दिवाळीच्या फराळाचे पदार्थ हल्ली वर्षभर केव्हाही विकत मिळतात. म्हणून काही जणांना लाडू-चिवडय़ासारखे पदार्थ वेगळ्या पद्धतीने करून बघायचे असतात. काहींना नवीन काही तरी करायचं असतं. त्यांच्यासाठी वैद्य खडीवाले यांनी सिद्ध केलेल्या काही रेसिपी.

नायलॉन पोहय़ांचा चिवडा

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

ruchkar-11साहित्य : अर्धा किलो नायलॉन पोहे, १ कप भाजून सोललेले दाणे, अर्धा कप खोबऱ्याचे अतिशय पातळ काप, १ कप डाळ, ६-७ हिरव्या
मिरच्या, कढीलिंबाची अर्धा कप पानं धुऊन, पुसून, चिरून, मीठ, पिठीसाखर, जिरेपूड, नेहमीची जास्त हिंग घातलेली फोडणी, थोडं साजूक तूप.

कृती : पूर्वतयारी करून ठेवा. हे पोहे फार नाजूक असतात. म्हणून शक्यतो, मायक्रोवेव्हमध्ये भाजून घ्या. खोबरं, दाणे, डाळं तळून घ्या. तुपाची फोडणी बनवून त्यात मिरच्या, कढीलिंब परता. पोहे, डाळ, दाणे, खोबरं, जिरेपूड, मीठ, साखर इ. घालून चांगलं ढवळून घ्या. (गॅस बंद ठेवा) गार झाल्यावर डब्यात भरा.

नाशिकचा चिवडा

ruchkar-24साहित्य : अर्धा किलो भाजके पोहे, अर्धा कप डाळ, खोबऱ्याचे काप, १ कप शेंगदाणे, स्लाइस करून उन्हात वाळवलेला कांदा, अर्धा कप काळा मसाला, २ चमचे तिखट, मीठ, ७ – ८ आमसुलं, धने-जिरे पूड, पिठीसाखर, बारीक चिरलेला लसूण, २ चमचे आल्याचा कीस, २ चमचे तेल, फोडणीचे साहित्य.

कृती : तेल तापवून, कांदा लालसर तळून घ्या. दाणे, डाळ, खोबरं तळून घ्या. आमसुलं कुरकुरीत तळा. आलं, लसूण तळा. (आमसुलं, आलं, लसूण वाटून घ्या.) फोडणी बनवून त्यात आमसूल इ. वाटलेला मसाला परता. धने-जिरे पूड, थोडी लवंग, दालचिनीची पूड घाला. गॅस बंद करून, पोहे घालवून कालवा. तळलेला कांदा हाताने चुरून मिसळा. हा चिवडा अतिशय खमंग लागतो. हा चिवडा भाजक्या पोह्यंचा असल्याने लो-कॅलरीचा म्हणता येईल.

रवा-बेसनाचे लाडू

ruchkar-27साहित्य : १०० ग्रॅम रवा, १ वाटी बेसन पीठ, १ वाटी साखर व सुकामेवा, बदाम- जायफळ, काजू, खिसिमिस, एक वाटी साजूक तूप.
कृती : आधी बेसन पीठ भाजून घ्यावे. नंतर खवा लालसर भाजून घ्यावा. त्यानंतर गार झाल्यावर त्यामध्ये पिठीसाखर मिसळावी. चवीसाठी जायफळ, वेलची पावडर, बदाम, काजू यांची पूड करून लाडवामध्ये मिसळावी. याचे लाडू बांधताना वरून साजूक तूप टाकून हव्या त्या आकाराचे लाडू वळावेत.
– कौमुदी उमरीकर

कणकेचे लाडू
ruchkar-28साहित्य : ४ वाटय़ा कणीक, १ वाटी सुके खोबरे किसून बारीक करून, ३ वाटय़ा चिरलेला गूळ, पाव टी स्पून जायफळाची पूड, २ चमचे खसखस भाजून केलेली पूड, अडीच वाटी साजूक तूप.कृती : प्रथम खोबऱ्याची बारीक केलेली पूड नुसतीच थोडी भाजावी. नंतर तुपावर कणीक मंद आचेवर खमंग भाजावी. खाली उतरवून त्यात भाजलेले खोबरे, खसखस, जायफळ पूड, गूळ घालून हाताने एकसारखे करून लाडू वळावेत. कोरडे वाटल्यास आणखी तूप घालावे. पटकन होण्यासारखे व पौष्टिक आहेत

