हैदराबादमध्ये कुटुंबाच्या प्रगतीसाठी ६८ दिवसांचा उपवास करणा-या १३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. आराधना असे या मुलीचे नाव असून ३ ऑक्टोबररोजी तिचे ६८ दिवसांचा उपवास संपला होता.
चेन्नईतील एका धर्मगुरुने लक्ष्मीकांत सासडिया यांना मुलीला चातुर्मासचे उपवास करायला सांगा असा सल्ला दिला होता. यामुळे तुमचे व्यवसायात झालेले नुकसान तर भरुन निघेल आणि तुम्हाला घसघशीत नफाही मिळेल असे लक्ष्मीकांत यांना सांगण्यात आले होते. यानंतर लक्ष्मीकांत यांनी १३ वर्षाची मुलगी आराधनाला उपवास करायला लावले होते. आराधनाने तब्बल १० आठवडे उपवास केला. ३ ऑक्टोबरला तिचा उपवास संपला. उपवास संपला त्या दिवशी लक्ष्मीकांत यांनी घरात महाप्रसाद ठेवला होता. या कार्यक्रमाला तेलंगणचे एक मंत्रीदेखील उपस्थित होते.
उपवास सोडल्यानंतर आराधनाची प्रकृती खालावली. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आराधनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपवासामुळे तिच्या मूत्रपिंडाचेही नुकसान झाले होते. यामुळे आराधना कोमामध्येच गेली. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बालकांच्या हक्कांसाठी काम करणा-या एका समाजसेवी संस्थेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आराधनाच्या आईवडिलांवर कारवाई करावी अशी मागणी या संस्थेने केली आहे.