गडचिरोलीत जन्मलेल्या आणि आता अमेरिकेतील केन्टकी येथे स्थायिक झालेल्या डॉ. गंगाधर मद्दीवार या सर्जनची सेवावृत्ती म्हणजे ‘शिव भावे जीव सेवा.’ गेली वीस वर्षे हेमलकसा आणि मेळघाटातल्या आदिवासींसाठीच नव्हे, तर पेरू, गयाना, गुटेमाल, होंडुरस, नायजेरिया येथल्या मागास परिसरांमध्ये दर वर्षी महिनाभर कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांच्या  सत्पात्री सेवादानाविषयी..
स्वा मी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत अनेक वैदिक सिद्धांत मांडले. त्यांपैकी एक म्हणजे, ‘सर्व जीवांत परमात्म्याचा अंश आहे’ म्हणून ‘जीवसेवा हीच शिवसेवा होय.’ (शिव भावे जीव सेवा). हेच उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून डॉ. गंगाधर मद्दीवार या अमेरिकास्थित मराठमोळ्या सर्जनने गेली १५ वर्षे जगभरातील रंजल्यागांजल्यांना व्याधीमुक्त करण्यासाठी वाहून घेतलंय. गडचिरोली जिल्ह्य़ातील अहेरी गावी जन्मलेले व आता अमेरिकेतील केन्टकी राज्यात स्थायिक झालेले डॉ. मद्दीवार यांनी धो धो प्रॅक्टिस सुरू असताना आणि चहूबाजूंनी पैसा येत असताना १९९८ मध्ये साठीच्या उंबरठय़ावर ‘निवृत्ती’ घेतली. कशासाठी? तर आपल्या कौशल्याचा लाभ मायभूमी व इतर विकसनशील देशांतील गरीब, गरजू जनतेला व्हावा यासाठी. आजन्म आपले प्राथमिक खर्च भागतील अशी तरतूद केली आणि मग रिमोट एरिया मेडिकल (रॅम), रोटरी इंटरनॅशनल डॉक्टर्स, डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स.. अशा संस्थांमार्फत विनामूल्य वैद्यकीय सेवा देण्याचं व्रत त्यांनी पत्नीच्या संमतीने अंगीकारलं.डॉ. मद्दीवार यांच्या बालपणी घरची आर्थिक स्थिती यथातथाच होती. पण पितृतुल्य वडीलबंधू मधुकर अण्णांच्या पाठिंब्याने त्यांनी नागपूरच्या गव्हर्न्मेंट कॉलेजमधून एम.बी.बी.एस. पदवी मिळवली. त्यानंतर न्यूयॉर्कहून अमेरिकन बोर्ड ऑफ सर्जरीचं प्रमाणपत्र घेऊन डॉक्टर मायदेशी परतले खरे, पण डॉक्टरी पेशातील अनैतिक व्यवहार पाहिल्यावर त्यांनी पुनश्च अमेरिकेकडे प्रयाण केलं. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या शस्त्रक्रियेतील कौशल्याची ख्याती झपाटय़ाने पसरली. पण तेथील गर्दी, चढाओढ त्यांच्या शांत स्वभावाच्या पचनी पडणारी नव्हती. म्हणून त्यांनी न्यूयॉर्क सोडलं आणि केन्टकी राज्यातल्या बॅनर नावाच्या छोटय़ाशा खेडय़ात आपली प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासूनच मातृभूमीसह पेरू, गयाना, गुटेमाल, होंडुरस, नायजेरिया या देशांमध्ये स्वयंसेवक सर्जन म्हणून महिनाभर जाण्याचा उपक्रमही सुरू झाला.सर्व सुरळीत चालू असताना १९९० मध्ये अचानक सद्दाम हुसेन नावाची वावटळ आली आणि पूर्वी कधी तरी सैन्यात काम करण्यासाठी राखीव म्हणून नाव नोंदवलेल्या डॉक्टरांना युद्धभूमीवर हजर राहण्याचा आदेश मिळाला. आखाती देशांतील त्या युद्धाने डॉक्टरांना अंतर्मुख केलं. युद्धामुळे जखमी होऊन तडफडणारे शेकडो रुग्ण पाहिल्यावर आपल्या सर्जरीमधील कौशल्याचा लाभ गरीब, आदिवासी बांधवांना मिळालाच पाहिजे, असं ठरवूनच टाकलं. त्याप्रमाणे युद्धावरून परतल्यापासून ते दर वर्षी  डॉ. प्रकाश आमटे यांचा ‘लोकबिरादरी’ प्रकल्प व डॉ. अभय बंग यांची मेळघाटातली ‘सर्च’ संस्था या दोन्ही ठिकाणच्या आरोग्य शिबिरांत सहभागी होऊ लागले. या साधनेलाही आता २० वर्षे उलटून गेलीयेत. हेमलकसा व मेळघाटामधील अनुभवांविषयी डॉक्टर म्हणतात, ‘तिथल्या आदिवासींच्या डोळ्यातील आनंद बघण्याची मला पहिल्याच भेटीत एवढी चटक (ओढ) लागली की मी तेव्हाच दर वर्षी तिथे जाण्याचं ठरवून टाकलं.’