लक्ष घातले.

ठरवल्याप्रमाणे संध्याकाळपर्यंत तिने तीन फायली पूर्ण केल्या. एवढय़ा वेळात ‘कधी येणार’ विचारायला रामू दोन वेळा येऊन गेला होताच. त्याला ‘येतेच आहे’ म्हणून टोलावलं. काम झाल्यावर घरी यायला तिला आठ वाजले. आभा आणि सासूबाईंच्या गप्पा रंगल्या होत्या. ‘‘किती उशीर गं? पाटवडय़ांचं सगळं सामान काढून ठेवलंय बघ रमाने.’’ आंघोळ करून विद्या कामाला लागली. डोकं ठणकत असतानाही तिने मंदसं हसत सगळं केलं. वरवरच्या छान गप्पा मारत तो कार्यक्रम पार पाडला. प्रसाद थोडय़ा वेळेत आला आणि त्यानं गप्पांचा ताबा घेतल्यानं तिची थोडी सुटका झाली. कधी एकदा संपतोय हा दिवस असं तिला वाटत राहिलं.

रात्रीची झाकपाक झाल्यावर विद्याने पाठ टेकली आणि ती रडायला लागली.

‘‘काय झालं विद्या?’’ प्रसादनं तिला थोपटत विचारलं.

थोडय़ा वेळानं रडू आवरल्यावर तिच्या तोंडून शब्द फुटले ‘‘काय व्हायचंय? नेहमीचंच.’’

‘‘आई काही तरी बोलली असेल?’’

‘‘प्रसाद तुला माहीत आहे, त्या अपमान होण्यासारखं काही बोलत नाहीत, तरी अपमान होतो!’’

‘‘तुला गृहीत धरतेय ना ती?’’

‘‘एवढं कळतं पण करत काहीच नाहीस तू,’’ तिचे डोळे परत वाहू लागले.

‘‘आपण या विषयावर अनेकदा बोललो आहोत. मला कळते तू माझ्या बरोबरीनं ऑफिसचं काम करतेस, तुलाही ताण आहेत. घराच्या जबाबदाऱ्याही आहेत. खूप दमछाक होतेय तुझी. आईची समजण्याची कुवतच सुमार असली तर त्याला मी तरी काय करू शकतो?’’

‘‘प्रसाद, खरंच तुला वाटतं मी तुझ्या बरोबरीनं कामं करते?’’

‘‘तुला आता माझ्यावर शंका येते आहे का?’’

‘‘खरंच येते आहे. मला आता कळून चुकलं आहे की मला आईंपेक्षा तुझा जास्त राग येतो आहे. मला सांग, आपण दोघं काम करून थकून घरी येतो, त्यानंतर आई मला जेव्हा एक ‘टिपिकल’ गृहिणी असल्यासारखं काही तरी करायला सांगतात, तेव्हा एकदा तरी तू त्यांना अडवलं आहेस का? सांगितलं आहेस ‘ती दमली आहे’ म्हणून? किंवा ‘मी करतो’ म्हणून. का सोईस्करपणे गप्प राहतोस तू?’’

प्रसाद काहीच बोलला नाही.

‘‘प्रसाद तुझं गप्प राहणं पण या सगळ्याला खतपाणी घालण्यासारखंच आहे. मीही सी.ए. आहे, तुझ्या बरोबरीनं ऑफिसची जबाबदारी सांभाळते आहे. वर घरचंही पाहते आहे. केवळ ऑफिस घराखाली आहे आणि मला कधीही हाक मारता येते, म्हणून आईंना माझ्या जबाबदाऱ्या कळत नाहीत असं आहे का? का कळून घ्यायच्या नाहीत? हेच जर मी ९ ते ५ वाली एखादी सर्वसाधारण नोकरी करत असते, दहा तास घरापासून लांब असते, तर मग हे असं गृहीत धरणं शक्य तरी झालं असतं का? अशी करिअर या बायकांना बरी कळते?’’

‘‘खरं आहे. पण मग काय करायचं?’’

‘‘नुसती आईंची ‘कुवत नाही’ असं म्हणून चालणार नाही प्रसाद. आपण काय वेगळं करू शकतो ज्यामुळे त्यांना कळेल की आपली सूनही मुलाइतकीच जबाबदारी वाहते आहे. घरकामाव्यतिरिक्त तिच्या इतरही जबाबदाऱ्या आहेत?’’

‘‘आपण वेगळं ऑफिस घेऊ ? घर आणि ऑफिस वेगळे झाल्यावर बऱ्याच अडचणी कमी होतील.’’

‘‘खरं आहे. पण ते मुलं थोडी मोठी झाल्यावर जास्त योग्य नाही का? आत्ता त्यांच्या वयाला घर जवळ असणं किती सोयीचं आहे.’’

‘‘ते ही खरं. आपण असं करू या का? तू थोडी फिरतीची कामं सुरू कर, मी थोडं ऑफिसचं काम पाहतो. हाऊ  इज दॅट?’’

‘‘प्रसाद, आता कसं कळू लागलं बघ तुला? पण त्यात एक धोका आहे!’’

‘‘कसला?’’

‘‘आईनं काही लागलं-सवरलं तर तुला पाहावं लागेल.’’ विद्या खटय़ाळपणे म्हणाली.

‘‘पाहीन ना. त्यानं तुझ्या कामाचे गांभीर्य आईला कळणार असेल, तर सुरळीच्या पाटवडय़ांचंही पाहीन.’’

पुढचा काही वेळ मग दोघंही हसत राहिली.

मिलिंद पळसुले – palsule.milind@gmail.com