प्रेमाताई घरी आल्या आणि त्यांना नवीन वस्तू दिसली की लगेच विचारतात, ‘कोणी दिली गं?’ आपण जर सांगितलं, ‘कोण दिली नाही मीच घेतली’ त्यावर त्यांच्या नेहमीच्या सवयीने प्रश्न येतोच, ‘केव्हढय़ाला घेतली?’ किंमत विचारल्याशिवाय त्या बाईंना चैनच पडत नाही..
मा झ्या नातीने एकदा मला फार सुंदर फ्लॉवरपॉट भेट दिला. बघितल्याबरोबर त्याच्या गमतीदार आकाराने मोह घातला. एका बाजूने पाहिलं तर एक सुंदर स्त्री नृत्याची बाकदार पोझ घेऊन थोडी वाकली आहे, असं वाटत होतं तर सरळ दिशेने पाहिलं तर कोयरीच्या आकाराचा सुंदर आणि आकर्षक फ्लॉवरपॉट दिसत होता. आता हा फ्लॉवरपॉट कोणाला तरी दाखवून त्या व्यक्तीचं ‘किती सुंदर?’ हे वाक्य कधी ऐकीन असं मला झालं. मी माझ्या जवळच राहणाऱ्या मैत्रिणीला फोन लावला. तिला म्हटलं, ‘अगं सुले, मला माझ्या नातीने इतका सुंदर फ्लॉवरपॉट दिलाय की मी सांगूच शकत नाही फोनवर, येतेस का बघायला?’ ती माझ्यापेक्षाही अधिक सुंदर सुंदर वस्तूंची चाहती. मला म्हणाली, ‘दहा मिनिटांत येते’ आणि खरोखरच दहा मिनिटांत हजर!
फ्लॉवरपॉट बघून झाला. कौतुक झालं, मग म्हणाली, ‘अगं, परवा मी नीताकडे गेले होते, तिनेपण सुंदर आकाराची बरणी आणली होती. मी सहजच विचारलं, ‘अगं कुठे घेतली ही बरणी! मी पण आणेन अशीच.’ तर एखाद्या चांदीची नक्षी असलेल्या बरणीबद्दल बोलावं तशा राखीव आवाजात म्हणाली, ‘अगं, अशा बरण्या फक्त मुंबईलाच मिळतात, इथे नाही.’ दुसऱ्या दिवशी मी संक्रांतीचा बाजार करायला गेले तर ढिगाने तशा बरण्या बाजारात मांडलेल्या होत्या.’ आमच्या वस्तू दुसरीकडे असूच शकत नाही किंवा असायला नको अशा प्रकारच्या विचित्र स्वभावाने मिळणारा खोटा आनंद नीताला किती दिवस सुख देईल? हे मला लक्षात येईना.
एकदा मला माझ्या धाकटय़ा नणंदेनं, एक सुंदर पुस्तक आणलं. एका इंग्रज तरुणाने मुस्लिम स्त्रीशी लग्न केल्यामुळे तिच्या वाटय़ाला आलेले सामाजिक दु:ख तिने फार सुंदर रीतीने चितारलं होतं. मला तिचं हे ‘गिफ्ट’ फार आवडलं. पण माझी मोठी नणंद म्हणाली, ‘अगं तू  प्राध्यापक आहेस म्हणून तुला ते आवडलं, मी पण ते पुस्तक वाचलं, पण मला त्या स्त्रीच्या अत्याचाराचे प्रसंग सोसलेच नाहीत, उलट वाटलं, ‘माझ्या दोन मोठय़ा होणाऱ्या मुली आहेत, त्यांच्या हातात हे नकोच द्यायला.’ मग मीच तिला म्हटलं, ‘ताई, जो कोणी भेटवस्तू देतो तो आपण ती भेटवस्तू कोणाला, केव्हा आणि कशासाठी देतो हा विचार करूनच देत असतो नं!’
 ‘काही सांगू नकोस. काही बायका, घरातल्या कार्यात दोन, तीन सारख्याच वस्तू आल्या तर त्यातली एक देऊन टाकतात, मग ती वस्तू, तिथे देणे योग्य आहे की नाही याचाही विचार करत नाहीत.’
आमच्याकडे काम करणाऱ्या मालतीबाई दोन दिवसांच्या रजेनंतर काम करायला आल्या. त्यांना मी म्हटलं, ‘काय? गावाला गेला होतात का?’  तेव्हा मला लगेच उत्तर न देता त्या तरातरा आपल्या हातातली ओटय़ावर ठेवलेली पिशवी घेऊन आल्या आणि म्हणाल्या, ‘गावाला नाही, लग्नाला गेले होते.’ पहा, त्यांनी मला लग्नात काय दिलं? ही एवढीशी ताटली आणि वाटी! आता सांगा, एवढय़ा दोन गाडय़ा दारात असणाऱ्या बाईला, हे देणं शोभलं का?’
