सक्षम नेतृत्वाअभावी गटबाजी वाढण्याचे संकेत

जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकचे भवितव्य काय, पक्षांतर्गत वाद होतील का, जयललिता यांच्या विश्वासू शशिकला यांच्याकडे पक्षाची सूत्रे जाणार का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एम. जी. रामचंद्रन किंवा जयललिता यांच्या धर्तीवर जनमानसावर छाप पाडेल असे नेतृत्व पक्षाकडे नाही. तसेच गटबाजी वाढत गेल्यास अण्णाद्रमुकचे भवितव्य कठीण असल्याचे मानले जाते.

अण्णा दुराई यांनी स्थापन केलेल्या द्रमुकमध्ये करुणानिधी आणि रामचंद्रन यांच्यात झालेल्या वादानंतर एमजीआर म्हणजेच रामचंद्रन यांनी अण्णाद्रमुक या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. आधी एम.जी.आर., नंतर जयललिता या चित्रपट क्षेत्रातील नावाजलेल्यांनी पक्षाचे नेतृत्व केले. तामिळनाडूची जनता ही चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांना डोक्यावर घेते, असा अनुभव आहे. अण्णाद्रमुकमध्ये आता नेतृत्वाचा अभाव आहे. जयललिता यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कोणाला पुढे आणले नाही. एमजीआर यांनी त्यांची उत्तराधिकारी म्हणून जयललिता यांचे नेतृत्व प्रस्थापित केले होते. सध्या अण्णाद्रमुकमध्ये प्रस्थापित असे नेतृत्वच नाही. अम्मांना श्रद्धांजली या एका मुद्दय़ावर पक्ष संघटित ठेवण्याचे प्रयत्न होतील.

जयललिता यांची मैत्रीण शशिकला, नवे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम, लोकसभेचे उपाध्यक्ष तंबीदुराई किंवा पक्षातील अन्य कोणत्याही नेत्याकडे करिश्मा नाही. जनमानसात त्यांचा तेवढा प्रभावही नाही. हे सारे अण्णाद्रमुकसाठी प्रतिकूल ठरणारे मुद्दे आहेत. पक्षात नेतृत्वावरून सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. शशिकला यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. मुख्यमंत्रिपदावरून पन्नीरसेल्वम व तंबीदुराई यांच्यात वाद झाल्याचे वृत्त आहे. पक्षात सरचिटणीसपद हे महत्त्वाचे आहे. तंबीदुराई यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीसपद सोपवावे, असा प्रस्ताव आहे. कारण पश्चिम तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकचे वर्चस्व असून, तंबीदुराई याच भागातील लोकप्रतिनिधी आहेत.

जयललिता यांच्याप्रमाणेच शशिकला पक्षावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतील. अम्मा म्हणजेच जलललिता यांच्या नावाचा वापर करून त्या पक्षाची सारी सूत्रे आपल्या हाती ठेवण्यावर भर देतील. अम्मांच्या नावाचा करिश्मा असल्याने लगेचच काही पक्षात वेगळे घडण्याची शक्यता नाही, पण कालांतराने पक्षातील गटबाजी वाढत जाईल, असा तामिळनाडूतील राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे. तामिळनाडूमध्ये जयललिता किंवा करुणानिधी दोन तृतीयांश बहुमत मिळवीत सत्तेत येत असत. गेल्या मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत अम्मा पुन्हा सत्तेत आल्या, पण २३४ सदस्यीय तामिळनाडू विधानसभेत अण्णाद्रमुकचे १३४, तर द्रमुकचे ८९ सदस्य आहेत. काँग्रेसच्या आठ आमदारांचा द्रमुकला पाठिंबा आहे. पक्षाच्या २० ते २५ आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्यास अण्णाद्रमुकचे सरकार गडगडू शकते. यामुळेच पक्ष संघटित ठेवण्याचे मोठे आव्हान पन्नीरसेल्वम व शशिकला यांच्यापुढे असेल. राज्य विधानसभेची निवडणूक गेल्या मे महिन्यात झाली असून, पुढील निवडणुकीला अद्याप साडेचार वर्षांचा अवधी आहे. सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याकरिता पुन्हा नव्याने निवडणुका घेण्याचा जुगार खेळला जाऊ शकतो, असा एक मतप्रवाह असला तरी शशिकलांच्या हाती मुख्यमंत्रिपद जाऊ नये म्हणून पन्नीरसेल्वम व अन्य नेते हा डाव यशस्वी होऊ देणार नाहीत.

भाजप फायदा उठविणार?  जयललिता यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची संधी साधण्याचा  प्रयत्न भाजप करेल.दुसरीकडे द्रमुकचे ९३ वर्षीय सर्वेसर्वा एम. करुणानिधी आता थकले आहेत. त्यांचे उत्तराधिकारी एम. स्टॅलिन यांच्याकडे पक्षाची सूत्रे आली आहेत. अण्णाद्रमुकमध्ये बेदिली निर्माण झाली किंवा त्याला हातभार लावून भाजप हळूहळू हातपाय पसरू शकते, असा एक अंदाज व्यक्त केला जातो.

