माझ्या मनात आलं, ‘माझ्या सतारीनं माझी अत्युत्कट इच्छा पूर्ण केली. तिनेच मला जग दाखवलं, माणसं मिळवून दिली.’ तळेगावच्या घरात बाभळीचं फर्निचर आहे – त्याच एका फळीवर ती किटली विराजमान आहे. आलेला प्रत्येक जण ती पाहतो आणि म्हणतो, ‘किती सुंदर!’ मी विचारतो, ‘ऐकायची तिची गोष्ट?..’
‘स तारक्ला’ (Meditation with Sitar)) हा मी एक सतारवादक म्हणून सादर करत असलेला एक कार्यक्रम. तळेगावला राहात असल्याने लोणावळा तसे जवळ. तिथे कैवल्यधाम नावाची प्रसिद्ध योग-संस्था आहे. त्या संस्थेत साधारण दोन वर्षांच्या काळात सत्तरहून अधिक कार्यक्रम मी सादर केले आहेत. या निमित्ताने माझ्या अनेक ओळखी झाल्या. अनेक स्नेहबंध निर्माण झाले. ‘झोरा’ त्यातलीच एक फ्रेंच मैत्रीण. महिना-दोन महिने तिचे तिथे वास्तव्य असल्यामुळे अनेक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहायची. नंतर नंतर तर ती आमच्या कुटुंबाची जणू सभासदच झाली.
 ती फ्रान्सला मायदेशी परतल्यानंतर काहीच दिवसांत मला पॅरिसला जायची संधी मिळाली. पॅरिसला तिथल्या महाराष्ट्र मंडळाने माझा सतारवादनाचा कार्यक्रम ठरविला तोही शहरातल्या कॅनॉलमधल्या एका बोटीत. त्या कारणाने पंधरवडय़ासाठी फ्रान्सला गेलो. मी येणार कळल्यावर झोरानं चक्क आणखी तीन कार्यक्रमांचे संयोजन केले. (ती राहात असलेल्या शहरात दोन आणि एक चक्कस्वित्र्झलडमध्ये!) स्ट्रासबूर्ग ते जिनिव्हा हा झोराबरोबर मी तिच्या काळ्या मर्सडिीझमधून केलेला अविस्मरणीय प्रवास! अप्रतिम सुंदर रस्ते, निसर्ग, वातावरण आणि गाडीत गप्पा मारत, नोरा जोन्स आणि निरनिराळे अरेबियन संगीत ऐकत केलेला हा प्रवास! जिनिव्हाच्या काहीसे अलीकडे ‘रोल’ नावाच्या गावी माझा कार्यक्रम होणार होता. एका घरगुती लॉजमध्ये आम्ही उतरलो. संध्याकाळी आम्ही झोराच्या एका मैत्रिणीच्या दुकानात गेलो. तिचं चहाचं दुकान होतं. ‘चहा’ या संबंधातल्या असंख्य गोष्टी त्या दुकानात होत्या. चहाचे जगभरातले असंख्य प्रकार होते. आत गेल्यावर झोराच्या मैत्रिणीने आमचं स्वागत केलं आणि दोघी मैत्रिणी हातात हात धरून गप्पा मारत बसल्या. मी तिची परवानगी घेऊन दुकान पाहात हिंडत होतो. असे दुकान मी प्रथमच पाहात होतो.
 त्या दुकानात ‘दार्जिलिंग’ चहाचेही बरेच प्रकार पाहून ‘आपल्या देशातला चहा’ असे वाटून मी सुखावलो. जपान, चीन व इतरही कुठले कुठले चहाचे प्रकार. सगळे आपल्याकडच्या तेलाच्या आकाराचे पण अत्यंत सुंदर डिझाइन्स, रंग असलेले अप्रतिम डबे! त्यात चहा. काही काचेच्या मोठ-मोठय़ा सुंदर बरण्या. अनेक प्रकारचे कप, बशा, टी-कोझी, गाळणी आणि असंख्य प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या, आकारच्या किटल्या! वेगवेगळ्या धातूंच्या, मातीच्या अशा अनेक.
माझी नजर एका अप्रतिम सुंदर किटलीकडे गेली. काळ्या रंगाची चपटी, गोल, छोटीशी मी सहज उचलून पाहिली तर खूपच जड! ती जपानी किटली होती. ओतीव लोखंडाची ती किटली पाहून मला ती घ्यावीशी वाटली, मोहच पडला तिचा. उचलली तेव्हा तिच्या खाली एक धातूची गोल चकती होती. त्यावर किंमत लिहिली होती ४० फ्रँक्स. मी ती किटली घ्यायची ठरवली.
किटली घेऊनच मी झोरा आणि तिच्या मैत्रिणीपाशी आलो. म्हणालो, ‘मला ही किटली घ्यायचीय.  खूप आवडलीय मला ती. कित्ती सुंदर आहे. ४० फ्रँक्स किंमत ना याची.’ मी भराभर बोलून टाकलं. त्यावर ती मैत्रीण म्हणाली, ‘४० फ्रँक्स ही त्या खाली ठेवायच्या प्लेटची किंमत आहे. किटली आहे २०० फ्रँक्सला.’ मी एकदम खट्ट झालो. भारतीय रुपयांत त्याचे रूपांतर केले तर जवळजवळ दहा हजार रुपये होत होते. माझा चेहराच बदलला. हिरमुसलोच.