खजुराचे लाडू
ruchkar-29साहित्य : खजूर १ वाटी बिया काढून, दाणेकूट अर्धीवाटी, २ ते ३ बदाम, २ ते ३ काजू, दोन वेलदोडय़ांची पूड, १ चमचा तीळ भाजून, अर्धा चमचा खसखस भाजून, पिठीसाखर पाव वाटी, सुके खोबरे खवून ३ ते ४ चमचे.
कृती : सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्यावे. खजुरामुळे ते मऊ होते. जास्त बारीक दळू नये. हाताने मळून लाडू वळावेत. त्यावर काजू लावावा व तो लाडू खवलेल्या खोबऱ्यात घोळवावा. हा लाडू रोज जेवणानंतर एक खाल्ल्यास अशक्तपणा कमी होतो. शरीरात लोहाचे प्रमाण वाढते. डोळ्यांसाठी उपयुक्त. कमीत कमी १ ते २ महिने खावेत.

भाजणी चकली
ruchkar-30साहित्य : २ वाटी चकली भाजणी, भाजणी पीठ, तेल, तूप, तिखट, मीठ, हळद, ओवा, पांढरे तीळ, दीड वाटी गरम पाणी, पाव वाटी तूप, २ चमचे तिखट, १ चमचा ओवा, एक चमचा पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : सर्वप्रथम तूप फेसून घेणे व नंतर त्यात सर्व साहित्य घालून भाजणी पीठ कोमट पाण्यात भिजवणे व लगेचच चकली करायला घेणे व मंद गॅस करून चांगल्या तांबूस रंगावर तळून घेणे. (तूप फेसल्यामुळे मोहन घालू नये.)

चकलीची भाजणी
साहित्य : तांदूळ दोन किलो, एक किलो हरभरा डाळ, अर्धा किलो उडीद डाळ, धने १०० ग्रॅम, जिरे ५० ग्रॅम.
कृती : तांदूळ स्वच्छ निवडून धुवावेत व कपडय़ावर वाळत घालावेत. हरभरा डाळ व उडीद डाळ वेगवेगळी धुऊन कपडय़ावर वाळत घालावी. सर्व जिन्नस एक दिवसभर चांगले वाळले, की दुसऱ्या दिवशी कढईमध्ये मंद आचेवर हलक्या गुलाबी रंगावर भाजावेत. धने भाजून त्यात मिसळावे व जिरे न भाजता तसेच मिसळावे.

तांदळाच्या पिठाच्या चकल्या
ruchkar-32साहित्य: तांदळाचं पीठ २ वाटय़ा, हिंग पाव चमचा, धने- जिरे पूड एक चमचा, लोणी पाव वाटी, पांढरे तीळ, ओवा, मीठ चवीप्रमाणे तेल, तिखट अर्धा चमचा.
कृती : तांदळाच्या पिठात हिंग, धने- जिरे पूड, तीळ, ओवा, तिखट मीठ व लोणी घालून हाताने मिसळून घ्या. जरुरीप्रमाणे साध्या पाण्याने पीठ घट्ट भिजवून चकल्या करा व तेलात तळा.

चकली (कणकेची)
ruchkar-35
साहित्य : गव्हाचे पीठ, तिखट, मीठ, हळद, तीळ व तळणीसाठी तेल.
कृती : गव्हाचे पीठ फडक्यात पुरचुंडी बांधून कुकरमध्ये ठेवून तीन शिटय़ा काढून वाफवून घ्यावे. ती कणीक गार झाल्यावर मोकळी करून त्यात वरील साहित्य घालावे व चांगले मळावे व चकल्या तळाव्यात. आयत्या वेळेस करता येते. खायला कुरकुरीत होतात. त्यात घालायला तेल लागत नाही. स्वादिष्ट होतात व सर्वाना आवडतात.

