० आपलं स्वयंपाकघर आणि कुटुंबातील सदस्यसंख्या लक्षात घेऊन मायक्रोवेव्ह खरेदी करावा. छोटय़ा कुटुंबासाठी १८ ते २० लिटरचा मायक्रोवेव्ह योग्य आहे.
० ओव्हनचं दार पारदर्शी असावं म्हणजे आत शिजत असलेला अन्नपदार्थ दिसू शकेल. तसंच पदार्थ अधिक शिजतोय, असं वाटलं तर आपण वेळेआधीही तो बंद करू शकतो.
० मायक्रोवेव्ह कोरडय़ा आणि सुरक्षित जागेवर, तसंच जिथं लहान मुलांचा हात पोहोचणार नाही, अशा जागी ठेवावा.
० मायक्रोवेव्ह भिंतीपासून ८ सें.मी. किंवा त्यापेक्षा अधिक लांब ठेवा तसेच गॅसचा पाइप व गॅस शेगडीपासून ३ ते ४ फूट लांब ठेवावा.
० मायक्रोवेव्ह रिकामा सुरू करू नये.
० बटाटा, रताळी, टोमॅटो यांसारखे पदार्थ काटय़ाने किंवा सुरीने टोचून मायक्रोवेव्हमध्ये ठेवा नाही तर ते उष्णतेने फुटून त्याचे कण सर्वत्र उडून आतील बाजूस असलेली छिद्रं बंद होतील.
० पदार्थ बनवून झाल्यावर भांडं बाहेर काढताना ग्लोव्ह्जचा वापर करा.
० पदार्थ बाहेर काढल्यावर आतील वास निघून जाईपर्यंत ओव्हनचं झाकण उघडं ठेवा.
० पदार्थ बनवून झाल्यानंतर ओव्हन थंड झाला की मऊ कपडय़ाने आतून, बाहेरून साफ करा.
० त्यातील ग्लास प्लेट थंड झाल्यावर साबणाच्या पाण्यानं, स्पंजनं किंवा कपडय़ाने साफ करा. साफ करताना तारेच्या स्कबरचा वापर करू नका.
० मायक्रोवेव्हमध्ये वापरली जाणारी भांडी, रॅक, ग्रील कॉस्टिक सोडय़ाच्या पाण्यात बुडवून ठेवा व हलक्या हाताने साफ करा.
० मासे, तंदुरी चिकन किंवा तत्सम पदार्थाचा वास लवकर जात नाही. अशा वेळी ओव्हनच्या बाऊलमध्ये एका लिंबाचा रस पिळलेलं पाणी ठेवून ४-६ मिनिटं ओव्हन चालू ठेवा किंवा ब्रेडच्या २-३ स्लाइसना पाण्याचा हात लावून २ मिनिटं ओव्हन चालू करा आणि नंतर अर्धा-एक तास तो तसाच बंद करून ठेवा. वास निघून जाईल.संकलन
उषा वसंत – unangare@gmail.com