विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेखांत आपण सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या तीनही पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षांसाठी समान असणाऱ्या घटकांपकी मराठी, इंग्रजी, चालू घडामोडी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन या विषयांचा अभ्यास कसा करायचा, ते पाहिले. आज आपण पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निर्माण केल्या गेलेल्या वेगळ्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाची तयारी कशी करावी हे पाहू या.

अभ्यासक्रम व अभ्यासस्रोत

१) मानवी हक्क व जबाबदाऱ्या – संकल्पना, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या, यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक- सांस्कृतिक- धार्मिक प्रथा यांसारख्या अडचणी, (िहसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३, कौटुंबिक िहसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.

या घटकावर जवळपास २० प्रश्न विचारले जातात. यामध्ये कायदा, कायद्यातील व्याख्या, व्याखेत समाविष्ट शब्दांचे निश्चित अर्थ, कायद्याचे उल्लंघन होण्याचे प्रकार आणि त्यासाठी शिक्षेची तरतूद, नागरिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या; त्यांची उदाहरणे, भारतीय राज्यघटनेतील कलमे व त्यांचे विषय, कायद्यास मान्यता मिळालेल्या तारखा, कायद्याची अंमलबजावणी, विविध मानवी हक्क आणि त्यांच्या केलेल्या व्याख्या यांचा समावेश होतो. यासाठी मानवी हक्क हे गणेश हाके यांचे पुस्तक आणि जुन्या प्रश्नपत्रिकांची योग्य सांगड घातल्यास या विभागात अधिकाधिक गुण मिळविणे सुकर बनू शकते.

२) मुंबई पोलीस कायदा – या घटकावर साधारणपणे १० ते १२ प्रश्नांचा समावेश होतो. यामध्ये कायद्यातील प्रकरणे, त्यातील गुन्हा व शिक्षेसंबंधी तरतूद, तडीपारीच्या आदेशासाठीच्या तरतुदी आणि अधिकार, त्यातील अपवाद, पोलिसांची कर्तव्ये आणि अधिकार, महत्त्वाची कलमे आणि त्यांचे विषय, पोलीस नियंत्रण आणि त्यासाठी असणाऱ्या संस्थात्मक तरतुदी या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर आधारित प्रश्नांचा समावेश असतो.

३) भारतीय दंड संहिता – या घटकावर साधारणपणे ३ ते ४ प्रश्नांचा समावेश असतो. यामध्ये भारतीय दंड संहितेत समाविष्ट गुन्हे आणि त्यासाठी असणाऱ्या शिक्षा आणि अपवाद यासंबंधित कलमे आणि तरतुदीसंबंधित महत्त्वाच्या घटकांवरील प्रश्नांचा समावेश होतो.

४) फौजदारी प्रक्रिया संहिता – १९७३ – या घटकावर साधारणपणे ८ ते १० प्रश्नांचा समावेश असतो. यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेतील विविध कलमे, आरोपीच्या वैद्यकीय तपासण्या आणि त्या संदर्भातील पोलिसांचे अधिकार, प्रथम माहिती अहवाल तयार करण्याच्या तरतुदी, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्ये व अधिकार, गुन्हेगारांना अटक करण्याचे अधिकार आणि संबंधित तरतुदींची कलमे या महत्त्वाच्या घटकांवरील प्रश्नांचा समावेश होतो.

५) भारतीय पुरावा कायदा  (Indian Evidence Act.) – या घटकावर साधारणपणे ३ ते ४ प्रश्नांचा समावेश असतो. यामध्ये कायद्याचे अंमलबजावणी क्षेत्र, महत्त्वाची कलमे आणि त्यातील तरतुदी; त्यानुसार करावयाची कारवाई अशा घटकांवर आधारित महत्त्वाच्या घटकांवरील प्रश्नांचा समावेश होतो.

अभ्यासस्रोत – वरील २ ते ५ क्रमांकाच्या घटकांसाठी प्रश्नपत्रिकांचे योग्य विश्लेषण आणि त्यानुसार या सर्व कायद्यांच्या मूळ प्रतींमधील तुमच्या स्वतच्या नोट्स किंवा संपूर्ण फौजदारी कायदे हे पुस्तक अभ्यासावे.

विद्यार्थी मित्रांनो, पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास नेमका कसा आणि कशाच्या आधारे करायचा याची चर्चा तर आपण केलीच आहे. मुख्य परीक्षा आता अगदीच तोंडावर येऊन ठेपली आहे. तर परीक्षेला सामोरे जाताना शेवटच्या घटकेतील उजळणी आणि तीही अभ्यासक्रम आणि जुन्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या आधारे केल्यास त्याचा पेपर सोडविताना नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर अंकगणित आणि बुद्धिमापन या घटकाचा अधिकाधिक सराव करून प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या तंत्रावर भर द्या. तसेच क्षुल्लक चुका कमीत कमी होतील याकडे आवर्जून लक्ष द्या. पुढील लेखामध्ये आपण सहायक कक्ष अधिकारी या पदासाठी घेतल्या जाणाऱ्या वेगळ्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाची माहिती घेऊ या.