शिक्षण म्हणजे समजणं, शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणं, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणं, शिक्षण म्हणजे कष्ट करू शकणं, शिक्षण म्हणजे चांगलं माणूस होणं, शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट होणं.. हे जाणून ज्यांनी शाळा व शिक्षण यांवर अनेक प्रयोग केले त्याविषयी..
पालक एक प्रश्न हमखास विचारतात. मुलं अभ्यास करत नाहीत, त्यांचा अभ्यास कसा करून घ्यायचा? खरं तर मुलांचा अभ्यास मुलांनीच करायचा असतो, पण गृहपाठ पूर्ण झाला नाही तर शाळेत ओरडा बसेल म्हणून आईचा cr13जीव तुटतो. कधी कधी मुलाला झेपणार नाही एवढा अभ्यास असतो, मग आई पुढे सरसावते. स्वत:च लिहून देते.
खरं असं व्हायला हवं की, दहा पालकांनी एकत्र येऊन शाळेला विनंती करायला हवी की, झेपणार नाही एवढा गृहपाठ देऊ नका. पण पालक असं म्हणायला घाबरतात आणि शाळा ते ऐकूनही घेत नाहीत. एखाद्या पालकांनी तक्रार केली तर मुलांना ते आवडत नाही. मुलं म्हणतात, ‘‘आई, तू शाळेत आलीस तर टीचर आमच्यावर राग धरतात.’’ मुलं आईला शाळेत येऊच देत नाहीत.
घरी पालकांनी अभ्यास घेणं हाही दहशतीचा मामला असतो. अभ्यास घ्यायला सुरुवात करण्यापूर्वीच आई किंवा बाबा हातात पट्टी घेऊन बसतात. नाही आलं की दे पट्टीचा प्रसाद. मग मुलंपण सारखी पाणी प्यायला जाऊ? शू? शी? असं म्हणून पळ काढतात.
एक रागीट आई हातात लायटर घेऊन बसायची तर दुसरी काडेपेटी. ‘देऊ चटका?’ असा धाक असायचा. हा काय अभ्यास झाला? असा अभ्यास घेतला तर त्यातलं किती लक्षात राहील? मूल दहावीत गेलं की माहोल वेगळाच असतो. आता दहावी! आई लवकर उठणार. स्वैपाक करून ठेवणार. मुलाला उठवणार. अभ्यासाला बसवणार. तोवर बाबा आवरणार. नंतर ते अभ्यास घेणार आणि एवढं करून निकाल मनासारखा लागला नाही तर काय? काही मुलं आपल्याला कमी मार्क मिळाले तर! असा विचार करून आधीच नको त्या वाटेनं निघून जातात. एवढी ती दहशत असते!
काय केलं आहे आपल्या मुलांचं आपण! ज्या देशातली नचिकेतासारखी मुलं प्रत्यक्ष यमाला प्रश्न विचारत होती, भक्त प्रल्हादासारखी मुलं वडिलांच्या अत्याचाराला न जुमानता स्वत:ला पटलं तेच करत होती, बाळ ध्रुवासारख्या मुलांत अढळपद मिळवण्याची हिंमत होती, आरुणीसारखा मुलगा गुरूंच्या शब्दाखातर रात्रभर शेताचा बांध थोपवून आडवा झाला होता, ही मुलं लेचीपेची नव्हती. ती बुद्धिमान होती, कष्टाळू होती, अन्याय सहन न करणारी होती. शिक्षणाने माणसाचं चारित्र्य असं घडायला हवं, पण आज आपण मुलांना चंगळवादी, टी.व्ही.वादी बनवतो आहोत ते थांबवायला हवं.
हे असं घडतं आहे, कारण शिक्षण म्हणजे काय हेच आपण विसरलो आहोत. शिक्षण म्हणजे समजणं, शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणं, शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणं, शिक्षण म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न कळणं, शिक्षण म्हणजे चंगळवादापासून दूर राहणं, शिक्षण म्हणजे स्वावलंबी होणं, शिक्षण म्हणजे चांगलं माणूस होणं, शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट होणं..
