.इतक्यात माझं लक्ष एका अंधाऱ्या कोपऱ्यात गेलं आणि बघते तर काय, ते माझ्या कपडय़ाचं गाठोडं होतं. ‘माझा आनंद गगनात मावेनासा झाला’ वगैरे काही म्हणतात ना तसं झालं! कपडे मिळाले याचा आनंद होताच, पण जास्त आनंद होता मी चोरी पकडली याचा, तीही थेट सीआयडीच्या आवेशात.

गे ल्याच महिन्यात आमच्या बिल्डिंगमध्ये एकदम पाच-सहा लग्ने होती. एकाच महिन्यात इतकी लग्ने असल्यानं बिल्डिंगमध्ये एकदम लग्नाचं मस्त, उत्साही वातावरण होतं. मी मात्र कोणत्या लग्नात कुठली साडी नेसायची या विवंचनेत होते. एखादी साडी रिपीट नको व्हायला! शेवटी प्रत्येक लग्नासाठी एकेक साडी बाजूला काढली. माझी अत्यंत आवडत्या फिरत्या मोरपंखी रंगाची पैठणी मी शेवटच्या लग्नासाठी राखून ठेवली होती. एकेक करत सर्व लग्ने पार पडली. आता फक्त एकच लग्न बाकी होतं. लग्नाच्या पाच दिवस आधी मी ती पैठणी, त्याचा ब्लाऊज, नवऱ्याचा महागडा शर्ट, मुलींचे ड्रेस असे सर्व कपडे एका मोठय़ा बोचक्यात बांधून नेहमीप्रमाणे आमच्या बिल्डिंगमध्ये येणाऱ्या नेहमीच्या इस्त्रीवाल्याला दिले.
दुसरा दिवस उजाडला. सकाळी पावणेनऊ वाजता बरोबर बेल वाजली. अपेक्षेप्रमाणे दारात इस्त्रीवालाच उभा होता. त्या दिवशीचे कपडे दिले आणि आदल्या दिवशीचे कपडे घ्यायला हात पुढे केले, तर आमचे कपडे त्याच्याकडे नव्हतेच. म्हटलं, ‘भैया, कपडे किधर है?’ तर तो साळसूदपणे म्हणाला, ‘‘भाभी, कपडा दिया ही नही था आपने.’’ मी पुन्हा तेच पण थोडं रागात विचारलं. तर त्याचं आपलं एकच पालुपद चालू..‘‘आपने दिया ही नही था.’’
एकदम याला अल्झायमर तर झाला नाही ना, याची मला शंका यायला लागली. पण एका दिवसात अल्झायमर कसा होईल, आणि फक्त माझेच कपडे गायब होते. आता मात्र माझा पारा चढायला लागला. माझ्या मुलीच्या भाषेत सांगायचं झालं तर मी जगदंबेचं रूप धारण केलं. दहा-बारा हजाराचे, महागडे कपडे गहाळ होतात म्हणजे काय? इस्त्रीवाल्याला चांगलेच फैलावर घ्यायला सुरुवात केली. माझा हा नवीन अवतार बघून तोदेखील घाबरला. पण तरीही त्याची गाडी एकाच वाक्यावर अडत होती. गेल्या पंधरा वर्षांत त्याच्याकडून कोणाचाही एकही कपडा इकडचा तिकडे झाला नव्हता आणि या विश्वासानेच मी त्याच्याकडे आमचे इतके महागडे कपडे सुपूर्द केले होते. आमच्या पतिदेवांनी ‘तूच वेंधळी आहेस’ वगैरे म्हणून माझ्यावर तोंडसुख घेतलेच. शेवटी त्या इस्त्रीवाल्याच्या वयाची तमा न बाळगत ‘तुझ्या दुकानात जाऊन कपडे शोधून संध्याकाळी परत ये,’ असं सुनावलंच. रविवारचा दिवस. त्यात मॅच असल्याने घरात गोंधळ सुरू होता. माझा जीव मात्र माझ्या पैठणीच्या आठवणीने बैचेन होत होता. संध्याकाळी इस्त्रीवाला हात हलवत कपडे मिळाले नसल्याचे सांगत आला. त्याला कपडे दिल्याचं मला १०० टक्के आठवत होतं. वहीत तशी नोंदही होती. पण तो तर म्हणत होता, कपडे दिलेच नाहीत. मग कपडे गेले कुठे? या गोंधळातच तोही दिवस संपला.
सोमवार उजाडला. मुलींची शाळा, नवऱ्याचा डबा, सकाळची कामे पटापट आवरली. आज काहीही करून कपडय़ांचा ठावठिकाणा लावायचाच हे ठाम ठरवलं होतं. नवरा माझं, आपलं सांत्वन करत ऑफिसला निघून गेला. त्याने कधीच त्या कपडय़ांवर पाणी सोडले होते. बरोबर नऊ वाजता खाली गेले. बाकी सर्व इस्त्रीवाल्यांना, वॉचमनला विचारून पाहिले. कोणालाच काही माहिती नव्हते. आमच्या इस्त्रीवाल्याने जिथे-जिथे शक्यता होती. तिथे सर्व ठिकाणी शोधले होते, पण कपडे मिळाले नव्हते. माझ्या अंगात आता टी.व्ही.वरची ‘सीआयडी’ मालिका भिनू लागली होती. एव्हाना अख्ख्या बिल्डिंगला माझे कपडे हरवल्याचे कळले होते. सर्व जण इस्त्रीवाल्याला दोष देत होते. मला मात्र आता त्याची दया यायला लागली होती!
