इंडोनेशियातील सुराबया येथून सिंगापूरच्या दिशेने निघालेले एअर एशिया कंपनीचे विमान रविवारी सकाळी अध्र्या वाटेतच बेपत्ता झाले. सात विमान कर्मचाऱ्यांसह १६२ प्रवासी असलेल्या या विमानाचा ११ तासांनंतरही शोध सुरूच असून ते इंडोनेशियाच्या पूर्व किनाऱ्याजवळील समुद्रात कोसळल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. याच वर्षी मार्चमध्ये मलेशियन विमान कंपनीचे २३९ प्रवाशांसह बेपत्ता झालेले विमान अद्याप सापडले नसताना रविवारी घडलेल्या या घटनेने सरत्या वर्षांवर दु:खद आठवणींचा आणखी एक ओरखडा उमटवला आहे.
सुराबया येथून पहाटे ५.२० वाजता निघालेले हे विमान सकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी बेपत्ता झाल्यानंतर लगेचच त्याचा शोध सुरू करण्यात आला. इंडोनेशियाच्या लष्कराची दोन विमाने आणि एका हेलिकॉप्टरने ‘क्यूझेड’चा संपर्क तुटलेल्या ठिकाणापासूनचा सर्व परिसर धुंडाळला. मात्र खराब हवामान आणि अंधुक प्रकाशामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली. सोमवारी सकाळी पुन्हा नव्याने शोधमोहीम राबवली जाईल, अशी माहिती इंडोनेशियाच्या विमान अधिकाऱ्यांनी दिली. dv09विमान दुर्घटनांचे वर्ष
*८ मार्च : मलेशिया एअरलाइन्सचे विमान बेपत्ता. विमानात २३९ प्रवासी. अद्याप शोध लागलेला नाही.
*१७ जुलै : मलेशिया एअरलाइन्सचे विमान युक्रेनमध्ये रशियाच्या सीमेजवळ कोसळले. २९५ जण ठार.
*२३ जुलै : ट्रान्सएशिया एअरवेजचे विमान कोसळले. ४८ मृत्युमुखी.
*२४ जुलै : एअर अल्जेरियाच्या विमानाला अपघात. ११६ जणांचा मृत्यू.
*१० ऑगस्ट : इराणचे विमान कोसळले. ३९ प्रवासी ठार.
*२८ डिसेंबर : एअर एशियाचे विमान बेपत्ता. १६२ जणांचा शोध नाही.

*या विमानात सात कर्मचारी व १५५ प्रवासी होते. त्यापैकी १४९ जण इंडोनेशियन तर तीन दक्षिण कोरियन होते. याशिवाय ब्रिटन, मलेशिया आणि सिंगापूरच्या प्रत्येकी एका नागरिकाचा प्रवाशांत समावेश आहे.

*एअर एशियाच्या विमानाच्या शोधासाठी भारताने बंगालच्या उपसागरात नौदलाची पाच जहाजे आणि एक विमान मदतीसाठी सज्ज ठेवले आहे. चीननेही इंडोनेशियाला सर्वतोपरी सहकार्य देऊ केले आहे.