ch28दादा-दादी पार्कमधून फिरताना जाणवतो तो भरभरून ओसंडणारा उत्साह आणि सकारात्मक वृत्ती. थोडय़ा वेळापूर्वी, गळय़ात बिल्ले घालण्यापूर्वी व्यवहारी जगातले ते होते सासरे, आजोबा, सासूबाई, आजीबाई..! सगळय़ांच्या चेहऱ्यावर सांसारिक भावनांची ओढगस्ती दाटली होती. पण बिल्ला गळय़ात घातला- मित्र, मैत्रिणी भेटल्या आणि किमया झाली..

संध्याकाळचे पाच वाजले. माळय़ाने सावरकर उद्यानाचं प्रवेशद्वार उघडलं. हळूहळू हालचाल सुरू झाली. कोणी पायी, कोणी रिक्षाने उतरून प्रवेशद्वारापाशी येऊ लागले. मोठी लांबलचक रांग लागली. आत येता-येता आपापल्या ओळखपत्राचे बिल्ले गळय़ात घालून सर्व जण आत येत होते.
बघता बघता शंभर, दीडशे स्त्री-पुरुषांचा मेळावा बागेत जमला. वय अवघं साठ ते पाऊणशे! मैत्रीला, सोबतीला, संगतीला आणि खूप खूप मनमोकळं बोलायला आसुसलेलं..! विशाल सावरकर उद्यान गजबजून गेलं. जिकडेतिकडे माणसंच माणसं..! हळूहळू गर्दीचं आयोजन सुरू झालं. कोणी तरी व्यवस्थापकाने गट पाडले. स्वावलंबनाची शिस्त असल्यामुळे कोणी तरी स्टॅण्डवर कॅरम बोर्ड ठेवले. सोंगटय़ा लावल्या आणि कॅरमचा खेळ सुरू झाला. बायकांचा गट वेगळा, पुरुषांचा गट वेगळा. आळीपाळीने सर्वानाच खेळण्याची संधी तरी शांतपणे खेळ चालला होता. ना घाई.. ना गडबड..!
काहींनी चालणं पसंत केलं..! दुसऱ्या बाजूला वीस-पंचवीस जणी टाळय़ांच्या तालासुरात भजनं गाऊ लागल्या. मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ..! भाषेचं बंधन नव्हतं की तालासुराच्या अटी नव्हत्या. जमेल तसं सगळय़ा गात होत्या. कार्यक्रमातला सहभाग महत्त्वाचा होता आणि तो त्यांना एकमेकीच्या जवळ आणीत होता.
त्याच्याच पुढे हातात चहाचे पेले घेऊन गप्पा मारणाऱ्या पुरुषांचा मोठा कंपू बसला होता. आल्या-गेल्याला ‘विश’ करीत मनमुराद गप्पा..! इथंही विषयांना बंधन नव्हतं, राजकारण, क्रिकेट, सिनेमा, भ्रष्टाचार, बोलणारे वक्ते तेवढे विषय. गप्पांत रस असलेल्यांची पावलं आपसूकच तिथं वळत होती. पुन्हा नवा विषय, नवा वाद. आवाज चढत होते, तशा गप्पा रंगत होत्या.
एका बाजूला स्त्री-पुरुषांचा गट खेळण्यात रमला होता. खेळातली चढाओढ, हार-जीत, हरलेल्याला शिक्षा. एकीने तर चक्क बस फुगडी घातली. कोणी गरबा खेळला. एका आजोबांनी तर हातातली काठी घेऊन घोडासुद्धा केला.. संकोचाचं अवघडलेपण सोडून सगळे जण खेळाची मस्ती अनुभवित होते. त्या साऱ्या भारलेल्या वातावरणात काही तरी जादू होती, त्यामुळे जमलेल्या मंडळींमध्ये कसलाच अभिनिवेश नव्हता, स्पर्धा नव्हती, की दुस्वास नव्हता. फक्त मधून मधून फुटणारे हास्याचे स्फोट होते. जवळच झाडाखाली बरीच गर्दी जमली होती. जवळ जाऊन पाहिलं तर टेबलावर डिशमध्ये केक ठेवला होता. त्याच्या भोवती पाच-सहा जण उभे होते. बाकीचे त्यांच्या अवतीभोवती उभे होते. सर्वात वयस्कर असलेल्या आजोबांनी केक कापला. इतरांनी हात लावला. एकमेकांना केक खाऊ घातला. सर्वानी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि उद्यानात एकदम ‘हॅपी बर्थ डे’च्या गाण्याचे सूर घुमले..! आनंदाचा जल्लोष पसरला..! उत्सवमूर्तीही भावुक झाल्या..! ..हे आहे दादा-दादी पार्क. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांचं हक्काचं ठिकाण!
त्यांच्यासाठी इतरही सुविधा आहेत. दैनंदिन योगाभ्यास, आरोग्य तपासणी, माहितीपूर्ण व्याख्याने, वक्तृत्वातून विचारांची देवाणघेवाण, वर्षांकाठी सहल. ज्याला जे रुचेल, पचेल ते त्यानं आत्मसात करावं व स्वत:चं वैचारिक विश्व समृद्ध करावं.
या पार्कमधून फिरताना या साऱ्या अनुभवातून प्रत्यक्ष जात असताना जाणवतो तो भरभरून ओसंडणारा उत्साह आणि सकारात्मक वृत्ती. थोडय़ा वेळापूर्वी, गळय़ात बिल्ले घालण्यापूर्वी व्यवहारी जगातले ते कोणी वेगळेच होते. ते होते सासरे, आजोबा, सासूबाई, आजीबाई..! सगळय़ांच्या चेहऱ्यावर सांसारिक भावनांची ओढगस्ती दाटली होती. पण बिल्ला गळय़ात घातला- मित्र, मैत्रिणी भेटल्या आणि किमया झाली. ती ओढगस्ती नकळत नाहीशी झाली. चेहरे आनंदाने फुलले. मन अल्लड झालं.. तो फरक त्यांच्या देहबोलीतूनही जाणवू लागला. ही किमया होती समान वयाच्या धाग्याची. त्या धाग्याने त्यांना जवळ आणलं. एकमेकांत दुरावा निर्माण करणारं वयाचं अंतर इथं नव्हतं. त्यामुळे सगळं सोपं झालं..!
या वयातली सुख-दु:खं, व्यथा-वेदना, रोजचे अनुभव मिळतेजुळते असतात. न सांगताही कळतात. ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’
निर्मळ आनंदाची देवघेव इथंच होते. तो आनंद इथंच तुमची वाट पाहत असतो. निरोपाच्या क्षणीसुद्धा. ‘‘उद्या या, मी तुमचीच वाट पाहातोय..’ असं आवर्जुन सांगतो. मग पुन्हा जगण्याला उभारी येते. हा आनंद पाहिल्यावर जाणवतं ते म्हणजे ‘दादा-दादी पार्क’ खऱ्या हे अर्थाने मुक्तांगण…