आजी -आजोबांसाठी
‘समरांगण सूत्रधार’ या अमूल्य ग्रंथातून लिहिलेलं राजा भोजाचं अष्टांग स्थापत्यशास्त्र इंग्रजीतून भाषांतर करून जगापुढे ठेवणारे डॉ. प्रभाकर पांडुरंग आपटे. आज ८२व्या वर्षीही ते अहोरात्र  काम करत आहेत आणि त्यांना साथ मिळतेय त्यांच्या पत्नी संजीवनी यांची.
राजा भोजाचं नाव घेतल्यावर आपल्याला म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्यांना ‘कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली’ ही म्हण तेवढी आठवते आणि त्यावरून हा कोणी विद्वान राजा असणार इतपत अटकळ बांधता येते. परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आजचे परवलीचे शब्द प्रत्यक्ष कृतीत कसे आणायचे ते या राजाने हजार वर्षांपूर्वी संस्कृत श्लोकांमधून लिहून ठेवलंय हे कळल्यावर त्याच्या विद्वतेची कल्पना येते. ‘समरांगण सूत्रधार’ या अमूल्य ग्रंथातून लिहिलेलं राजा भोजाचं अष्टांग स्थापत्यशास्त्र (जसं अष्टांग आयुर्वेद) ज्यांनी इंग्रजीतून भाषांतर करून जगापुढे ठेवलंय त्या अत्यंत बुद्धिमान व व्यासंगी व्यक्तीचं नाव आहे डॉ. प्रभाकर पांडुरंग आपटे. हे ८२ वर्षीय पंडित. गेली १५ वर्षे या एकाच ध्यासाने ते पछाडले आहेत. त्यांनी रूपांतर केलेले ३५० ते ४०० पानांचे ६ खंड सध्या दिल्लीच्या इंदिरा गांधी कला केंद्राकडे प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत.
‘पिकतं तिथं विकत नाही’ या म्हणीनुसार राजा भोजाचं नाव काढताच आपल्या भुवया उंचावतात, पण डॉ. आपटे म्हणाले की, या राजाच्या साहित्याचा जगभर अभ्यास सुरू आहे. जर्मन लेखक फेलिक्स ओटर याने ‘रेसिडेन्शियल आर्किटेक्ट ऑफ राजा भोज’ नावाचं पुस्तक लिहिलंय. अमेरिकेतील मक्र्युरी सोसायटीच्या वेबसाइटवर एक लेख आहे, त्यात समरांगण सूत्रधारमधील ३१ व्या अध्यायातील ८९ ते १०० या पाऱ्याविषयक ११ श्लोकांचं भाषांतर दिलंय. या महान ग्रंथातील ६९/७० या अध्यायातील शिवालयाचं वर्णन वाचून ती जागा प्रत्यक्ष बघण्यासाठी अ‍ॅडाम हर्डी हा युवक इंग्लंडहून भोजपूरला येत असतो, त्या परिसरात विखरून पडलेले आणि पुरातत्त्व विभागाच्या कृपेने शाबूत राहिलेले देवळाचे सर्व अवशेष गोळा करून मूळ देऊळ पुन्हा उभारायची त्याची इच्छा आहे. डॉ. आपटे सांगत की, ‘खरंतर या ग्रंथाच्या अमूल्य ठेव्यातून प्रेरणा घेऊन एक कोरी करकरीत ‘डिस्ने लॅण्ड’ उभी राहू शकते. तसं प्रोजेक्टही एका आर्किटेक्टने मध्य प्रदेश सरकारकडे पाठवण्यासाठी तयार केलंय..