मी विचार केला, एका दृष्टीने या बाईचं बरोबर आहे. स्वत:ला ऐपत नसेल तर गोष्ट वेगळी, पण भलतंच काही देऊन औदार्याचा देखावा करण्यात काय अर्थ आहे? त्या भेटवस्तू बरोबर देणाऱ्या बाईचीही किंमत शून्य होते नाही का?
आमच्याकडे येणाऱ्या प्रेमाताईंची वेगळीच गोष्ट आहे. त्या घरी आल्या आणि त्यांना नवीन वस्तू दिसली की लगेच विचारतात, ‘कोणी दिली गं?’ आपण जर सांगितलं, ‘कोण दिली नाही मीच घेतली’ त्यावर त्यांच्या नेहमीच्या सवयीने प्रश्न येतोच, ‘केव्हढय़ाला घेतली?’ किंमत विचारल्याशिवाय त्या बाईंना चैनच पडत नाही. काही लोकांना किमतीची चौकशी करणे, मग किमतीच्या मानाने ही वस्तू चांगली की बरी? असे हिशोबी प्रश्न पडतात. माझी सून नेहमी म्हणते, ‘आई, कोणाच्याही घरी असलेली वस्तू आवडली तरी किंमत कधी विचारू नये, वाटल्यास कोणत्या दुकानातून वस्तू आणली? एव्हढेच विचारून घ्यावं. स्वत:च्या खरेदीसाठी ते सुलभ होईल.’
एकदा आमच्याकडे आलेल्या एका जोडप्याला आमचा देव्हारा फार आवडला. त्यांनी विचारलं, ‘केव्हढय़ाला घेतला हा देव्हारा? माझ्या मुलाने तो देव्हारा आणला होता. त्यात देव ठेवून मी पूजा केली. पण किंमत काही त्याला विचारली नव्हती. किंबहुना मला ते इतकं महत्त्वाचं वाटलं नाही, ती बाईपण? काय बाई आहे ही. इतकंही माहीत नाही.’ अशा चेहऱ्याने माझ्याकडे बघू लागली. खरं सांगायचं तर आम्ही घरात चारच माणसं. प्रत्येक जण आपल्याला आवडेल ते हौसेने घरात आणत असतो. आणणाऱ्याला त्याची किंमत विचारतही नाही. किंबहुना घरात कोणतीही वस्तू आणली तर तिची किंमत विचारून ‘अधिक उण्या’ विचाराला थारा देऊ नये, असं मलाही वाटतं. देण्याघेण्याच्या वस्तूंची आर्थिक शहानिशा न करण्याने मला फार वेगळा अनुभव आला! आमच्याकडे येणाऱ्या एका पाहुण्याने घरात अंथरलेला गालिचा पाहून विचारलं, ‘केव्हढय़ाला घेतला’, मी अंदाजेच ‘साडेपाचशे रुपयाला,’ असं सांगितलं. आणि त्या पाहुण्याने खिशातून पाकीट काढलं, माझ्या हातावर साडेपाचशे रुपये ठेवले! आणि म्हणाले, ‘माझ्यासाठी संध्याकाळपर्यंत हा गालिचा आणून ठेवाल का? मी काम झाल्यावर घरी जाताना घेऊन जाईन?’ आपण आणलेला गालिचा या माणसाला आवडला याचा आनंद बरोबर घेऊन मी गालिचा घ्यायला दुकानात गेले. आम्ही घेतलेल्या गालिच्यासारखा गालिचा तिथे होता तो घेतला आणि किंमत विचारली तर त्या माणसाने ‘एक हजार दोनशे’ अशी किंमत सांगितली. आपल्याला कोणी, ‘किंमतही माहीत नाही’ असं म्हणू नये म्हणून सांगितल्या किमतीपेक्षा अधिक पैसे भरून मी तो गालिचा आणला आणि ‘इतक्या चार, आठ दिवसांतच गालिचा महाग कसा झाला?’ वगैरे घरी उगवणारे तिरकस प्रश्न टाळले.
तेव्हापासून किमतीची शहानिशा करत बसण्यापेक्षा हा प्रश्न फक्त आपल्या खासगी जीवनासारखा आपल्यापुरता ठेवावा असा सुविचार मी शिकले.