उन्हाळ्यात थंडावा देणारी काकडी बहुतांशी सगळ्यांनाच आवडते. त्यात कॅलरीज अगदी कमी, फॅट किंवा कोलेस्टोरॉल अजिबात नाही. शिवाय पुरेसा चोथा असलेली काकडी आतडय़ातली विषारी द्रव्यं बाहेर काढायला मदत करते, वजनही आटोक्यात ठेवते. काकडीत ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्त्व असून शरीराला आवश्यक अशा प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियम यांची मात्रा असते. काकडीतील के जीवनसत्त्व हाडाच्या बळकटीसाठी उपयोगी आहे.
थंडगार काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांची जळजळ कमी होते. त्वचेचा रंग उजळण्यासाठी काकडीच्या रसाचा उपयोग करतात. काकडीचा रस उन्हाळ्यातील एक आरोग्यदायी पेय आहे. कोवळ्या खिरे काकडय़ा सालासह खाव्यात.
काकडी स्मूदी
साहित्य: दोन वाटय़ा काकडीच्या फोडी, ८-९ काजू, एक वाटी साईचं दही, मूठभर कोथिंबीर, एक चमचा आल्याचा कीस, हवा असल्यास हिरव्या मिरचीचा एक लहान तुकडा, पुदिन्याची चार पानं, अर्धा चमचा जिरं, चवीला मीठ, साखर.
कृती: सर्व जिन्नस मिक्सरमध्ये घालून पेस्ट करावी आणि थंड करून प्यायला द्यावी.
वसुंधरा पर्वते – vgparvate@yahoo.com