‘‘किती चडफडताय अण्णा? तुम्ही मुकुलचे कान ओढा खुशाल. पण मुकुलचं जगही बघा. शिक्षण म्हणजे तुमच्या दृष्टीने फक्त शाळा-कॉलेजातलं शिक्षण होतं. मुकुल दिवसभरात याखेरीजही असंख्य गोष्टी शिकतो. अगदी आपल्या कॉलनीतल्या गॅदरिंगमधल्या नाचापासून कराटेपर्यंत. प्रत्येक गोष्ट शिकण्याची मागणी वेगळी, गुरू वेगळा. हात उंच करून, काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने कोरून कोरून लिहिणारे ते मास्तर एवढीच कल्पना नाहीये त्यांची.’’..
‘‘आज मात्र तुझ्या पोरापुढे हात टेकले रे. त्याला त्याच्या सरांचं नाव माहिती नव्हतं. कल्पना कर. विद्यार्थ्यांला गुरूचं नाव माहिती नाही? आमच्या वेळी आमच्या गुरुजींना शाळेतल्या प्रत्येक मुलाचं पूर्ण नाव माहिती असायचं. नुसतं नाव नाही, पूर्ण नाव. आणि हा दीडशहाणा..’’
अण्णा संतापून बोलत होते. एरवी बहुधा शांत असणाऱ्या अण्णांना आज संताप आवरत नव्हता. त्यांची रसरसती कानशिलं, त्यांचा चढलेला आवाज, कापणारे  हात बघून त्यांना अगोदर शांत करण्याची गरज आहे हे ओळखून त्यांचा मुलगा, श्रीकांत  ‘‘बघतो, सांगतो त्याला..’’ वगैरे म्हणायला लागला. त्याने ते आणखीनच उसळले. खेकसले. ‘‘बघतोस काय नुसता? चांगला सरळ कर त्याला. गुरूंविषयी एवढा अनादर? काय होणार पुढे आयुष्यात या पिढीचं?’’
‘‘अर्धवट वय आहे अण्णा. सगळ्या जगात आपणच शहाणं असं वाटतं ना या वयात. त्यापुढे कुठले पालक अन् कुठले शिक्षक..’’ ‘‘म्हणजे तू त्याचंच समर्थन करणार म्हण की! मी डोळ्यांनी पाहिला आहे त्याचा  सगळा उर्मटपणा. बँकेमध्ये आमच्या रांगेतच मागे उभे होते ना त्याचे सर..’’
झालं असं होतं की आज अण्णांना पेन्शनसाठीचं लाइफ सर्टिफिकेट द्यायला स्वत: बँकेमध्ये जावं लागलं होतं. त्यांच्यासोबत जायला मुला-सुनेला वेळ नव्हता म्हणून त्यांनी नातवाला हाताशी धरलं होतं. नेमके हे दोघं बँकेत असताना नातवाच्या शाळेतले एक शिक्षक आपल्या संस्थेच्या ‘फी’च्या खात्याबाबतच्या काही कामासाठी बँकेत आले होते. पण त्यांना कामात मदत करणं, त्यांच्या प्रती आदर दाखवणं या फंदात न पडता चिरंजीव मुकुल खुश्शाल कोचामध्ये लोळत पडलेला होता. स्वत: उठून सरांना बसायला जागा करून देण्याएवढं सौजन्यही त्यानं दाखवलं नव्हतं. घरी येताना अण्णांनी त्यावरून त्याला टोकलं. तेव्हाही उडवाउडवीची उत्तरं त्यानं दिली होती आणि ‘लवकर घरी’ पोहोचू या, माझी डान्सची प्रॅक्टिस आहे, संध्याकाळी टेनिस आहे, असा धोसरा लावला होता. अण्णांना ते इतकं लागलं होतं की त्या आठवणीनेही ते खवळून उठले.