असं जर किती तरी म्हणजे शिक्षण असेल तर ते कुठं मिळतं आहे आपल्या मुलांना? चांगलं शिक्षण म्हणजे काय हे शोधू लागलं की अनेक पुस्तकं हाती लागतात आणि वाचून कळतं की हे म्हणजे खरं शिक्षण आहे.
पहिली गोष्ट मादाम मारिया माँटेसरींची. त्यांनी असं म्हटलं की मुलं शिकतात, कारण ती या जगात नवी असतात. त्यांना हे जग समजून घ्यायचं असतं. त्यांना शिकण्यासाठी शिक्षेचीही गरज नसते आणि बक्षिसाचीही नसते. त्यांना आमिष लागत नाही. फक्त चांगलं शिक्षण, त्यांचं कुतूहल शमवणारं शिक्षण पाहिजे.
मादाम माँटेसरींकडून स्फूर्ती घेऊन गिजुभाई बधेकांनी काम केलं. त्यांची दृष्टी विलक्षण होती. ते म्हणायचे, ‘‘बाल देवो भव!’’ ते भावनगरला बालवाडी चालवायचे. मुलं वर्गात येताना दारात उभे राहायचे आणि ‘या कमलजी’ ‘या विमलजी’ असं म्हणून नमस्कार करून स्वागत करायचे. त्यांच्या मोठय़ा मोठय़ा मिश्या होत्या. लोक त्यांना ‘मूछोंवाली माँ’ म्हणायचे इतके ते प्रेमळ होते.
त्यांनी शिक्षणावर शंभर-एक पुस्तकं लिहिली, त्यातलं ‘दिवास्वप्न’ सर्वानी वाचावं असं अप्रतिम पुस्तक आहे. चांगला शिक्षक कसा बंधनांमुळे निष्क्रिय होत नाही, उलट स्वत:चे अनेक मार्ग शोधून काढतो आणि खरं शिक्षण घडवतो. ‘दिवास्वप्न’मध्ये हे सारं सांगितलं आहे. हा शिक्षक वर्गात प्रथमच जातो तर मुलं गोंगाट, दंगा, धोपा करत असतात. गुरुजींचं मुळीच ऐकत नाहीत. मुख्याध्यापक म्हणतात, ‘एका मुलाला धरा आणि द्या थोबाडीत. सगळे गप्प बसतील.’ पण या शिक्षकाचा धीर होत नाही त्याला ते पटतच नाही. तो म्हणतो, मी तुम्हाला गोष्ट सांगतो आणि जादू होते. आता मुलं घरी जायला तयार नसतात. शांत होतात. ही गोष्ट सात दिवस चालते आणि मुलांची गुरुजींशी मैत्री होते. पुढे अनेक प्रयोग गुरुजी करतात. सर्वानी पाठय़पुस्तक खरेदी करून पैसे वाया घालवू नका. थोडय़ांनीच पाठय़पुस्तकं घ्या आणि बाकीच्यांनी त्याच पैशात गोष्टीची पुस्तकं घ्या म्हणतात. पालकांना समजावून सांगतात आणि वर्गात चांगलं ग्रंथालय तयार होतं. इतिहास शिकवताना नाटकं करतात. खेळ खेळलेच पाहिजेत म्हणून खेळ सुरू करतात. वर्गाचं संग्रहालय तयार करतात त्यातून विज्ञान शिकतात. एका वर्षांत अभ्यासक्रम तर पूर्ण करतातच पण त्यापलीकडे अनेक गोष्टी शिकतात!
अशा अनेक शाळांच्या शिक्षकांच्या प्रयोगांच्या गोष्टी पुस्तकरूपांनी मराठीत आल्या आहेत.       डॉ. अभय बंग यांनी त्यांच्या सेवाग्राममधल्या शाळेबद्दल लिहिलं आहे. वेगवेगळी कामं करत तिथे शिक्षण दिलं जायचं. मुलं शेती करत, साफसफाई करत, सूतकताई करत तसाच स्वयंपाकही करत. आठ जणांचा गट महिनाभर जबाबदारी घेई. १०० लोकांचा रोज स्वयंपाक असे. महिन्याचा खर्च ठरवून दिलेला असे आणि आहार शास्त्रशुद्ध संतुलित असायला हवा, असं सांगितलेलं असे. शिवाय केलेला स्वयंपाक रुचकर हवा, सर्वाना आवडायला हवा आणि वेळेत तयार व्हायला हवा. ही सगळी कसरत करत मुलं स्वयंपाक करीत. कधी डाळ किती वेळात शिजेल तो अंदाज चुकायचा. रात्री सगळं आवरल्यावर भांडी घासायची असत आणि सगळं आवरून झोपावं तर पुन्हा सकाळी स्वयंपाक!