अमेरिकेतील सर्वात गरीब देश होडुंरस. २००५ मध्ये येथे आयोजिलेल्या कॅम्पसाठी ते गेले होते. ‘रॅम’चे कॅम्प्स नेहमीच वैद्यकीय सुविधा नाहीत अशा ठिकाणी असतात. शिबिराच्या ठिकाणी स्त्री-पुरुषांच्या मुलांसह लांबच लांब रांगा लागलेल्या. कॅम्पच्या १५ दिवसांपैकी १२ दिवस गावोगावच्या रुग्णांना तपासून त्यांना औषधं द्यायच्या कामी, तर उरलेल्या २/३ दिवसांत ज्यांना गरज आहे अशांवर जवळपासच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करायच्या. २००५ ची डॉक्टरांची दिवाळीही गयानातील अशाच एका कॅम्पवर साजरी (!) झालीय. डॉक्टर म्हणाले, गयाना देशातील अ‍ॅमेझॉन खोऱ्याच्या  पाणथळ भागात अतिशय दुर्गम ठिकाणी १५ हजार आदिवासींची वस्ती आहे. त्या ठिकाणी अजूनही पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, वीज, शिक्षण.. अशा गोष्टी पोहोचलेल्या नाहीत. लेथेम नावाच्या किंचित मोठय़ा गावी ब्रिटिशांनी एक हॉस्पिटल बांधलंय खरं, पण डॉ. मद्दीवरांची टीम जाईपर्यंत तिथे एकही शस्त्रक्रिया झाली नव्हती. नोव्हेंबर २००४ च्या पहिल्या शिबिरात डॉक्टरांनी त्या ठिकाणी ६० मोठय़ा शस्त्रक्रिया केल्या. त्यांच्या त्या टीम- ४१०मध्ये पॅराशूट जम्पर्स, आर्मी व्हॉलिंटीयर्स, काही आदिवासी व ३ अमेरिकी तरुणीही होत्या. या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम करून आयशल्टन येथील हॉस्पिटल ते गन्स हे दुर्गम गाव यांमधील ४० मैलांचं जंगल तोडून पायवाट बनवली. तीही विक्रमी वेळात. डॉक्टर म्हणाले, आमचं इथलं काम चित्रित करण्यासाठी नॉक्सविल टेलिव्हिजनने जेरी ओवन्स नावाच्या एका व्हिडीयोग्राफरला मुद्दाम पाठवलं होतं. गाडीच्या आत जागा नसेल तर टपावर बसावं लागेल या अटीवर त्याला प्रवेश देण्यात आला होता. तोही बहाद्दर! त्याने उन्हा-पावसात, झाडा-झुडपांचे बोचकारे सहन करत मोठय़ा जिद्दीने केलेलं ते चित्रीकरण पुढे एमी पुरस्कारासाठी नामांकित झालं.सप्टेंबर १९९८ मध्ये डोमनिकन रिपब्लिक देशाला चक्रीवादळाने झोडपल्यानंतर लगेचच म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात ‘रॅम’ची १२ जणांची टीम तिथे जाऊन थडकली. जाण्या-येण्याचा खर्च नेहमीप्रमाणे स्वत:चा. त्या वादळाने गावंच्या गावं वाहून गेली होती. सगळी वस्ती मोकळ्या मैदानावर बांधलेल्या लाकडी खोक्यांमध्ये बसवण्यात आली होती. डॉक्टरांचा कॅम्पही अशाच एका लाकडी खोक्यात ‘कोंबला’ होता. ज्या इस्पितळात उपचार करायचे त्याचंही छप्पर उडून गेलं होतं. तरीही अत्यावश्यक वीज व पाण्याच्या सोयीवर डॉक्टरांनी तिथे तीन दिवसांत २० मोठय़ा आणि अनेक लहान शस्त्रक्रिया केल्या.