संध्याकाळ झाली. पुन्हा एकदा मी इस्त्रीवाल्याला फोन करून कपडय़ांबद्दल विचारले. कपडे मिळाले नव्हतेच. बोलता-बोलता कळलं की तो एके ठिकाणी सगळे कपडे ठेवून नाक्यावर चहा प्यायला गेला होता. म्हणजे नेमक्या तेवढय़ा वेळात माझे कपडे गायब झाले असण्याची शक्यता होती. ‘कुछ तो गडबड है!’ एसीपी प्रद्युम्न माझ्यातही संचारले. त्या विशिष्ट वेळेत बिल्डिंगमध्ये कोण कोण येतं हे मी आठवायला लागले. विचार करता करता मनात एका व्यक्तीबद्दल संशय आला. ताबडतोब सोसायटीच्या ऑफिसमध्ये गेले आणि मॅनेजरला सांगितले की माझे कपडे चोरीला गेले आहेत. आज हे माझ्या बाबतीत झाले ते उद्या आणखी कुणाहीबरोबर होऊ शकते, म्हणून कोणी चोरले हे शोधलंच पाहिजे.
मला आपल्या बिल्डिंगमध्ये येणाऱ्या कचरेवालीवर संशय येतोय, असं सांगितलं. कारण तीच एकटी सोसायटीत बदली बाई म्हणून नव्याने कामाला आली होती. पण आता हे शोधून कसं काढायचं? ती कचरेवाली गोळा केलेला काही भंगारमाल बिल्डिंगच्या मागच्या बाजूला ठेवत होती. जे कोणालाच माहीत नव्हतं. तिथेही जाऊन काठीनं ढुसकून बघितलं पण काहीच उपयोग झाला नाही. नाही म्हणायला तो कचरा तिथून लगेचच हटवला गेला. मला ‘स्वच्छ भारत अभियाना’त थोडी तरी आपली मदत झाली, याचा आनंद झाला.
आमच्या बिल्डिंगच्या लॉबीमध्ये एक छोटीशी रूम आहे. त्या रूममध्ये कचऱ्याचं सर्व सामान ठेवलं जातं. मला त्या रूमच्या आत काही तरी असावं अशी शंका यायला लागली. त्या रूमला कुलूप लावलं होतं. त्याची चावी मागितली. तर ती कचरेवाली दुपारी घरी जाताना चावी बरोबर घेऊन गेली होती. माझा संशय आणखी बळावला. मॅनेजर आणि वॉचमन मदतीला होतेच. वॉचमननं दुसऱ्या चावीनं दार उघडण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. मला वॉचमनला उद्देशून ‘दया, दरवाजा तोड दो’ डायलॉग म्हणावासा वाटला. स्क्रू-ड्रायव्हरने दरवाजाची कडी काढायचं ठरलं. पळत जाऊन घरून स्क्रू-ड्रायव्हर घेऊन आले. एकदाची कडी काढली आणि शोधकार्याला सुरुवात झाली.
दरवाजा उघडताच एक भला मोठा उंदीर बाहेर पडला. नंतर आम्ही आत गेलो. कचऱ्याचे मोठे ड्रम्स, चार-पाच झाडू असा सर्व लवाजमा तिथे होता. ड्रमच्यामागे १,२ प्लास्टिकच्या पिशव्यात काही कपडे, बूट होते. ते माझे नसले तरी इतके चांगले कपडे, बूट तिथे कसे आले, हा प्रश्न आलाच.
इतक्यात माझं लक्ष एका अंधाऱ्या कोपऱ्यात गेलं आणि बघते तर काय.. ते माझ्या कपडय़ाचं गाठोडं होतं. ‘माझा आनंद गगनात मावेनासा झाला’ वगैरे काही म्हणतात ना तसं झालं! कपडे मिळाले याचा आनंद होताच, पण जास्त आनंद होता. मी चोरी पकडली याचा. थेट मालिकेतल्या सीआयडीच्या आवेशात!
सर्व कपडे नीट तपासणी केले. ते सहीसलामत होते. उंदीरमामाने माझ्यावर कृपा केली होती. ‘उंदीरमामा की जय, गणपती बाप्पा मोरया’ असं मनातच म्हणत त्यांना धन्यवाद देऊन टाकले.
घरी येऊन आधी इस्त्रीवाल्याला फोन केला. नवऱ्याचा तर विश्वासच बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी तो इस्त्रीवाला पण ‘भाभी तो ‘सीआयडी’ बन गयी’ अशी माझ्यावर स्तुतिसुमने उधळीत होता, कारण माझ्याबरोबरच तिने बाकीच्यांचे पण काही कपडे, बूट चोरले होते ते सर्व परत मिळाले होते. ताबडतोब त्या कचरेवालीला दम देऊन काढून टाकले. पण माझ्या ‘सीआयडी’गिरीची चर्चा नंतर बरेच दिवस चालूच राहिली..
शिल्पा माहुली- shilpimahuli@yahoo.com