पण त्या काळात स्वयंपाक करून तीन शास्त्रं शिकता आली असं ते म्हणतात. आहारशास्त्र, अर्थशास्त्र आणि पाकशास्त्र! कोथिंबिरीत कुठलं जीवनसत्त्व किती प्रमाणात असतं ते आजही त्यांच्या लक्षात आहे. ते म्हणतात, ‘लहानपणी स्वयंपाकघरात शिकलो ते मेडिकल कॉलेजमध्ये दहा वर्षे शिकूनही शिकलो नाही.’
आंध्र प्रदेशातल्या नेल्लोर जिल्ह्य़ात एलिनॉर वॉटस् यांनी सृजना स्कूल सुरू केलं. हेतू असा होता की शिक्षण नीरस नसावं, त्याचं ओझं वाटू नये, मुलांना आवडावं, गंमत यावी, भविष्यात उपयोगी पडावं, परीक्षेपुरतं केलं आणि विसरलं असं नसावं. प्रत्येक विषय मुलांच्या जीवनाशी आणि समाजाशी जोडलेला हवा.
सगळं शिक्षण प्रत्यक्ष प्रयोगातून झालं की ते विसरत नाही. विज्ञान शिकताना मुलं गावातली घरं पाहतात. घरं कशाने बांधलीत. त्यांच्या भिंती बुटक्या का? छपरं उतरती का? जनावरं कुठे बांधतात? काम कुठे करतात? गावातल्या इतर इमारतींचीही चर्चा होते. गाणी-नृत्य-नाटक यांचा उपयोग इंग्रजी शिकवायला केला जातो. गणित शिकवताना वर्गात दुकान टाकतात आणि खरेदी-विक्रीतून मुलं लवकर शिकतात. हाताने काम करण्याला इथे अतिशय महत्त्व आहे. अनेक कामं मुलं करतात. रंग, माती, लाकूड, कागद अनेक साधनं हाताळतात. शेती करतात, जो हातांनी काम करतो त्याची सौंदर्यदृष्टी तयार होते कारण सुंदर-असुंदर घडताना तो पाहात असतो.
जॉन होल्ट या शिक्षणतज्ज्ञाने शाळेलाच विरोध केला आहे. त्याचं म्हणणं असं आहे, शिक्षणातली सगळी व्यवस्था त्यातली जबरदस्ती, त्यातली स्पर्धा, त्यातली गाजरं, त्यातल्या छडय़ा, त्यातले दर्जे, अभ्यासक्रम हे सगळं मला सर्व मानवी शोधांमध्ये सर्वात धोकादायक आणि दहशतवादी वाटतं. आज माणसं भीती, हेवा, हव्यास यांच्या हातात हात घालूनच जागतायत. त्यांना असं वाटतं की आपण कायम कशाचे तरी गिऱ्हाइकच असतो. आसपासच्या घटनांकडे आपण प्रेक्षक म्हणून पाहायचं. आपण काही निर्माण करायचं ते शिकण्यासाठी. या जगभरच्या आधुनिक गुलामी वृत्तीची मुळं शिक्षणात दडली आहे.
शिक्षणातलंही सुंदर आपण समजून घेऊ या. चांगल्या शिक्षकांचे डोळस प्रयोग वाचू या आणि शाळांनी बदलावं असा आग्रह धरू या. पुढच्या लेखातही आणखी काही अशाच शाळांची माहिती घेऊ या.
शोभा भागवत –  shobhabhagwat@gmail.com

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Centers for training of medical teachers are insufficient in the state
राज्यात वैद्यकीय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी केंद्र अपुरे; वैद्यकीय शिक्षक संघटना म्हणते…
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती