नवरात्र अर्थात शक्तिरूपिणी दुर्गेचा उत्सव साजरा करण्याचे दिवस. प्रत्येक स्त्रीमध्येच कोणत्या न् कोणत्या रूपात तिचा संचार असतोच. त्याच रूपाच्या बळावर आजची स्त्री आत्मनिर्भर झाली आहे. स्वत:मधली दुर्बलता बाजूला सारून स्वबळावर उंच भरारी घेते आहे. समाजातल्या अशाच खास अपंगत्वावर मात करून सबळ ठरलेल्या नवदुर्गाचा परिचय आजच्या या नवदुर्गा विशेषांकात.
आत्तापर्यंत ‘चतुरंग’ने नवरात्रीच्या दरवर्षीच्या विशेषांकात आपल्या शक्तीच्या बळावर आत्मनिर्भर झालेली दुर्गा सर्वासमोर आणली. त्यात आपल्या देशातील अनेक कर्तृत्ववान स्त्रियांबरोबरच अगदी देशोदेशींच्या दुर्गाचाही समावेश होता, मात्र या वर्षी ओळख करून घेऊ या शारीरिक दुर्बलतेवर मात करून स्वावलंबी बनलेल्या आत्मविश्वासी दुर्गाचा. या दुर्गानी केवळ स्वत:लाच शक्तिशाली केलं असं नव्हे, तर आपल्या बरोबरीच्या अनेकांना स्वबळावर उभं केलं, त्यांना जगण्याची प्रेरणा दिली.
 या आहेत नऊ जणी. शारीरिक व्यंग घेऊन जन्माला येऊनही त्यातल्या प्रत्येकीने आपल्यातल्या या व्यंगाला आपलं अपूर्णत्व मानायला नकार दिलाय, कारण त्यांच्या मते अपंगत्व हे मानसिक असतं. तुम्ही मानलंत तरच ते अपंगत्व, नाही तर त्याच्यावर मात करून खूप उंच उडी घेता येते. स्वत:ला तर उंच करता येतंच; पण समाजातल्या अनेक अपंगांनाही स्वत:च्या पायावर उभं करता येतं आणि या सगळ्या हे नुसतं बोलून थांबल्या नाहीत, तर त्यांनी ते स्वानुभवातून सिद्ध करून दाखवलं आहे.
पोलियोमुळे शारीरिक अपंगत्व येऊनही जिद्दीने मानसोपचातज्ज्ञ झालेल्या डॉ. अरुंधती खाडिलकर, अंध असूनही हिमालयातील शिखर चढणाऱ्या परिमला भट आणि सॉलिसिटर कांचन पामनानी, श्रवणदोष असूनही वीणा शिकणाऱ्या जयश्री रवींद्रन, पोलियोमुळे पाय लुळे झाले तरी गाण्याची आवड जोपासून स्वत:ला रेडिओस्टार करणाऱ्या रजनी करकरे-देशपांडे, डाऊन सिंड्रोम असूनही चित्रकार असलेल्या राधिका चांद, व्हीलचेअरवर बसूनही उद्योजिका बनण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणाऱ्या संजना गोयल, एक पाय नसतानाही नृत्यात पारंगत होणारी रोमा न्युपेन ही नेपाळी कन्यका या सगळ्याच जणींनी आपल्यातल्या सुप्त गुणांना शोधलं आणि त्या त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलं. इतकंच नव्हे, तर आपल्यासारखं अपंगत्व आलेल्यांना निराशेतून बाहेर काढून नवचैतन्य मिळवून दिलं, त्यांना स्वबळावर उभं केलं. यातली एक दुर्गा आहे अमेरिकेतील रोझमेरी सिगिन्स नावाची. फक्त धड असणारी रोझ आयुष्यात आलेली संकटं तीव्र मानसिक इच्छेच्या बळावर कशी परतवून लावते हे पाहण्यासारखं आहे.
या सगळ्यांकडे पाहताना जाणवलं ते म्हणजे समाजाची या लोकांकडे पाहाण्याची काहीशी उदासीन, काहीशी तुच्छ मानसिकता. म्हणूनच आपली विकलांग मुलगी ट्रायसिकल घेऊन फिरते म्हणून रोज रात्री तिच्या सायकलमधली हवा काढून घेणारी आईही आपल्याला भेटते आणि मोठय़ा मुलीचं लग्न लागावं म्हणून अपंग मुलीला गोठय़ात लपायला लावणारे कुटुंबीयही बघायला मिळतात. आपल्या इमारतीत अंध, अपंग मुलींना राहायला नकार देणारे पदाधिकारीही याच समाजात सापडतात आणि अपंग असल्याने महाविद्यालयात प्रवेशच नाकारणारे महाभागही इथेच सापडतात. इतकंच कशाला अपंगांचा, अंधांचा, कर्णबधिरांचा खास विचार करणारा समाजही आपल्याकडे विकसित व्हायचा आहे म्हणूनच ब्रेल लिपी सर्वच ठिकाणी उपलब्ध नसते, व्हीलचेअरच्या मदतीने का होईना चालायला मदत करणारे रस्ते, इमारतींत वर जाण्यासाठी सोयही पुरेशी नाही. अंध विद्यार्थ्यांसाठीच्या लेखनिकांच्या निकषांत बदल करण्यासाठीही न्यायालयीन लढाई लढायला लागते.
पण हेही तितकंच खरं की, या विकलांगांना अनेक अशी माणसं भेटली ज्यांनी त्यांना मनापासून साथ दिली. आपल्या मुलांमधल्या व्यंगांचा आईवडील या नात्याने सहज स्वीकार केलाच; पण त्यांच्याबरोबरीने समाजातल्या इतरांनीही त्यांच्यातल्या न्यूनतेचा उच्चार न करत त्यांच्यातल्या कलागुणांना प्रोत्साहनच दिलं. म्हणून अपंग असूनही रोमा नृत्यांगना बनू शकली. रजनी करकरे यांना तर पी. डी. देशपांडे यांच्यासारखा जोडीदार मिळाला. या सगळ्यांमुळेच त्या आज आपापल्या क्षेत्रात महत्त्वाचं नाव ठरल्या आहेत.
आपल्यात काही कमी आहे, याचा बाऊ न करता जे आहे त्याचा कसा उपयोग करता येईल हे पाहाणं म्हणजेच खरं जगणं आहे आणि तेच यातल्या प्रत्येकीने केलं आहे. समाजातल्या या दुर्गा सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहेत. म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाला दंडवत!    

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !