अनेक संस्थांतर्फेआज ज्येष्ठांचं एकटेपण, त्यांच्या आरोग्यविषयक वा मानसिक समस्या आदींना सामावून घेईल, असे व्यासपीठ  उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशाच काही संस्थांचा हा परिचय.
अफाट आकाश हिरवी धरती
पुनवेची रात चांदणं भरती
पाचूची लकेर कुरणांच्या ओठी
प्रकाशाचा गर्भ जलवंती पोटी
अखंड नूतन मला ही धरित्री
आनंदयात्री मी आनंदयात्री
आयुष्याची सहा दशकं उलटल्यानंतर शांत झालेल्या, थकल्या पावलांना बळ देणाऱ्या या काव्यपंक्ती.. ज्येष्ठांच्या जगण्याला नवा अर्थ व आयाम देणाऱ्या. त्या प्रत्यक्षात साकारणाऱ्या ज्येष्ठांचे अनेक उपक्रम सध्या सर्वत्र आकाराला येत आहेत.
‘ज्येष्ठ नागरिक संघ’ त्यातील एक. या संघाची स्थापना ऐंशीच्या दशकात झाली. त्या काळी टी.व्ही. संच फार कमी घरांत असत. असंच एक घर रसाळांचं! संध्याकाळी अनेक ज्येष्ठ मंडळी त्यांच्याकडे टीव्हीवरील कार्यक्रम पाहाण्यासाठी जमत. या सर्वाना एकत्र का करू नये? या विचारातून रसाळ   ch10पती-पत्नीने एकनाथ छत्रे, डॉ. म्हसकर, देऊस्कर यांच्या सहकार्याने या संघाची स्थापना केली. सुरुवातीला वाढदिवस, कथाकथन, स्नेहसंमेलन व त्यातील भोजनाचे कार्यक्रमसुद्धा रसाळांच्या घरी साजरे होत. हळूहळू या संघाचे सभासद शेकडय़ांवर आले आणि आता रीतसर संस्थेचे कामकाज सुरू झाले. सुधारित आरोग्यसेवांमुळे साठीतील हे ज्येष्ठ अत्यंत कार्यमग्न जीवन व्यतीत करत असून निवृत्तीनंतरचे आयुष्य विधायक कार्यासाठी वेचत आहेत. ज्येष्ठ नागरिक संघ (ठाणे-उत्तर) व ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष सुरेश गुप्ते हे या दोन्ही संस्थांचं कार्य नियोजनबद्ध रीतीने पुढे नेत असून अनेक विधायक उपक्रम राबवत आहेत. गुप्ते सांगतात, ‘‘आम्ही संघातर्फे तीन प्रकारचे निधी गोळा करतो. अपंग निधी, क्लब निधी व वाढदिवस निधी! घटनेप्रमाणे ch12अपंग निधीचे पैसे संस्थेच्या इतर कार्यक्रमांसाठी वापरता येत नाहीत. या अपंग निधीतून दरवर्षी अपंग मूक-बधिरांसाठी कार्य करणाऱ्या चार ते पाच संस्थांना आर्थिक मदत दिली जाते. तसंच त्यातून गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. एक अशीही योजना आहे, की तुमच्या घरातील रद्दी विकून आम्हाला दहा रुपये द्या! या योजनेतून जे पैसे जमा होतात त्यांतून अनेक उपक्रम राबवले जातात.’’ अंजली गुप्ते सांगतात, ‘‘ज्यांना स्वत:ला रद्दी विकणे शक्य नाही, त्यांच्यासाठी आम्ही ती विकण्याची व्यवस्था करतो व त्यातले दहा रुपये संस्थेसाठी घेऊन उरलेली रक्कम ज्येष्ठांना परत केली जाते!’’ ज्येष्ठ नागरिक सदस्य वाढदिवसानिमित्त संस्थेला देणगी देतात. त्यातून ठाण्याजवळील आदिवासी पाडय़ांवर धान्य, कपडे व औषधे वितरित केली जातात. नुकत्याच घडलेल्या माळीण गावातील दुर्घटनाग्रस्त लोकांना संस्थेतर्फे भरीव आर्थिक मदत देण्यात आली. रोटरी क्लबच्या विद्यमाने संस्थेतील ज्येष्ठांसाठी दर वर्षी वैद्यकीय शिबिरे भरवण्यात येतात. सुरेश गुप्ते सांगतात, ‘‘हल्ली मुलं इंग्रजी माध्यमातून शिकतात; पण त्यांना आजी-आजोबांकडून ch11गोष्टी ऐकायला आवडतात. त्यासाठीच ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. मुलांना या गोष्टी मराठीतूनच ऐकायला मजा वाटते. म्हणून ‘व्यास क्रिएशन’कडून आम्ही त्यासाठी १५० पुस्तके विकत घेतली आहेत. त्यासाठी फी महिना अवघे दोन रुपये आकारली जाते. मात्र ज्येष्ठांनी या गोष्टी फक्त आपल्या नातवंडांनाच नव्हे, तर बिल्डिंगमधल्या इतरही मुलांना गोळा करून सांगाव्यात व त्यांची मातृभाषेची रुची वाढवावी, अशी अपेक्षा असते. खंत एकच आहे की, असे अनेक उपक्रम हाती घेण्यासारखे असूनही केवळ पैशामुळे कामं अडतात. अनेक दानशूर व्यक्तींमुळे आम्ही संघातील ज्येष्ठ सभासदांचे वाढदिवस, स्नेहसंमेलने, दिवाळी पहाट असे उपक्रम थाटात साजरे करतो; परंतु सधन ज्येष्ठांनीच आपल्या उपक्रमांसाठी सढळ हस्ते मदत केल्यास समाजातील वंचितांसाठी आम्ही विधायक कार्य करू शकतो.’’ सामाजिक बांधीलकीतून प्रत्येक ज्येष्ठाने विधायक कार्यात कष्ट, पैसा किंवा आपला फावला वेळ कारणी लावला, तर अनेक वंचितांचं आयुष्य मार्गी लागू शकतं.
या संदर्भातील अत्यंत बोलकं उदाहरण बोरिवली इथे घडलं. चेंबूर इथल्या झोपडपट्टीत राहणारी एक तरुणी. घरात अठरा विश्वे दारिद्रय़. तरी जिद्दीने शिकली. बीएआरसीत नोकरी मिळवली. घरादाराला तिने अज्ञानाच्या खाईतून वर काढलं. बोरिवलीतील एक ज्येष्ठ विजयकांत जुवेकर यांची तिला मोलाची मदत मिळाली. ७८ वर्षीय जुवेकरांनी एकच ध्यास घेतला आहे. ज्या ज्येष्ठांनी बोरिवली उपनगर सांभाळलं, जोपासलं, त्यांना आपण सांभाळायचं. त्यासाठी ते नव्वदीपुढच्या ज्येष्ठांचा शोध घेऊ लागले. घराघरांत फिरू लागले. त्यासाठी वेळेला चार चार जिने चढू लागले. असे वीस-पंचवीस ‘शंभरीचे वारकरी’ त्यांना मिळाले. त्यांचा त्यांनी सत्कार केला. त्यांना ‘आधारवड’ हे स्मृतिचिन्ह व त्यांचे छायाचित्र देण्यात आले. ज्येष्ठांनासुद्धा कधी तरी गोडधोड, चवीचं खावंसं वाटतं. त्यांच्यासाठी ‘इच्छापूर्ती उपक्रम’ राबवण्यात येतो. जुवेकरांच्या ओळखीने एक मिठाईवाला ज्येष्ठांसाठी मोफत मिठाई देतो, तर ‘गोडवा’ या उपाहारगृहातर्फे पहिल्या व तिसऱ्या बुधवारी ठरावीक वेळेत ज्येष्ठ नागरिकांना अल्प दरात अल्पोपाहार देण्यात येतो. नव्वदीपुढच्या ज्येष्ठांच्या सत्कार समारंभातही त्यांना आवडतील ते पदार्थ त्यांच्या सुना-नातवंडांच्या हस्ते खाऊ घालण्यात येतात.
नागपूर इथल्या ‘आनंदयात्री’ या संस्थेचा अरविंद गोडबोले यांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी श्रीगणेशा केला. त्यांनी ज्येष्ठांपर्यंत एक सुंदर संदेश पोहोचवला- ‘हे जग सुंदरच आहे. आपलंच आहे. आपण एकटे नाही. एकाकी तर मुळीच नाही. आपल्याबरोबर आपल्यासारखे अनेक साथी आहेत. त्या सगळय़ांच्या साथीने सगळय़ांचं आयुष्य सुंदर करायचं आहे. त्या सगळय़ांना बरोबर घेऊन चिरंतन आनंदाच्या यात्रेला निघायचं आहे!’
