प्रतिष्ठेला धक्का पोचविल्याबद्दल गायकवाडांकडून संसदेची माफी; पण एअर इंडियाने खासदारांची बदनामी केल्याचा दावा
‘‘मी प्राध्यापक आहे. माझा स्वभाव विनम्र आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या संस्कारात वाढलेला मी कडवा शिवसैनिक आहे.. पण माझ्याविरुद्ध कुभांड रचले गेले. मुद्दाम त्रास दिला गेला. जसे महात्मा गांधींचे सामान रेल्वेतून ब्रिटिशांनी फेकून दिले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (अमेरिकेने) व्हिसाबंदी घातली होती तशी दडपशाही चालू आहे..’’
शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड लोकसभेत बोलत होते. आपल्यावर झालेल्या ‘अन्याया’ची आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वाईट वागणुकीची तक्रार लोकसभेच्या माध्यमातून देशासमोर मांडत होते. त्यांच्या बोलण्याबाबत उत्सुकता असल्याने सभागृहात शांतता होती. कारण एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्याच्या घटनेपासून (२३ मार्च) गायकवाड गायब झाले होते. गुरुवारी ते थेट सभागृहात हजर झाले आणि बोलू लागले..
लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांना उद्देशून ते म्हणाले, ‘‘तुम्ही मला मातेसमान आहात. खासदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. मी निर्दोष आहे किंवा नाही, हे सांगण्यासाठी मी उभा नाही. तर लाखो जनतेने निवडून दिलेल्या एका लोकप्रतिनिधीला एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वाईट वागणुकीचा, चौकशीआधीच गुन्हेगार ठरविण्याचा निषेध करण्यासाठी उभा आहे. माझा एवढा काय गुन्हा आहे की तपासाआधीच माझी ‘मीडिया ट्रायल’ चालू आहे?’’
मग ते २३ मार्च रोजी पुणे-दिल्लीदरम्यानच्या प्रवासात घडलेल्या घटनेतील स्वत:ची बाजू मांडू लागले. ‘‘बिझनेस श्रेणीचे तिकीट असतानाही मला इकॉनॉमी श्रेणीत बसविले गेले. तरी मी गप्प प्रवास केला. दिल्लीत पोचल्यानंतर मी तक्रार नोंदवही मागितली. पण ती दिली गेली नाही. ४५ मिनिटांनंतर एक अधिकारी आला आणि माझ्याशी वाद घालू लागला. तुम्ही कोण आहात?, असे मी विचारल्यावर तो म्हणाला, ‘एअर इंडियाचा बाप आहे.’ मग मीही म्हणालो, ‘मी खासदार आहे.’ त्यावर तो आणखी चिडला आणि म्हणाला, ‘खासदार आहे म्हणून काय झाले? तू काय नरेंद्र मोदी आहे का?’ मग त्याने माझ्या शर्टची कॉलर पकडली. शिवीगाळ करू लागला. धक्काबुक्की केली. त्याच्या या गैरवर्तणुकीने माझा संयम संपला आणि मीही त्याला ढकलून दिले. संसद आणि खासदारांच्या नावाने लाखोली वाहत होता. या साऱ्या प्रकाराची व्हिडीओ क्लिप उपलब्ध आहे. एका हवाईसुंदरीनेही माझ्या बाजूने साक्ष दिली आहे.’’
जणू काही मी गुन्हाच केला असल्याचे वाटून सर्व जण माझ्या पाळतीवर होते. पण मी हाडाचा शिवसैनिक. गनिमी काव्याने सर्वाना चकवून संसदेमध्ये पोचल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, ‘‘वाईट याचे वाटते की गैरवर्तणूक करणारे ताठ मानेने फिरताहेत आणि चूक नसताना माझ्यावर हवाईबंदी घालण्यात आली. हे माझ्या मूलभूत अधिकारांवर आक्रमण आहे. मी प्राध्यापक आहे. विनम्रता माझ्या ठायी आहे. जर माझ्या कृतीने संसदेची अप्रतिष्ठा झाली असेल तर माफी मागण्याचा आदेश माझे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय. त्यानुसार मी संसदेची माफी मागतो.. पण एअर इंडियाची आणि त्यांच्या उद्धट कर्मचाऱ्यांची माफी कदापि मागणार नाही. याउलट त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.’’
‘घटना किरकोळ असताना खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा..’
‘‘माझ्यावर गुन्हा दाखल झाला. त्याबद्दल मी काही म्हणणार नाही. पण तुम्हाला सर्वाना आश्चर्याचा धक्का बसेल की माझ्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा (भारतीय दंडविधानामधील ३०८ कलम) दाखल केलाय. विमानात चढताना शस्त्रे घेऊन जाता येत नाहीत. माझ्याकडे काहीही नव्हते. तर मग मी खुनाचा प्रयत्न कसा काय करू शकतो? दहशतवादी, कुख्यात गुंड आणि गुन्हेगार विमानातून प्रवास करतात आणि माझ्यावर बंदी घातली आहे. ही दडपशाही नव्हे तर काय आहे,’’ असा सवाल गायकवाडांनी केला.