ती म्हणाली, ‘‘घे की आवडली आहे तर, पैशांचा विचार नको करू. अशा गोष्टी एकदाच घेतो आपण’’  मी पुटपुटत म्हणालो, ‘‘नाही, नाही मला नाही जमणार..’’
मनात म्हटलं, ‘एवढय़ा पैशांत कितीतरी जणांसाठी कितीतरी वस्तू नेता येतील द्यायला आणि एवढे पैसे एका किटलीसाठी? नकोच.’ ती म्हणाली, ‘‘अरे घे, तुझ्या घरात पिढय़ान्पिढय़ा नांदेल ती. तुझी मुलगी तिच्या मुलीला सांगेल, तुझ्या आजोबांनी स्वित्र्झलडहून आणलेली जपानी किटली आहे ही’’  ती तारीफ करीत होती.
मला तर ती हवी होतीच, पण मध्यमवर्गीय द्वंदात मी अडकलो होतो. किंमत फार आहे, काय करावे, धाडस होत नव्हते. ती न घेता जाववतही नव्हते. ‘बघू, कार्यक्रमात सीडीज विकल्या गेल्या तर उद्या ठरवू घ्यायची की नाही ते’, असा विचार करून मी थांबलो, पण तिचे रूप आणि स्पर्श मोहवत होते..
झोराने तिला एव्हाना मी सतारवादक आहे, कार्यक्रम करतो वगैरे सांगितले आणि माझी एक सीडी तिला भेट म्हणून मला विचारून दिली. त्या दुकानात आधी कसलेसे वाद्य संगीत सुरू होते. माझी सीडी मिळाल्यावर आत एका पँट्रीत आम्ही गेलो आणि सीडी प्लेयरवर तिने माझी सीडी लावली. त्या वेळी मी, ती व तिच्या दुकानात काम करणारी असे तिघंच होतो. सीडी लावल्यावर सुरुवातीलाच सतारीचा छान तंबोऱ्यासारखा आवाज, मग ‘यमन’ मध्ये लावलेल्या तरफेच्या तारा छेडलेल्याचा आवाज आणि
पहिली फ्रेज वाजवल्यावर त्या दोघी अक्षरश: अचंबित होऊन एकमेकांकडे आणि माझ्याकडे पाहू लागल्या. ‘कोणते वाद्य आहे हे? हे तू वाजवलंस ?’’ विस्फारित नजरेनं त्या म्हणाल्या. सतारीचा नाद त्या प्रथमच ऐकत होत्या. मला खूप आनंद झाला. ‘किती सुंदर!’ म्हणत ती म्हणाली, ‘‘खूपच सुंदर भेट मिळाली मला. असं कर आणखी दहा सीडीज दे मला. मी त्या दुकानात ठेवते, विक्रीसाठी, सांगेन सगळ्यांना, भारतीय चहा पिताना हे संगीत ऐका. ’’ मी म्हणालो, ‘जरूर.’ तेवढय़ात झोरा आत आली. म्हणाली, ‘१० युरो किंमत आहे त्याची.’  मी लगेच म्हणालो, ‘‘थांब आपण असं करू, मी तुला १० सीडीज देतो तू मला ती किटली दे ’’ ती म्हणाली, ‘अगदी आनंदानं.’ आणि अगदी सहजपणे मला ती किटली मिळाली.
 माझ्या मनात आलं, माझ्या सतारीनं माझी अत्युत्कट इच्छा पूर्ण केली. तिनेच मला इथे आणलं, जग दाखवलं, माणसं मिळवून दिली. त्या रात्री ती मैत्रीण माझ्या कार्यक्रमाला आली. तिला खूप आवडला मी वाजवलेला ‘मालकंस’. दुसऱ्या सकाळी मला तिच्याकडून ब्रेकफास्टचं निमंत्रण मिळालं. त्याच दुकानात परत गेलो. तिनं ती किटलीच्या खाली ठेवलेली ४० फ्रँकची प्लेट मला सप्रेम भेट म्हणून दिली. काल द्यायची राहिली, म्हणत. त्या किटलीबरोबर दोन बिन कानांचे, जड, लोखंडी कप होते, प्रत्येकी २५ फ्रँकचे. झोरा म्हणाली, ‘विदुर घरी परतेल तेव्हा त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे, हे दोन कप माझ्याकडून भेट.’
अशा तऱ्हेने तो पूर्ण संच मला मिळाला..
आज तळेगावजवळ आमचं ‘मैत्रबन’ उभे आहे. एक अप्रतिम सुंदर वास्तू. हॉलमध्ये बाभळीचं फíनचर आहे- त्याच एका फळीवर ती किटली आहे. आलेला प्रत्येक जण ती पाहतो आणि म्हणतो,     ‘किती सुंदर!’ मी विचारतो ऐकायची तिची गोष्ट?..
आणि मग आम्ही चहा पिता-पिता उत्साहानं हा प्रसंग पुन: पुन्हा सांगताना पुन: पुन्हा आनंदित होतो.