केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयातर्फे शारीरिकदृष्टय़ा दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या विशेष शैक्षणिक शिष्यवृत्तींसाठी खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत.
उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या व तपशील– योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्तींची संख्या २० असून त्यापैकी ६ शिष्यवृत्ती महिला विद्यार्थी उमेदवारांसाठी राखीव आहेत.
शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत उपलब्ध विषय : शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विदेशातील विद्यापीठ अथवा शैक्षणिक संशोधनपर संस्थांमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, कृषी विज्ञान, वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र- वाणिज्य, ह्य़ुमॅनिटीज, समाज विज्ञान व फाइन आर्ट यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
आवश्यक पात्रता- अर्जदारांनी त्यांच्या संबंधित विषयातील पदवी वा पदव्युत्तर पात्रता परीक्षा कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचे वय ३५ वर्षांहून अधिक नसावे. याशिवाय अर्जदारांच्या शारीरिक व्यंगाचे प्रमाण ४०% असावे व त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांहून अधिक नसावे.
शिष्यवृत्तीचा तपशील : योजनेअंतर्गत निवड झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना वार्षिक ९९०० ब्रिटिश पाऊंड अथवा १५,४०० अमेरिकी डॉलर्सची शैक्षणिक शिष्यवृत्ती त्यांच्या शैक्षणिक संशोधन कालावधीसाठी देण्यात येईल. याशिवाय त्यांना शैक्षणिक शुल्क, प्रवास खर्च इ.ही देय असेल.
अधिक माहिती व तपशील- या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाच्या दूरध्वनी क्र. ०११- २४३६९०५१ वर संपर्क साधावा अथवा मंत्रालयाच्या http://www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अंडर सेक्रेटरी (स्कॉलरशिप्स), डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसअ‍ॅबिलिटीज, रूम नं. ५१६,
५ वा मजला, पर्यावरण भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३३
या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०१६ आहे.