‘सव्‍‌र्हिस अबॉव्ह सेल्फ’ हे रोटरीचं ब्रीदवाक्य डॉक्टरांच्या प्रत्येक कृतीतून दिसतं. जून १९९७ मध्ये ‘रोटरी व्हॉलिंटीयर जर्नल’मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजमधील सेंट लुशिया या लहान बेटावरील हॉस्पिटलसाठी १ ते २ महिन्यांकरिता एका सर्जनची आवश्यकता अशी जाहिरात वाचली. त्या हॉस्पिटलमधल्या एकुलत्या एक सर्जनने गेल्या वर्षभरात एकही सुट्टी घेतली नव्हती. त्याच्या हाकेला डॉ. मद्दीवारांनी ‘ओ’ दिली आणि त्या डॉक्टरला वर्षभर लांबलेला आपला हनिमून साजरा करता आला. दुर्गम भागातील निर्धनांच्या सेवेतील आपले अनुभव डॉक्टरांनी ‘स्वान्त सुखाय’ या पुस्तकात लिहिलेत. (इंग्रजी अनुवाद- एक्स्टर्नल हॅपिनेस). या कर्ममार्गाचं फळ त्यांना ईश्वराने प्राणघातक संकटातून सहीसलामत वाचवून दिलं.  २००४ च्या त्सुनामीच्या वेळी डॉक्टर सपत्नीक पाँडेचरीला आले होते. पण आधी दर्शन देवाजीचं या पत्नीच्या ‘हट्टापायी’ बचावले. दुसरा प्राणावर बेतलेला प्रसंग म्हणजे शिडाच्या बोटीतून नौकानयन (सेलिंग) करताना मार्ग चुकून त्यांची बोट बर्मुडा ट्रँगल्समध्ये फसली, तेव्हाही ते आश्चर्यकारकरीत्या वाचले. तिसरी घटना २०११ मधली. या वेळी तर मद्दीवार पती-पत्नी तवांगला (अरुणाचल प्रदेश) हिमवादळात  ६० तास अडकले होते. आजूबाजूला हिमवर्षांवर होत असताना एका पडक्या पुलाखाली अरुंद जागेत देवाला आळवत त्यांनी अख्खी रात्र जागवली. डॉक्टरांच्या पत्नी सुरेखाताईंना खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी म्हणायला हवं. कारण प्रत्येक मोहिमेत त्यांची साथ असते. कॅम्पमध्ये रुग्णांचं समुपदेशन करण्यापासून नर्सिगपर्यंत कुठलंही काम त्या मनापासून करतात. ‘रॅम’ संस्थेच्या भारत दौऱ्याचं नियोजन त्यांच्याकडे असतं. आज ७९ व्या वर्षीही डॉक्टर वर्षांला ३ ते ४ वैद्यकीय शिबिरांत (कालावधी प्रत्येकी दोन आठवडे) स्वखर्चाने सहभागी होत आहेत. अरुणाचल प्रदेशात तर गेली १२ वर्षे विवेकानंद केंद्राच्या मदतीने त्यांचा कॅम्प लागतोय. हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा डॉक्टर गयानातील पीडितांच्या सेवेत मग्न असतील.गडचिरोलीमधील आपल्या अहेरी गावावरही त्यांचं लक्ष आहे. त्यांच्या दानातून उभी राहिलेली चंद्रभागा मद्दीवार ही मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा उत्तम नावलौकिक मिळवत आहे. डॉक्टरांना ‘रोटेरियन ऑफ द ईयर’ हे पारितोषिक सलग ८ वर्षे मिळालं. पण अशा मानसन्मानात रमण्यापेक्षा त्यांना विनोबांची गीताई अधिक भावते. हाच आदर्श समोर ठेवून दीन-दुबळ्यांचं जगणं सुखी करणं हा डॉक्टरांचा धर्म बनलाय. हे अनुभव वाचून वैद्यकीय क्षेत्रातील कोणाला दोन आठवडे समाजसेवेचा आनंद घ्यावासा वाटला तर त्यासाठी डॉक्टरांचा पत्ता
दूरध्वनी अमेरिका-६०६-८७४-९४४६ १५२ डय़ानियल्स क्रिक, बॅनर, केन्टकी ४१६०३.ganmad@rocketmail.com,waglesampada@gmail.com

 

Horrific accident to speedy Scorpio 3 dead 5 injured in buldhana
बुलढाणा : भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात, ३ ठार, ५ जखमी
rain in Sangli and the northern parts of Tasgaon
सांगली, तासगावात पावसाने दिलासा
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Body of 12 year old boy who went missing from Thakurwadi in Daighar found in Panvel
डायघर येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह पनवेलमध्ये