डॉ. आपटे यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृतकोशाचे संपादक म्हणून आयुष्यभर नोकरी केली. त्याआधी १२०० संस्कृत ग्रंथांमध्ये सुमारे ८५ लाख शब्द निवडून त्यांच्या पत्रिका (slips) अ, आ, इ, ई.. अशा आकारादी क्रमाने लावून त्यांचे एक पत्रिकागार (scriptorium) तयार झाले होते. त्यातील एक-एक शब्द निवडून त्याचा अर्थ लावून, संपादन करून प्रतिवर्षी एक याप्रमाणे १९७६ ते २०१४ पर्यंत एकेक खंड प्रसिद्ध होत आहे. तरीदेखील संस्कृतमधील ‘अ’पासून सुरुवात होणारे शब्द संपलेले नाहीत. अर्थात हा कोश विश्वकोश स्वरूपाचा असल्यामुळे प्रत्येक शब्दाच्या अर्थाबरोबर ऋग्वेदापासून १८ व्या शतकापर्यंतच्या ग्रंथातील अवतरणे कालक्रमानुसार आणि अर्थाच्या छटांनुसार दिलेली आहेत. उदा. अग्नी या शब्दाचे अर्थ, उपार्थ आणि अर्थछटा असे एकूण १११ एवढे वर्गीकरण त्यात आहे आणि त्यांचा उलगडा करणाऱ्या उदाहरणांची संख्या ५००च्या वर आहे. हे काम करत असतानाच डॉ. आपटे यांचा प्राचीन विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंध आला.
या संस्कृतप्रेमीने याच विषयात एम.ए.,पीएच.डी. तर केलंच आहे. शिवाय त्यांनी एल.एल.एम. ही कायद्याची पदवीही घेतलीय आणि तीदेखील अव्वल क्रमांकाने. त्यांच्या प्रबंधाचा विषयही सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचा. ‘पांचरात्र संहिता एक अभ्यास’ हे त्याचं नाव.
आपल्या अभ्यासाचा विषयही त्यांनी सोप्या (!) शब्दात उलगडला तो असा.. हिंदू धर्माचे दोन मुख्य प्रवाह मानले जातात. एक निगम आणि दुसरा आगम. त्यापैकी निगम ही यज्ञसंस्था मानणारी आदिम संस्कृती, तर मंदिरांतर्गत मूर्तिपूजा हे आगमाचं लक्षण. आगमाची सुरुवात भगवान श्रीकृष्णाने द्वापर युगाच्या अंती केली. प्रमुख देवतांनुसार आगमाचे तीन भाग पडले. शैवागम, वैष्णवागम आणि शाक्तागम (देवीचे उपासक). यातील वैष्णवागमाचे आणखी दोन विभाग, एक पांचरात्र (वेद व तंत्र यांचा मिलाफ) व दुसरा वैखानस (फक्त वेदमंत्रांचा आधार). पांचरात्र आगमाच्या तीन संहिता, सात्वत, पौषकर व जयाख्य. या तीन संहितांच्या इंग्रजी अनुवादाचे डॉ. आपटे यांनी केलेले प्रत्येकी दोन खंड मेलकोटे (कर्नाटक) व तिरुपती या प्राचीन संस्कृत विद्यापीठांनी प्रसिद्ध केले आहेत.
ते म्हणाले की, दक्षिणेकडील देवळांची रचना, तिथली पूजा-अर्चा त्या त्या संहितेनुसार होते. मेलकोटे येथील चेल्वनारायण (सात्वत), श्रीरंगम येथील रंगनाथ (पौष्कर) व विष्णुकांची येथील वरदराज (जयाख्य) या वैष्णवागमाच्या तीन प्रमुख मंदिरांचा या संदर्भात दाखला देता येईल. तिरुपतीच्या बालाजीची पूजा वैखानस आगमाप्रमाणे, तर त्याची अर्धागिनी पद्मावतीची पांचरात्र पद्धतीने होते, अशीही माहिती त्यांनी दिली. (म्हणूनच त्यांना लांब लांब ठेवलं असावं का?)