‘‘आमच्या वयाच्या चाळिशी-पन्नाशीतसुद्धा आम्ही आमच्या जुन्या शिक्षकांना भेटायला किती धडपडायचो. भेटलो की किती आदराने त्यांना वागवायचो. इथे बघावं तर आनंदच आहे सगळ्याचा.’’
‘‘त्याची फारशी ओळख नसेल त्या सरांशी.’’
‘‘का? शाळेत नियमित जातो ना तो?’’
‘‘सध्याच्या शाळेत काही हजार मुलं असतात अण्णा. तेवढय़ांना हाकायला शंभरदीडशे शिक्षक असतील. तेही विषयवार. इयत्तावार वेगवेगळे वगैरे.’’
‘‘मग?’’
‘‘मग काही नाही. तुमच्या वेळेला जसा एकच एक शिक्षक शालेय जीवनात वारंवार तुमच्यासमोर येत होता तसं नसेल होत. त्यामुळे तेवढा सहवास, तेवढा घट्ट लागाबांधा नसेल होत मुलांकडून.’’
‘‘आम्हाला पहिली ते चौथीपर्यंत वर्षभर एकच शिक्षक असायचे अरे. सगळ्या विषयांचा अभ्यास त्यांनीच करून घ्यायचा. फक्त व्यायामाचे सर वेगळे. तेव्हाच्या भाषेत गुरुजी.’’
‘‘आता बहुतेक मुलांसमोर दर तासाला वेगवेगळे शिक्षक येतात अण्णा. येतात, धडाधडा आपापला विषय घेतात आणि जातात.’’
‘‘मग काय बिघडलं?’’
‘‘बिघडलं काही नाही. बदललंय म्हणून सांगितलं. एकेका वर्गात ७०-८० मुलं असू शकतात आता. कोणी कोणी कोणाकोणाला लक्षात ठेवायचं?’’
‘‘हे मुलांबाबत ठीक आहे एकवेळ. पण गुरू तो गुरूच ना? वर्गात दहा विद्यार्थ्यांसमोर येवो नाहीतर..’’
‘‘टय़ूशन क्लासमध्ये येवो.’’
‘‘मध्येच फाटे फोडू नकोस रे.’’
‘‘मुकुलच्या शाळेतले आयएमपी विषयांचे सर म्हणजे गणित, सायन्स, कॉम्प्युटर वगैरे हो, अनेकदा टय़ूशन्स घेतात. जी मुलं त्यांच्या खासगी शिकवण्या लावतात त्यांच्याकडे त्यांचं साहजिकपणे जास्त लक्ष जातं. गेल्या वर्षी तर मोठा प्रवाद उठला होता त्यांच्या शाळेत. एका सरांनी प्रायव्हेट टय़ूशनच्या विद्यार्थ्यांना गणिताचा पेपर परीक्षेआधीच चार दिवस मिळवून दिला म्हणून.’’
‘‘ते सोड रे? जगरहाटी आहे. गैरगोष्टी होणारच. पेपरवाले त्या चघळणारच. मुकुलचा त्याच्याशी काही संबंध नव्हता ना?’’
‘‘थेट नव्हता. पण हे सगळं मुलांच्या कानावरून, डोळ्याखालून जात असतंच ना अण्णा? कुठेतरी काहीतरी परिणाम होणारच याचा.’’
‘ते सर बघून तरी चांगले वाटले.’’
‘‘वास्तवातपण चांगले असतील.  मी त्यांच्याबद्दल कुठे बोलतोय? एकूण शालेय शिक्षणाचं जग बदललंय एवढंच सांगत होतो मी.’’
‘‘मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. माझ्या नातवामध्ये एवढी अगदी बेसिक मूल्य नसावीत हे मला सहन होत नाही. गुरुब्र्रह्मा असं शिकलेला, आई-बापाइतकाच गुरूला मानणारा माणूस आहे मी.’’
‘‘आता असं शिकवलेलं मानण्याचा जमाना कुठे राहिला अण्णा? माणसं प्रत्येक गोष्ट आजमावताहेत. डोळसपणे बघताहेत.’’
‘‘डोळसपणा म्हणजे उद्धटपणा का रे तुझ्या भाषेत?’’
‘‘किती चडफडताय अण्णा? तुम्ही मुकुलचे कान ओढा खुशाल. तो हक्कच आहे तुमचा. पण मुकुलचं जगही बघा. शिक्षण म्हणजे तुमच्या दृष्टीने फक्त शाळा-कॉलेजातलं शिक्षण होतं. मास्तर म्हणजे क्रमिक विषय शिकवणारे लोक. बरोबर? मुकुल दिवसभरात याखेरीजही असंख्य गोष्टी शिकतो. अगदी आपल्या कॉलनीतल्या गॅदरिंगमधल्या नाचापासून कराटेपर्यंत. प्रत्येक गोष्ट शिकण्याची मागणी वेगळी, गुरू वेगळा, तरी अजून ई-लर्निग व्हच्र्युअल क्लासरूम इथवर पोहोचला नाहीये पठ्ठय़ा. हात उंच करून, काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने कोरून कोरून लिहिणारे ते मास्तर एवढीच कल्पना नाहीये त्यांची.’’
‘‘याचा आदराशी संबंध नाही.’’
‘‘निवडीशी तर आहे? तुलनेशी तर आहे? मुलंसुद्धा जोखतात अण्णा. जीव तोडून शिकवणाऱ्यावर जीव लावतात.’’
‘‘मुकुलमहाराजांनी कोणावर एवढा अनुग्रह केलाय?’’
‘‘सध्या कॉलनीच्या गॅदरिंगची कोरिओग्राफी करणारा बन्सल त्याचा हीरो आहे. आणि टेनिसचे कोच म्हणजे तर..’’
‘‘तो छपरी.. पोरगेलासा सॅम्युअल. तो सर त्याचा?’’
‘‘सॅम्युअलसरांच्या शब्दाशब्दावर जीव टाकतो कार्टा. घरी इकडची काडी तिकडे करणार नाही. तिकडे कोर्ट झाडायचीही तयारी. सॅम्युअलसर सांगतील तो आहार, नेमतील तो व्यायाम. ही गुरुभक्ती नाही तर काय आहे अण्णा?’’
‘‘जाऊ देत. आम्ही अडाणी आहोत. आम्हाला समजत नाही.’’अण्णांनी वादातून काढता पाय घेतला. फारच वैतागले की गॅलरीत जाऊन झपाझपा येऱ्याझाऱ्या घालायची सवय होती त्यांची. गॅलरीची कडी उघडून बाहेर जाऊन बघतात तो काय? फाटकाजवळ एक रिक्षा उभी होती. तिच्यातून सॅम्युअलसर मुकुलच्या खांद्याला धरून धरून कष्टाने बाहेर येत होते. मुकुल त्यांना अलगद बाहेर काढत होता. एका हातात त्यांची बॅग धरून. दुसऱ्या हातात त्यांच्या एका पायातला बूट धरून. सरांचा पाय जायबंदी असावा. ते विव्हळत होते. मुकुल तिथूनच हाकारा करत होता, ‘‘पप्पा, लवकर खाली या. क्विक पप्पा. सरांना दवाखान्यात न्यायला पाहिजे. वॉचमन, सरांना बसायला खुर्ची आण लवकर. पप्पा, खाली येताना काहीतरी सॉफ्टड्रिंक आणता का सरांसाठी? नसलं तर राहू देत. तुम्ही फास्ट या. अण्णा, पप्पा कुठे आहेत सगळे?’’
मुकुलची धडपड समोर स्वच्छ दिसत होती आणि अण्णांना स्वत:लाच विचारायची वेळ येत होती. आपण कुठे आहोत?
mangalagodbole@gmail.com