तांदळाच्या पिठाची कडबोळी
ruchkar-33साहित्य : तांदळाचं पीठ २ वाटय़ा, हिंग पाव चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, लोणी पाव वाटी, मीठ चवीप्रमाणे, पीठ भिजविण्यासाठी निरसं दूध, तिखट अर्धा चमचा, कलौंजी (कांद्याचं बी) अर्धा चमचा, तळण्यासाठी तेल.कृती : तांदळाच्या पिठात हिंग, जिरेपूड, तिखट, कलौंजी, मीठ व लोणी घालून हाताने मिसळून घ्या. जरुरीप्रमाणे दूध घालून पीठ घट्ट भिजवा. कडबोळी वळून तेलात तळा.
टीप : सोऱ्याबरोबर कडबोळ्यासाठीही एक ताटली येते. त्यातून कडबोळी केल्यास आतून छान पोकळ कडबोळी होतात.

तिखट शंकरपाळे
ruchkar-38साहित्य : २ वाटय़ा गव्हाचे पीठ, दीड चमचा साखर, थोडी हळद, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा जिरे, तेल.
कृती : गव्हाच्या पिठात तिखट, मीठ, हळद, जिरे एकत्र करून पाणी घालून घट्ट पीठ भिजवावे. गोळे करून पातळ पोळी लाटून कातणीने बारीक शंकरपाळ्या कापाव्यात व मंद गॅसवर तेलात लाल रंगावर तळाव्यात.
खारे शंकरपाळे
साहित्य :
५०० ग्रॅम मैदा, २ चमचा कलौंजी, १ चमचा बडीशेप, पाव चमचा मेथी, दीड चमचा खायचा सोडा, २ टे. स्पून तुपाचे मोहन, मीठ व थोडी साखर.
कृती : कलौंजी, बडीशेप व मेथी भाजून पूड करावी. मैदा, कडकडीत तुपाचे मोहन व इतर वस्तू एकत्र करून गरम करून पाण्याने पीठ भिजवावे. नंतर चांगले मळून या पिठाच्या पोळ्या लाटून घ्याव्यात व नेहमीप्रमाणे शंकरपाळे करावेत व तुपात तळावेत.

कडबोळी
ruchkar-26साहित्य : पाव किलो तांदळाचे पीठ, चार-पाच चहाचे चमचे लाल मिरची पूड, अर्धी वाटी दुधाची साय, ५० ग्रॅम लोणी, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल किंवा तूप, थोडे दूध.
कृती : तांदळाच्या पिठात अर्धी पळी उकडते तेल ओतावे. नंतर साय, तिखट, लोणी, मीठ वगैरे घालून पीठ चांगले फेसून दुधात मळून घ्यावे. पोळपाटावर पेढय़ाएवढी गोळी घेऊन त्याची कडबोळी करावी व तेलात किंवा तुपात तळावीत.

जाड पोह्य़ांचा चिवडा
ruchkar-37साहित्य : जाड पोहे २ वाटय़ा, तळणीसाठी तेल, फोडणीचे साहित्य, मीठ, धने-जिरे पूड, शेंगदाणे, पंढरपुरी डाळ, पिठीसाखर.
कृती : प्रथम तेलात जाड पोहे तळून घ्यावेत. नंतर त्याच तेलात शेंगदाणे, पंढरपुरी डाळ तळून घ्यावी. थोडय़ा तेलात फोडणी करावी व गार झाल्यावर तळलेल्या पोह्य़ावर ओतावी. त्यात शेंगदाणे, डाळ, धने-जिरे पूड, मीठ, पिठीसाखर हे सर्व जिन्नस घालून एकत्र कालवावे/ हलवावे. हा चिवडा गार झाल्यावर डब्यात भरून ठेवावा.