डॉ. आपटे यांच्या म्हणण्याप्रमाणे यज्ञ, बिंब (मूर्ती), कुंभ व मंडल (मंदिरांचे जमिनीवरील नकाशे) ही परमेश्वराची आराधना करण्याची चार प्रमुख स्थानं. पौष्करसंहितेचा अभ्यास करताना त्यांचं लक्ष मंडलांची टेक्नॉलॉजी म्हणजे मंदिरस्थापत्य, मूर्तिशास्त्र, मंदिरावरील कोरीव काम.. या गहन विषयांकडे वळलं. पौष्करसंहितेत चार प्रकारच्या मंडलांचा उल्लेख आहे. त्यातील श्लोक वाचून त्यानुसार ते आराखडा काढू शकतात. म्हणजे मंडलातील कुठल्या चौकोनात कमळ आहे, कुठे परागकण आहेत, कुठे नुसतंच पान, तर कुठे स्वस्तिक.. अशा प्रकारे. हे नकाशे एवढे अचूक असतात की त्यात किंचितसाही बदल संभवत नाही. या मंडलांना कोणता रंग द्यायचा याचंही सविस्तर वर्णन पौष्करसंहितेत मिळतं. दक्षिणेकडील देवळांची रचना (आर्किटेक्ट) हा मंडलांचा पाया घेऊन झाली असावी असं त्यांचं मत आहे. मंडलांचा अभ्यास करताना त्यांना संस्कृततज्ज्ञ डॉ. रजनी पत्की व कलातज्ज्ञ डॉ. भारती माटे यांचं सहकार्य मिळालं.
जपानमधील एक कलातज्ज्ञ सुगीएरा, ज्यांनी जपानी भाषेत मंडलांवर अनेक पुस्तकं लिहिलीत, ते मुंबई आय.आय.टी.मध्ये येत असत. एकदा ते पुण्याला डॉ. आपटे यांना भेटले. आणि त्यांचं मंडलांच्या रचनांवर केलेलं काम पाहून प्रभावित झाले. तेव्हापासून गेली २६ र्वष डॉ. आपटे आय.आय.टी.मधील ‘इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर’ या विभागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. भारतातील निगम व आगम संस्कृतीवर प्रकाशझोत टाकल्याबद्दल त्यांना दक्षिणेतील रामभद्र कुप्पुस्वामी रिसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेने ‘कोम्मूर रामभद्रम पुरस्कार-२०१२’ हा सन्मान देऊन गौरवलं आहे.
संस्कृतमधील मेघदूत, शाकुंतल.. अशा ग्रंथांवर बरेच जण बोलतात पण ललितेतर संस्कृत वाङ्मय या विषयावर व्याख्यान देणारे डॉ. प्रभाकर आपटे बहुधा एकमेव असावेत. त्यांचा या विषयातील सखोल अभ्यास पाहून दिल्लीच्या इंदिरा गांधी कला केंद्राकडून ‘समरांगण सूत्रधार’ या राजा भोजाने हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या ग्रंथाचं इंग्रजीत रूपांतर करण्यासाठी त्यांना विचारणा झाली आणि त्यांचं निवृत्त जीवन राजा भोजमय होऊन गेलं.
डॉ. आपटे म्हणतात, ‘वास्तुशास्त्र व तंत्रज्ञानावर आधारलेला हा ग्रंथ म्हणजे एक अद्भुत खजिना आहे. विमानशास्त्र, जलशास्त्र, यंत्रशास्त्र असे आजच्या काळातील सर्व विषय राजा भोजाने त्यातील ७००० श्लोकांत मांडले आहेत.’ या संदर्भात थक्क होऊन तोंडात बोटं घालावी, अशी अनेक उदाहरणं त्यांनी सांगितली.
डोंगरावरचं पाणी खाली आणून त्या शक्तीवर पॉवर हाऊस उभारायचं तंत्र त्यात आहे. आज म्हैसूरच्या वृंदावन गार्डनमधील कारंज्यांचे जे चमत्कार पाहायला गर्दी लोटते ते सर्व, किंबहुना त्यापेक्षा किती तरी अधिक वर्णन राजा भोजाच्या ग्रंथात वाचायला मिळतं. या समरांगण सूत्रधारमध्ये शहर आराखडा असा एक अध्याय आहे. त्यात अमुक अमुक लोकसंख्या असलेल्या गावांना जोडणारा रस्ता किती रुंदीचा असावा तेही नमूद केलंय. राजपथ किती रुंद असावा याविषयी राजा भोज लिहितात.. इतका प्रशस्त की चतुरंग दळ एकमेकांना न घासता जाऊ शकेल. धार्मिक स्थापत्यात यज्ञकुंड, होमकुंडाविषयी माहिती तर सैनिकी स्थापत्यात रथशाळा कशी असावी, व्यूह कसा रचावा यासंबंधीचं ज्ञान आहे.
सगळ्यात कहर म्हणजे आजही दुबरेध वाटणाऱ्या यंत्रामानव या कल्पनेचे अनेक आविष्कार राजा भोजाच्या लेखणीतून उतरले आहेत. उदा. हेर किंवा शत्रूचा सैनिक राजवाडय़ात शिरतोय, असं समजताच तिथे पहाऱ्यावर उभ्या असलेल्या सैनिकाच्या हातातील तलवार तत्क्षणी खाली येऊन त्याचं शिर धडावेगळं करण्याची किमया किंवा राजाचा पलंग प्रत्येक प्रहरी एक एक मजला वर जात पहाटेच्या वेळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जेव्हा महाराजांचे नेत्रकमल उघडतील तेव्हा बरोब्बर पाचवा मजला आला असेल आणि समोरच उगवणाऱ्या सूर्यनारायणाचं स्वारींना दर्शन होईल.. असं तंत्रज्ञानातील आविष्कार डॉ. आपटेंच्या तोंडून ऐकताना आपण स्तिमित होतो. या संकल्पनेपुढे आपलं आजचं उद्वाहक (लिफ्ट) एक पिल्लू वाटतं.
डॉ. आपटे म्हणतात, ‘राजा भोजाच्या स्थापत्यकलेतील कौशल्याची एक झलक पाहायची असेल त्याने भोपाळला जाऊन भोपाळताल (धरण) जरूर पाहावं. हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणामुळे आजूबाजूची लाखो एकर जमीन तर सुजलाम सुफलाम झालीच आहे, शिवाय मजबुती एवढी की त्यावर बांधलेल्या रस्त्यावरून आजही अनेक अवजड वाहनं ये-जा करताहेत. यापुढे जाऊन त्यांनी सांगितलं की या धरणाला इतक्या वर्षांनंतर अलीकडेच पडलेली छोटीशी फट बुजवायला आपली आजची टेक्नॉलॉजी सतत ८ दिवस झटत होती.’
‘समरांगण सूत्रधार’चं इंग्रजी रूपांतर करण्याचं बरचंसं श्रेय त्यांच्या पत्नी संजीवनी आपटे यांच्याकडे जातं, असं म्हटल्यास फारसं वावगं ठरणार नाही इतके त्यांचेही कष्ट या कामापाठी आहेत. इंदिरा गांधी कला केंद्राच्या मागणीप्रमाणे सर्वप्रथम मूळ श्लोकातील संधी विग्रह करून सर्वच्या सर्व ७००० श्लोक हाती लिहून त्यांच्याकडे सुपूर्द करायलाच संजीवनीताईंना अडीच-तीन र्वष लागली. एकीकडे डॉ. आपटय़ांचं भाषांतराचं काम सुरू होतंच. त्या लिखाणाच्या नोंदी ठेवणं आणि मुख्य म्हणजे एकेका खंडाची प्रुफं चार-चारदा तपासणं हे अत्यंत किचकट व वेळखाऊ काम त्यांनी मोठय़ा जिद्दीने केलं. या दोघांचं काम जवळून पाहणारे संजीवनीताईंचे आत्तेभाऊ इंजिनीयर अरविंद फडणीस हे लोहचुंबकासारखे या प्रकल्पाकडे ओढले गेले व त्यांनी श्लोकातील वर्णनानुसार देवळांचे नमुने, गजशाळा, अश्वशाळा, पुष्करणी.. इ. आकृत्या भाषांतरित ग्रंथासाठी काढून दिल्या.
