आपण भाज्या, फळं खातो ती बाजारात विक्रीला आलेली. शेतात जाऊन औट घटकेचा शेतकरी होऊन भाज्या लावणं आणि त्या स्वत:च्या हाताने तोडून खाण्यातला आनंद काँक्रीटच्या जंगलात जगलेल्यांना कधीच मिळत नाही.

पेनसिल्व्हानिया राज्यातील फिलाडेल्फीया या प्रमुख शहराजवळचे एक उपनगर, अ‍ॅम्बलर. अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असता तेथे जाण्याची संधी मिळाली आणि तिथल्या रासायनिक खते आणि कीडनाशक औषधांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने निर्माण केलेला भाजीपाला आणि फळं खाण्याच्या ‘ट्रेंड’चा व त्यातून निर्माण झालेल्या चळवळीचा परिचय झाला.
तिथल्याच मेपलग्लेन नावाच्या गावात ‘पेन्नीपॅक’ नावाचे शेत आहे. त्या शेताचे तुम्हाला वाटे मिळतात. मोठा वाटा दहा भाज्यांचा आणि लहान वाटा सहा भाज्यांचा. विशेषत: उन्हाळय़ात आणि ‘फॉल’मध्ये तुम्हाला भरपूर ताज्या भाज्या खाण्याची संधी मिळते (एरव्ही सब्जीमंडी वगैरे ग्रोसरी स्टोअर्समध्ये भाज्या मिळतात.) हिवाळय़ातसुद्धा जमिनीखालच्या भाज्या उदा. बटाटे, गाजरे, मुळा वगैरे मिळू शकतात. त्यासाठी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर, पेन्नीपॅक फार्म अ‍ॅण्ड एज्युकेशन सेंटरच्या नावे ऑनलाईन अर्ज  करावा लागतो. तसेच मोठा वाटा हवा असल्यास वर्षांला पाचशे डॉलर्स फी भरावी लागते. एकदा का तुम्ही त्यांचे सी.एस.ए. (कम्युनिटी सपोर्टेड अ‍ॅग्रिकल्चर) सदस्य झालात की तुम्हाला नेमून दिलेल्या दिवशी, दिलेल्या वेळेत येऊन, आपल्या वाटय़ाच्या भाज्या आणि फळं अगदी स्वत:च्या हाताने निवडून घेऊ शकता.
सी.एस.ए.चा सभासद होण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला औट घटकेचं शेतकरी पण होता येतं. म्हणजे महिन्यातून एकदा किंवा दोनदा, तुमच्या सोयीनुसार, तुम्हाला वेळ असेल त्याप्रमाणं त्या भाजीमळय़ात जाऊन त्यांना मदत करता येते. उदा. भाज्यांची लागवड करणं, माजलेलं तण किंवा हरळी काढणं, योग्य प्रमाणात नैसर्गिक खतं घालणं वगैरे. थोडक्यात काय तर तुम्हाला तिथल्या प्रत्यक्ष ‘काळय़ा आई’ची सेवा करण्याची संधी पण मिळू शकते.
सी. एस. ए.चं सभासद खुलं झाल्याचं समजल्यावर मुलांनं ऑनलाइन अर्ज केला आणि आम्हाला फळं भाजीपाला आणण्यासाठी शुक्रवार हा वार नेमून दिला गेला. वेळ सायंकाळी ५ ते ७. ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी आम्ही भाजीच्या मळय़ात गेलो. तिथे एका खोलीत सगळय़ा भाज्या मांडून ठेवल्या होत्या. बाजूच्या फलकावर, कोणत्या भाज्या, किती (वजन) घ्यायच्या याची नोंद केलेली होती. उदा. पालक एक पौंड, गाजरे दीड पौंड, स्ट्रॉबेरीज एक परडी वगैरे. कधी कधी तुम्हाला शेतात जाऊन स्वत:च्या हाताने, मिरच्या कोथिंबीर, स्ट्रॉबेरीज, ब्लुबेरीज, चेरीज वगैरे फळंही घेता येतात. मात्र नंतर खोलीत येऊन, त्याची नोंद करावी लागते. त्याच खोलीत विविध प्रकारच्या आरोग्यदायक रेसीपीज् पण दिलेल्या असतात.
आम्ही गेल्या त्या दिवशी त्या खोलीत भरताची मोठी वांगी, पालक, टोमॅटो, वाटाणे वगैरे ताज्या ताज्या भाज्या अगदी हारीने मांडून ठेवल्या होत्या. वांगी आणि टोमॅटो तर इतके ताजे आणि रसरशीत होते की लगेच खाण्याचा मोह होत होता. एकेका टोमॅटोचा आकार, चांगल्या मोठय़ा वाडग्याएवढा होता. वांग्याचा बैंगणी रंग म्हणजे कसा असतो ते त्या दिवशी मला समजलं. वांग्याचं काय करावं? भरीत की वांग्याचे काप? की दोन्ही? या विचारांनी मन द्विधा झालं. आमच्या वाटय़ाची भाजी पिशवीत भरताना मी इतकी सुखावून गेलं की त्याचं वर्णन करणं केवळ अशक्यच!
नंतरच्या आठवडय़ात आम्हाला रास्पबेरीज मिळाल्या.  शेतात, थोडं दूरवर रास्पबेरीची झाडं होती. झाडं कसली जेमतेम ३/४ फूट उंचीची झुडपंच होती ती. लालभडक रसानं परिपूर्ण अशा परिपक्व फळांनी लगडलेली ती झुडपं पाहून मी अगदी मोहून गेले. हाताने तोडून त्या खाण्याचा आनंद वेगळाच.
रासायनिक खतं आणि कीडनाशकं औषधं यांचा वापर न करता, उत्पादन केलेला भाजीपाला, फळं, कणसं वगैरे खाण्याचा निर्णय घेऊन आपण आपल्याच आरोग्याचं रक्षण करत असतो म्हणूनच सी.एस.ए. सदस्यत्वासारख्या योजना, आपल्या आरोग्यसंपन्न जीवनाला पूरकच ठरतील.
आपल्याकडेही अलीकडे असे प्रयोग होऊ लागले आहेत. त्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे. निसर्गाच्या जवळ जाण्याचा तो एक समजूतदार मार्ग आहे.