शशिकलांवर प्रकाशझोत

ओ. पन्नीरसेल्वम यांना सोमवारी रात्री मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली असली तरी जयललिता यांच्या अत्यंत निकटच्या आणि विश्वासू सहकारी या नात्याने शशिकला नटराजन यांच्यावर राज्याच्या राजकारणाचा प्रकाशझोत राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अभाअद्रमुकच्या सरचिटणीसपदाची धुरा शशिकला स्वत: सांभाळतील अथवा त्यांच्या मर्जीतील व्यक्ती ती धुरा सांभाळतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सत्तेवर आपली पकड मजबूत राहण्यासाठी शशिकला यांना यापैकी एक पाऊल उचलणे आता गरजेचे ठरणार आहे. शशिकला यांनी आतापर्यंत तामिळनाडूच्या राजकारणात अथवा पक्षात कोणतेही पद भूषविलेले नाही. शशिकला यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून दूर राहण्याचा पक्षाचा कल असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. व्हिडीओ दुकानाच्या मालक असलेल्या शशिकला या जयललिता यांच्या पोस गार्डनमधील निवासस्थानी अनेक दशके वास्तव्य करणाऱ्या दुसऱ्या महिला होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे सत्तेचे प्रतीक म्हणून पाहिले जात होते. जयललिता यांच्याशी इतका निकटचा संबंध असल्यानेच शशिकला यांच्याकडे तामिळनाडूच्या राजकारणातील महत्त्वाची व्यक्ती म्हणून पाहिले जात आहे. मात्र पन्नीरसेल्वम यांची जितक्या सहजतेने मुख्यमंत्रिपदी निवड झाली तितक्या सहजतेने शशिकला यांच्याकडे वारसदार म्हणून पाहिले जाणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

शशिकला यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता आणि जमिनींचे व्यवहार या बाबत भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

चहावाला ते मुख्यमंत्री

जयललिता यांचे विश्वासू समर्थक ओ. पनीरसेल्वम हे तिसऱ्यांदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आहेत. आता मात्र जयललिता यांच्या निधनामुळे त्यांना हे पद सांभाळावे लागले आहे. अद्रमुकमध्ये एकजूट ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. जयललिता या करिष्मा असलेल्या नेत्या होत्या. ती पोकळी आता भरून येणार नाही त्यामुळेही मोठा पेच आहे. चहावाला ते राजकारणी असा पासष्टवर्षीय पनीरसेल्वम यांचा प्रवास आहे. त्यांना ‘ओपीएस’ असे लोकप्रिय नाव आहे. जयललिता भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरल्यानंतर दोनदा त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते.  त्यांच्यात संघनेतेपदाचे गुण आहेत व सप्टेंबर २०११ व सप्टेंबर २०१४ मध्ये ते काळजीवाहू मुख्यमंत्री होते. ते बहुसंख्याक मुदुकुलाथोर समाजाचे असून अतिशय साधी पाश्र्वभूमी असलेल्या घरातून आलेले आहेत. पेरियाकुलम येथे ते चहाचा स्टॉल चालवत होते. त्यांचा हा चहाचा ठेला अजूनही त्यांचे कुटुंबीय चालवतात. २००१ मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले व त्यांना जयललिता यांनी महसूलमंत्री नेमले होते. त्यात त्यांनी त्यांच्यावर पहिल्यांदाच मोठा विश्वास टाकला. २०११मध्ये जयललिता यांचा त्यांच्यावरील विश्वास आणखी वाढला. त्यांनी पनीरसेल्वम यांना अर्थ व सार्वजनिक बांधकाम खाते दिले. विरोधी पक्षात असताना पनीरसेल्वम हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. जयललिता यांचे पक्षातील विश्वासू म्हणून त्यांचा नावलौकिक होता. पनीरसेल्वम यांनी पक्षात आदरही कमावलेला आहे.

शोक आणि गोंधळ

  • तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे पार्थिव अन्त्यदर्शनासाठी राजाजी सभागृहात ठेवण्यात आले होते तेथे अनेकदा गोंधळाची आणि जवळपास चेंगराचेंगरी झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.
  • पक्षाचे कार्यकर्ते आणि जनतेने आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी पोलिसांचे कडे तोडले, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था पार कोलमडून गेली होती.
  • जयललिता यांचे पार्थिव ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, तेथे जाण्यासाठी उपस्थितांनी पोलिसांनी उभारलेले लोखंडी कडे ढकलले तेव्हा स्थिती नियंत्रणात ठेवणे पोलिसांना कठीण झाले होते. काही जण तामिळनाडू मल्टि-सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून घुसले.
  • काही तास लोखंडी कडे धरून उपस्थितांना रोखण्यात पोलीस अधिकारी यशस्वी झाले. मात्र एका क्षणी स्थिती पोलिसांच्याही हाताबाहेर गेली आणि उपस्थितांनी लोखंडी कडेही तोडले.
  • अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना प्रवेश देण्यासाठी पोलिसांनी दोरीने कडे केले होते, मात्र जनता आणि अभाअद्रमुकच्या कार्यकर्त्यांंनी ते कडेही तोडले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आदरांजली वाहून निघाल्यानंतर अनेकांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी उभारण्यात आलेल्या दिशेने धाव घेतली.
  • जनतेला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. या सर्व गोंधळात सापडलेले वृद्ध आणि महिला यांनी गर्दीतून बाहेर पडण्यासाठी पोलिसांकडे याचना केल्याचेही दिसत होते.