मुगाच्या पिठाचे पौष्टिक लाडू
ruchkar-34साहित्य : २ कप मुगाची डाळ स्वच्छ धुऊन, १०-१५ मिनिटे भिजवून, फडक्यावर वाळवून घ्या व मग भाजा, रवाळ दळून घ्या.
कृती : साजूक तुपावर रवाळ पीठ भाजून घ्या. पीठ फार बारीक दळल्यास लाडू खाताना टाळ्याला चिकटतो, म्हणून ‘भुरी शक्कर’ घालून वळा. भुरी साखर अशी बनवा- दीड कप साखर व १ कप पाण्याचा पाक करत ठेवा. २ थेंब लिंबाचा रस व १ चमचा तूप घाला. पाक पक्का झाल्यावर गॅस बंद करा. ही साखर मिक्सरमध्ये दळून वापरा. या साखरेमुळे लाडू खमंग लागतो. मऊ केलेला गूळ घालूनही लाडू बनविता येतील. डाळीचं पीठ वरील पद्धतीने केल्यास लाडू पचायला हलका होतो. (लिंबाचा रस घातल्याने साखर स्वच्छ होईल.)
* पाक परातीत घालून जड भांडय़ाने घोटल्यासारखे केले तरी पांढरीशुभ्र साखर मिळेल.

पंजाबी लाडू
ruchkar-31साहित्य : १ कप रवा, १ कप कणीक, अर्धा कप बेसन, सव्वा कप तूप, पाव किलो खवा, बुरा शक्कर आवडीनुसार घाला. ५० ग्रॅम डिंक तळून, काजू, बदाम तळून त्याची २ शकलं दूर करा. खरबुजाच्या बिया ४ चमचे तळून.
कृती : तुपात बदाम, काजू, मगज तळून घ्या. त्याच तुपात रवा, कणीक, बेसन भाजा. थोडं भाजल्यावर खवा घालून थोडं भाजा. थंड करून साखर घाला. तळलेला डिंक किंवा ड्रायफ्रूट इ. घाला. लहान-लहान लाडू वळा. हे लाडू थंडीच्या दिवसांत बनवतात. (तूप जास्त लागल्यास घाला.)

शंकरपाळे नवीन रूपात
ruchkar-38साहित्य : पाव किलो मैदा, २-४ चहाचे चमचे तेलाचं मोहन, २०० ग्रॅम चक्का, १०० ग्रॅम पिठीसाखर.
कृती : चक्का व पिठीसाखर चांगली एकजीव करावी आणि शंकरपाळ्याची कणीक मळून होईपर्यंत फ्रिजमध्ये ठेवावी. एका छोटय़ा कढईत कडकडीत मोहन करून घ्यावं आणि ते मैद्यामध्ये एकत्र करून कणीक मळून घ्यावी. छोटे गोळे करून प्रत्येक गोळा आकारानं पातळ आणि लांबट लाटून घ्यावा. लाटलेली एक पोळी घेऊन त्यावर दुसरी लाटलेली पोळी ठेवावी. त्याच्या कडांना थोडंसं पाणी लावून सील करून घ्यावं. शंकरपाळ्यांच्या कातणाने चौकोनी आकार कापावेत. तेल गरम करून शंकरपाळे खरपूस तळावेत. वरून थोडी पिठीसाखर भुरभुरावी.

भाजक्या पोह्य़ाचा चिवडा
ruchkar-39साहित्य : २ किलो भाजके पोहे, अर्धा किलो भाजून घेतलेले शेंगदाणे, आतपाव किलो पंढरपुरी डाळ, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, १०/१२ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा काळा मसाला, २ चमचे धने-जिरे पूड, कढीपत्ता, मीठ, तेल ३ वाटय़ा, फोडणीचे साहित्य, चिमूटभर खटाई, अर्धी वाटी पिठीसाखर.
कृती : प्रथम हिंग, जिरे, मोहरी घालून फोडणी करावी. त्यात मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता घालावा. नंतर खोबऱ्याचे काप घालून परतावे. मग दाणे व डाळ घालावी. धने, जिरेपूड, काळा मसाला, मीठ चवीपुरते घालून परतावे. नंतर पोहे घालून ढवळावे. पातेले मोठे असावे. थोडी खटाई व पिठीसाखर घालावी. हलवून एकसारखा करावा. छान लागतो.