पतीच्या संशोधनाला हातभार म्हणून हे जोडकाम संजीवनीताईंनी जीव ओतून केलं असलं तरी त्यांना आपली स्वतंत्र ओळख आहे. तब्बल ३० र्वष त्यांनी पुणे आकाशवाणीवर निवेदिका म्हणून काम केलंय. आवाजाच्या माध्यमातून त्या श्रोत्यांच्या घरोघरी जाऊन पोहोचल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘आकाशवाणी ही आमची नोकरीची जागा नव्हतीच, ते आमचं ज्ञानमंदिर होतं.  माझी सगळी जडणघडण तिथेच झाली.’
पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने १८५० ते २००० या कालखंडातील देशभरातील २० भाषांतील स्त्री-साहित्याचा मागोवा घेण्याचा प्रचंड मोठा प्रकल्प २००८ मध्ये पूर्ण केला. या संपूर्ण प्रकल्पात एक साहित्यप्रेमी म्हणून संजीवनताईंनी सर्वतोपरी संशोधन सहकार्य केलं.
त्यांच्या चिकाटीची परिसीमा म्हणून आणखी एका गोष्टीकडे बोट दाखवता येईल. कै. डॉ. रघुनाथ पुरुषोत्तम कुलकर्णी, एम. टेक्., पीएच.डी. या उच्चपदस्थ संशोधकाने बंगलोरला यतिराज स्वामींच्या मठात राहून तिथली अत्यंत जुनी अशी १२ कपाटं धुंडाळून त्यातील ग्रंथांमधून  ‘आर्किटेक्चरल इंजिनीयरिंग’विषयक श्लोक निवडून काढले. ३०० पानांचं एक पुस्तक होईल एवढी त्यांची संख्या होती. त्या श्लोकांचं त्यांनी इंग्रजीत भाषांतर केलं. त्यातील वर्णनानुसार आकृत्या काढल्या, पण दुर्दैवाने हे काम करत असतानाच त्यांना मृत्यूने गाठलं. त्या कामाचं मूल्य ओळखून संजीवनीताईंनी ते श्लोक व त्यांचं भाषांतर संगतवार लावलं आणि संगणकाच्या मदतीने त्यांची प्रेसकॉपी बनवली. यानिमित्ताने सत्तरीनंतर त्या संगणकही लीलया हाताळू लागल्या. अत्यंत नेटाने त्यांनी केलेलं हे पुनर्लेखन तिरुपती विद्यापीठाकडे प्रकाशनाला पाठवूनही ३ र्वष झाली. डॉ. रघुनाथ कुलकर्णीना जाऊन तर एक तप उलटलं. परंतु तो अमूल्य खजिना अजूनही अंधारातच आहे.
अशा संशोधनासाठी पैसा तर पाण्यासारखा खर्च होतोच, शिवाय वेळ आणि श्रम यांची तर गणतीच नाही. तरीही पदराला खार लावून आपटे पती-पत्नीने एवढं प्रचंड काम पुढच्या पिढय़ांसाठी करून ठेवलंय.
या जोडप्याची एकच इच्छा आहे की,             ‘प्रतीक्षेतलं, अडकलेलं त्यांचं सर्व संशोधन लवकरात लवकर प्रकाशित व्हावं आणि त्याचा लाभ आजच्या इंजिनीयर्स, तंत्रज्ञांना व्हावा. त्यासाठी गरज आहे ती कुणी तरी पुढे येण्याची.

hindostan hamara marathi news, hindostan hamara book
राष्ट्रवादी लोककवितेचा बुलंद उद्गार
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र