उत्तर प्रदेश निवडणुका तोंडावर आलेल्या असताना समाजवादी पक्षाने आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी अनेक घोषणा केल्या. स्मार्टफोनपासून ते लॅपटॉपर्यंत आणि गृहिणींना प्रेशर कुकरपासून ते गरिबांना निवृत्ती वेतनापर्यंत ‘सर्व काही’ देण्याचे वचन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दिले आहे. त्यांच्या या जाहीरनामा प्रकाशन समारंभावेळी मुलायम सिंह यादव हे उपस्थित नव्हते. काही नव्या आश्वासनांचा पाऊस त्यांना पाडला असला तरी काही जुन्या लोकप्रिय योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लॅपटॉप, कन्या विद्या धन, पूर्वांचल एक्स्प्रेस वे, समाजवादी पेंशन, हेल्पलाइन या जुन्या योजना चालू राहतील असे ते म्हणाले.

गरीब मुलांच्या पोषणाकडे लक्ष दिले जाईल असे ते म्हणाले. कुपोषित मुलांना महिन्याला १ किलो तुपाचा डब्बा दिला जाईल तसेच दूध पावडरचा १ किलोचा डब्बा दिला जाईल असे ते म्हणाले. या व्यतिरिक्त सर्व आमदार आपल्या मतदारसंघाच्या विकासाचा आराखडा स्वतः तयार करुन अंमलात आणतील असे त्यांनी म्हटले आहे. समाजवादी स्मार्टफोन योजनेअंतर्गत एकूण १ कोटी ४० लाख लोकांनी नोंदणी केली आहे. आमचे सरकार सत्तेमध्ये आले तर या सर्वांना स्मार्टफोन दिला जाईल असे ते म्हणाले. स्मार्टफोन आल्यानंतर डिजीटल इंडियाचे स्वप्न पूर्ण होईल असे देखील ते म्हणाले.

गरीब महिलांना प्रेशर कुकर दिले जाईल ही घोषणा देखील त्यांनी केली. त्या कमी वेळात स्वयंपाक बनवू शकतील तसेच त्यांची इंधनाचीही बचत होईल असे त्यांनी म्हटले. काम करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह बांधण्यात येईल असे त्यांनी म्हटले. तसेच उत्तर प्रदेश परिवहनमध्ये प्रवास करण्यासाठी ५० टक्के सवलत मिळेल असे ते म्हणाले. राज्यातील १ कोटी गरिबांना महिन्याला १ हजार रुपये पेंशन दिली जाईल असे ते म्हणाले. अत्यंत गरिबांना गहू, तांदूळ देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.

या व्यतिरिक्त जे मजुरांसाठी मध्यान्ह भोजन दिले जाईल असे देखील त्यांनी म्हटले. जर माझ्यासोबत लोकांचे आशीर्वाद असतील तर पहिला अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच राज्यात मेट्रो प्रकल्पांची घोषणा केली जाईल असे ते म्हणाले. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आपण या प्रकल्पाची घोषणा करू असे ते म्हणाले. लखनौ बरोबरच, आग्रा, मेरठल वाराणसी या शहरांमध्ये मेट्रो सुरू केली जाईल असे ते म्हणाले. यावेळी अखिलेश यांनी मायावती यांच्या बहुजन समाज पक्षावरही निशाणा साधला.