म्हैसूर पाक
ruchkar-42साहित्य : ३ लहान वाटय़ा ताजे बेसन, ३ वाटय़ा साखर, ५ वाटय़ा तूप, वेलदोडे पूड अर्धा चमचा, थोडे बदामकाप.
कृती : २ मोठा चमचा तूप डाळीच्या पिठाला चोळा व मंद गॅसवर थोडे भाजा. दुसरीकडे २ वाटय़ा पाणी व ३ वाटय़ा साखरेचा पाक करा. त्यात भाजलेले बेसन घाला व घोटा. दुसऱ्या गॅसवर तूप गरम करत ठेवा. दर २ मिनिटांनी ३ मोठे चमचे गरम तूप बेसनात घालत राहा. साधारण १ वाटी तूप उरेपर्यंत तूप घालून हलवत राहा. बेसनाचे मिश्रण चौकोनी ट्रेमध्ये घालून हलवा. म्हणजे सगळीकडे सारखे पसरेल. आता पातेल्यात उरलेले १ वाटी गरम तूप पूर्ण म्हैसूरपाकावर ओता, असे केल्याने जाळी छान पडते.

ओल्या नारळाच्या करंज्या
ruchkar-40करंजीची पारी करायचे साहित्य : २ कप मैदा, २ मोठे चमचे पिठीसाखर, ५ मोठे चमचे फ्रिजमधील थंड साजूक तूप, एक चिमूट मीठ, २-३ मोठे चमचे फ्रिजमधील थंड पाणी, २ मोठे चमचे वितळलेले तूप (करंजीवर लावण्यासाठी).
करंजीच्या सारणासाठी लागणारे साहित्य : २ कप खोवलेला ओला नारळ, ४ मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क, २ मोठे चमचे पिठीसाखर, ३ मोठे चमचे पिस्त्याची भरड, १/४ लहान चमचा वेलदोडय़ाची पूड, एक चिमूट केशर.
कृती : प्रथम सारण करण्यासाठी नारळ, कंडेन्स्ड मिल्क, पिठीसाखर, पिस्त्याची भरड, वेलदोडय़ाची पूड आणि केशर काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भांडय़ात एकत्र करावे. मायक्रोवेव्हमध्ये एक मिनिटभर शिजवावे. नंतर बाहेर काढून एकजीव करावे व पुन्हा तीस सेकं द मायक्रोवेव्हमध्ये ठेवावे. शिजल्यावर सारण एकजीव झाले पाहिजे; फार ओलसर वाटल्यास आणखीन तीन सेकंद शिजवावे. मग गार करण्यास बाजूला ठेवावे. पारी करायला मैदा, तूप, पिठीसाखर आणि मीठ एकत्रित मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमध्ये ठेवून ‘पल्स’ करावे (क्षणभर फिरवावे.) असे केल्यास मिश्रण पावाच्या चुऱ्यासारखे दिसू लागेल.
आता त्यात एक-एक करून २-३ मोठे चमचे अगदी थंडगार पाणी घालून पुन्हा पल्स करावे. मिश्रण जरा एकत्र येऊ लागेल. दिसायला कोरडे दिसले तरी त्यात आणखी पाणी घालू नये. लाटताना पीठ एकत्र येईल. अर्धवट एकत्र आलेले पीठ क्लिंग फिल्म किंवा प्लास्टिकमध्ये घट्ट बांधून, थोडे चपटे करून फ्रिजमध्ये २०-२५ मिनिटे ठेवावे. मग त्याचे लिंबाएवढे भाग करून प्रत्येक भाग प्लास्टिकच्या दोन कागदांमध्ये लाटावा. त्याच्या मधोमध दोन लहान चमचे सारण ठेवावे आणि कागदाच्या आधाराने पारी दुमडावी. कडा दाबून कातण्याने कापावे. अशा सगळ्या करंज्या करून घ्याव्यात. बेकिंग ट्रेवर तूप लावावे किंवा बटरपेपर लावावा. त्यावर करंज्या ठेवाव्यात. ओव्हनमध्ये १७५ डिग्री तापमानावर करंज्या १५-२० मिनिटे भाजाव्यात. मग त्या बाहेर काढून त्यावर वितळलेले तूप लावावे आणि पुन्हा ५-१० मिनिटे करंज्या भाजाव्यात. तयार झाल्यावर त्यांचा रंग गुलाबी होतो आणि करंज्या खुसखुशीत होतात. गार करून डब्यात भराव्या; फ्रिजमध्ये आठवडाभर टिकतात.

हरभरा डाळीच्या रव्याचे लाडू
ruchkar-44साहित्य : हरभरा डाळ, १ वाटी साजूक तूप, नारळ, दूध, २ वाटय़ा साखर, वेलदोडय़ाची पूड, बदाम, बेदाणे, काजू, इ.
कृती : १ किलो हरभरा डाळीचा रवा काढून तो चाळून घेणे. २ वाटय़ा रवा १ वाटी कढत तुपात घालून त्यालाच थोडे दूध लावून ठेवणे. २ तासांनी रवा तुपावर चांगला भाजणे. भाजत आल्यावर त्यात खवलेला नारळ घालून परतणे, ताटात रवा काढून ठेवणे.
पाक- २ वाटय़ा साखर घालून चिकट पाक करणे. त्यातच वेलचीची पूड, बेदाणे, काजू टाकून रवा घालणे. झाकून ठेवून थोडय़ा वेळाने लाडू वळणे.
– नीता तेलंग

कलिंगडचा हलवा
ruchkar-43साहित्य : अर्धी वाटी कलिंगडाचा पांढरा कीस, एक वाटी साखर, पाव वाटी दुधाची पावडर, थोडे तूप.
कृती : कलिंगडाचा तांबडा भाग काढून घ्यावा. पांढरा भाग किसून घ्यावा. घट्ट पिळून पाणी काढावे व तो कीस कढईत तुपावर मंद गॅसवर परतावा. नंतर थोडी दुधाची पावडर व साखर घालून हलवावे. साखरेचा पाक होतो. मिश्रण कोरडे व्हायला लागले, की गॅस बंद करावा व आवडीप्रमाणे त्यात ड्रायफ्रूट वगैरे घालावे. चवीला हा हलवा चांगला लागतो.
– आसावरी अनिल खेडलेकर

भोपळय़ाच्या वडय़ा
ruchkar-41साहित्य : दोन मोठय़ा वाटय़ा तांबडय़ा भोपळय़ाचा कीस, आंब्याचा सीझन असेल तर एक हापूसचा आंबा किंवा ४ टे. स्पून मँगो जॅम, ३ वाटय़ा साखर, ७-८ वेलदोडय़ाची पूड, थोडी जायफळ पूड, १०० ग्रॅम खवा, थोडे तूप, थोडी पिठीसाखर.
कृती : तांबडय़ा भोपळय़ाचा कीस मोदकपात्रात चाळणीवर ठेवून वाफवून घ्यावा. खवा थोडय़ा तुपावर भाजून घ्यावा व बाजूला ठेवावा. शिजलेला भोपळय़ाचा कीस, आंब्याचा रस किंवा मँगो व साखर एकत्र करून शिजवावे. मिश्रण घट्ट व्हायला लागले की त्यात भाजलेला खवा, वेलची व जायफळ पूड घालून ढवळावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की विस्तवावरून खाली उतरावे, जरा घोटावे. थोडी पिठीसाखर घालून घोटावे व तूप लावलेल्या थाळीत थापावे. गार झाल्यावर वडय़ा कापाव्यात. प्रत्येक वडीच्या मध्यभागी एक चारोळी लावून शोभिवंत करावे.

पौष्टिक हलवा
साहित्य : कपभर खजुराचा गर, एक कप दूध, अर्धा कप तूप, काजू, १० पिस्ते, साखर, थोडी वेलची.
कृती : खजुराचे लहान तुकडे करून दूध, खजूर, साखर शिजवा. उकळी आल्यावर तूप सोडा. थोडे काजू त्यात सोडा. मिश्रण आटल्यावर उतरवा. आता त्यात उर्वरित काजू पिस्ते व वेलची घाला. स्वादिष्ट, पौष्टिक हलवा तयार होईल.
वैद्य खडीवाले – response.lokprabha@expressindia.com