उमेदवाराने सादर केलेला ‘बायोडेटा’ हा एका अर्थाने मुलाखतीचा अभ्यासक्रम मानला जातो. मुलाखतीची दिशा ठरते ती बायोडेटाद्वारे सादर केलेल्या वैयक्तिक माहितीच्या आधारे. सर्वसाधारणपणे ६०% ते ७०% प्रश्न उमेदवाराच्या वैयक्तिक माहितीच्या आधारावर विचारले जातात. मुलाखतीत वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक पात्रता याला खूप महत्त्व आहे.

ऑनलाइन प्रोफाइलमधील उमेदवाराचे नाव, गाव या व्यक्तिगत माहितीचे पहिले पान वगळून उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, पदांचा पसंतीक्रम, छंद, विशेष प्रावीण्याचे विषय, कामाचा अनुभव अशी सर्व माहिती मुलाखत मंडळा समोर असते. या माहितीच्या आधारावर मुलाखत सुरू होते.

मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांनी आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीतच संबंधित परीक्षेमधून भरावयाचा पदांचा पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने देणे आवश्यक असते. नाहीतर अधिसूचनेत नमूद केलेल्या पदक्रमांकानुसारच उमेदवाराचा पसंतीक्रम आहे, असे समजण्यात येते. पदांचा पसंतीक्रम आयोगास सादर केल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यासंबंधीच्या विनंतीचा विचार केला जात नाही. आयोगाने जाहिरातीत प्रसिद्ध केलेली व पदांची क्रमवार यादी हीच बहुतेक उमेदवारांचा पसंतीक्रम असतो. मात्र पदांचा पसंतीक्रम निश्चित करताना व्यवस्थित अभ्यास करावा या संदर्भात काही यशस्वी उमेदवारांचा सल्ला जरूर घ्यावा.

मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता अधिसूचनेतील अर्हता, अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्रांच्या आधारे तपासली जाते. अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्रे सादर करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाते. आवश्यक कागदपत्रे सादर करू न शकणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जात नाही, त्याची उमेदवारी रद्द केली जाते.

मुलाखतीच्या तीन चार दिवस आधीच सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरेशा प्रमाणात त्यांच्या सत्यप्रती, प्रती आणि फोटो इ. जमा करून घ्यावेत. क्रमश १०वी, १२वी प्रमाणपत्रे, पदविका (असल्यास), पदवी, पदव्युत्तर पदवी (असल्यास), डॉक्टरेट (असल्यास) इ. गुणपत्रक व प्रमाणपत्रे, मिळालेले पुरस्कार, सन्मानपत्रे आधीच्या नोकरी संदर्भातील प्रमाणपत्रे, आधीच्या सेवेतील निवड व त्यासेवेशी संबंधित कागदपत्रे अशी कागदपत्रे फाइलमध्ये लावून घ्यावीत, फाइल शक्यतो प्लास्टिकचे आवरण असलेली, पारदर्शक असावी. जेणे करून वजनाने हलकी आणि सुटसुटीत होईल.

वैयक्तिक माहिती, कौटुंबिक माहिती, छंद, शैक्षणिक माहिती, विशेष प्रावीण्याचे विषय (Extra Curricular activities) वैकल्पिक विषय, असल्यास कामाचा पूर्वानुभव, इत्यादी बाबत संक्षिप्त पण परिपूर्ण माहिती लिहावी. मुख्य परीक्षेच्या अर्जातील माहिती व बायोडेटामध्ये फरक असता कामा नये. तेव्हा त्याची प्रत समोर ठेवूनच बायोडेटा तयार करावा. एसएसी प्रमाणपत्रात नमूद असेल तेच नाव स्पेलिंगमध्ये फरक न करता लिहावे.

शैक्षणिक माहिती

तुमचे पदवी परीक्षेतील विषय, त्या विषयाशी संबंधित काही पुस्तके, लेखक, या विषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुमच्या पदवी विषयांच्या संदर्भाने चालू घडामोडींवर प्रश्न विचारून तुमचे ज्ञान किती अद्ययावत आहे हे तपासले जाऊ शकते. तुमच्या पदवी/पदव्युत्तर विषयाचे ज्ञान प्रशासकीय सेवेत किती आणि कसे उपयुक्त आहे याविषयी विचारले जाऊ शकते.

सुरुवातीच्या प्रश्नांत पदवीसाठी हीच शाखा का निवडली? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा प्रश्नाचे उत्तर देताना अनावश्यक तर्क मांडण्यापेक्षा, मला या विषयात रस असल्याने मी ते निवडले असे साधे आणि सरळ उत्तर असावे. दोन परीक्षांमध्ये अंतर असेल तर त्याबाबत तुम्हाला विचारले जाऊ शकते अशा वेळी सत्य माहितीच द्यावी.  उमेदवारासंदर्भाची सर्व माहिती मुलाखत मंडळासमोर असते. त्यावरून उमेदवाराविषयी एक मत तयार केलेले असते. त्यामुळे सामान्यपणे मुलाखतीची सुरुवात ही बायोडेटावरील माहितीवर आधारित प्रश्नांतूनच होते.

मुलाखत तयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून उमेदवारांनी आपल्या बायोडेटावर आधारित प्रश्न तयार करावेत. त्यांची तयारी करावी. वैयक्तिक माहितीवर आधारित प्रश्नांची स्पष्ट व वस्तुनिष्ठ उत्तरे द्यावीत. त्यात संदिग्धता असू नये. मुलाखत मंडळ तुमचा प्रामाणिकपणा, पारदर्शकता व स्पष्टपणा तपासत असते. बायोडेटात लिहिलेली माहिती व तुमच्या उत्तरांतील वस्तुनिष्ठ माहिती यांत फरक असता कामा नये. ही गफलत तुमच्याविषयी नकारात्मक मत बनवू शकते, म्हणूनच बायोडेटाचा अभ्यास महत्त्वाचा.