गोडबोले यांनी समवयस्कांना एकत्र आणलं. सहली, मेळाव्यातून एकमेकांची सुखं-दु:खं शेअर केली. मैत्रीचे बंध घट्ट झाले. मदतीसाठी आपणहून हात पुढे झाले. त्यातूनच त्यांना जाणवलं, या वयात विधवा, विधुर, अविवाहित ज्येष्ठांना एकाकीपणा ग्रासून टाकतोय. तो दूर करण्यासाठी त्यांना साहचर्याची गरज आहे. ज्या स्त्री-पुरुषांचं आपसात सख्य जुळतं त्यांनी एकत्र राहण्यात आणि उर्वरित आयुष्य आनंदाने व्यतीत करण्यास काय हरकत आहे? त्यातूनच ज्येष्ठांचे मैत्र सहनिवास मंडळ आकाराला आलं; परंतु केवळ एकत्र राहणं समाजाला मानवेना. त्यामुळे या ज्येष्ठांनी पुढे विवाहबंधन स्वीकारण्याचा व त्यायोगे समाजमान्यता मिळवण्याचा निर्णय घेतला. कालांतराने गोडबोलेंना वाढत्या वयामुळे हे काम झेपेनासं झालं, तेव्हा प्रा. डॉ. सुनीती देव यांनी हे काम पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी योजनाबद्ध रीतीने या कार्यात तरुणांना सहभागी करून घेतलं. त्या म्हणतात, ‘‘नागपुरात अनेक ज्येष्ठ स्त्री-पुरुषांचे गट आहेत. ते बागेत एकत्र जमतात, गप्पागोष्टी करतात, सिनेमा- नाटकाला जातात; पण शेवटी संध्याकाळी घरी परतल्यावर ते एकटेच राहतात. कित्येकांना घरी बोलण्यासाठीसुद्धा कोणी नसतं. त्यांचा हा एकटेपणाचा प्रश्न कायमचा सुटावा, यासाठीच आम्ही प्रयत्न करतो. त्यांची लग्न जुळवतो किंवा त्यांच्या सहजीवनासाठी प्रयत्न करतो. मला असं मनापासून वाटतं, की समाजाने ‘कुटुंब’ या संस्थेची पारंपरिक चौकट आता बदलावी. कुटुंब ही संकल्पना फार ताठर न ठेवता ती लवचीक करावी. येत्या दहा-पंधरा वर्षांत अनेक ज्येष्ठ या सहजीवनाच्या संकल्पनेचा परिपक्व विचारातून स्वीकार करतील!’’
अनेक ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक संघ समाजकार्यात खारीचा वाटा उचलत आहेत. ठाण्यातील श्रीनगर विभागात पाइपगॅस पुरवण्यात अडचण येत होती. तेथील संघाने लोकांमध्ये जागृती घडवून त्यांची सहय़ांची मोहीम राबवली व आज तेथील घराघरांत पाइपगॅसची जोडणी झाली आहे. ऋतुपार्क ज्येष्ठ नागरिक संघाने लोकांकडून जुन्या सायकली गोळा केल्या व त्या आदिवासी विभागातील मुलांना मोफत वाटल्या. नाशिक इथल्या संघाने दर वर्षी भाऊबीजेनिमित्त नाशिकजवळच्या आदिवासी पाडय़ांवर जाऊन तिथल्या स्त्रियांना साडीचोळीची भेट देतात. मुलांना खाऊ, खेळणी, कपडे वाटतात. ओंकार जे. ना. संघ गणेशोत्सवाच्या काळात वर्तमानपत्राच्या पिशव्या तयार करून त्या पिशव्या गणेशमूर्तीच्या विक्री केंद्रावर पाठवतात. बाप्पाच्या निर्माल्यासाठी त्यांचा वापर व्हावा यासाठी ही योजना. ‘लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे ठाणे व रायगड जिल्ह्य़ांतल्या ग्रामीण भागात दरवर्षी १२ ते १३ वैद्यकीय शिबिरं घेतली जातात. त्यात ग्रामीण व आदिवासी विभागांतील रुग्णांच्या काचबिंदू, डोळय़ांच्या पडद्याचे विकार व मोतीबिंदूसाठी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात. वाडा, मोखाडा, जव्हार इथल्या बत्तीस हजार ज्येष्ठ रुग्णांच्या शस्त्रक्रिया आजवर करण्यात आल्यात. लायन्स क्लबच्या मदतीने मिळालेल्या मोबाइल व्हॅनचे रूपांतर ‘बावीकर आय इन्स्टिटय़ूटने’ मोबाइल आय क्लिनिकमध्ये केले आहे. या फिरत्या रुग्णवाहिकेतील सुसज्ज प्रयोगशाळेत मोफत नेत्र तपासणी व रक्त तपासणीची सोय आहे. ग्रामीण व दुर्गम भागांतील रुग्णांसाठी त्याच्या नेत्र उपचारांसाठी ती वरदान ठरली आहे. असे अनेक ज्येष्ठ सेवक आज समाजात अबोलपणे कार्य करत आहेत.    
संपर्क
* डॉ. सुहास हळदीपूरकर-लक्ष्मी आय इन्स्टिय़ूट ०२२-२७४५२२२८  २७४५३१४७
* डॉ. बावीवर आय इन्स्टिय़ूट
०२२-३९९१८३००/३९९१८३९९
* सुनिती देव ९८२२ ५७७५६५
* सुरेश गुप्ते ९८७०२४१९५०
* कृष्णकांत जुवेकर ९८३३०१५८७७

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
pune digitization, digitization social and political documents pune
पुण्यातील दीडशे वर्षांच्या सामाजिक-राजकीय दस्तऐवजाचे ‘डिजिटायझेशन’; पुणे सार्वजनिक सभेचा पुढाकार, निधीची मात्र चणचण
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी