डायटमस या एकपेशीय शैवालीच्या जीवाश्मीभूत अवशेषांपासून बनवलेल्या अॅनोडचा वापर केलेल्या सिलिकॉनच्या मदतीने विद्युत वाहनांना वीज पुरवठा करणाऱ्या किफायतशीर लिथियम आयन बॅटरी वैज्ञानिक विकसित करीत आहेत. रिव्हरसाईड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात याबाबत संशोधन झाले असून याच्या आधारे विद्युत वाहने व पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक साधनात वापरता येणाऱ्या लिथियम आयन बॅटरी किफायतशीर दरात तयार करता येणार आहेत. लिथियम आयन बॅटरीज या रिचार्जेबल बॅटरीजमध्ये सर्वात लोकप्रिय आहेत त्यात अॅनोड, कॅथोड व इलेक्ट्रोलाईट असे घटक असतात. ते लिथियम क्षार सेंद्रिय द्रावणात विरघळवून तयार केले जातात. ग्राफाईट हा अॅनोडसाठी चांगला पर्याय आहे पण त्याच्या काही मर्यादांमुळे वापर अवघड आहे.

पर्यायी सिलिकॉन दहा पट ऊर्जा साठवू शकतो पण त्याची काबरेथर्मिक पद्धतीने निर्मिती महागात पडते. त्यामुळे डायटोमॅशियस अर्थ या शैवालाच्या जीवाश्माचा वापर यात करता येईल असे वैज्ञानिकांचे मत असून त्याची उपलब्धताही भरपूर आहे, खडकांमध्ये तो सापडतो, गेली काही लाख वर्षे तो जीवाश्म स्वरूपातील अवशेषात आहे. मॅग्नेशियोथर्मिक रिडक्शन पद्धतीने सिलिकॉन डायॉक्साईडच्या या स्रोताचे सिलिकॉन नॅनो कणात रूपांतर करण्यात आले.

आमच्या संशोधनानुसार डायअॅटम पेशी भित्तिका म्हणजे फ्रॅस्टुल्सच्या मदतीने सच्छिद्र अॅनोड तयार करता येतो असे कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सेनगिझ ओझकान यांनी सांगितले. याच विद्यापीठातील मिहरी ओझकान व सेंगीझ यांनी लिथियम आयन बॅटरीचे अॅनोड पर्यावरण स्नेही व किफायतशीर पद्धतीने बनवण्यावर संशोधन केले आहे.