अल्वरमधील डेअरी चालक पहलू खान यांच्या हत्या प्रकरणातील सहा आरोपींना राजस्थान पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणी तपास केला असून हे आरोपी निर्दोष आहेत, असे पोलिसांनी सांगितले. पहलू खान आणि इतर काही जण १ एप्रिल रोजी अल्वर येथून हरयाणा येथे जनावरे घेऊन जात होते. गो तस्करीच्या संशयातून एका टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली होती. यात जखमी झालेले पहलू खान यांचा तिसऱ्या दिवशी मृत्यू झाला होता.

हुकूमचंद, नवीन शर्मा, जगमल यादव, ओमप्रकाश, सुधीर आणि राहुल सैनी यांनी आपल्यावर हल्ला केल्याचे पहलू खान यांनी मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात म्हटले होते. या घटनेनंतर या सहा संशयित आरोपींविषयी माहिती देणाऱ्यांसाठी बक्षीसही जाहीर केले होते. त्यानंतर पोलिसांनी या सहा जणांना अटक केली होती. या प्रकरणी चौकशी सुरू होती. मात्र हे सहाही जण निर्दोष असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्यावरील बक्षीसही मागे घेण्यात येत असल्याचे अल्वरचे पोलीस अधीक्षक राहुल प्रकाश यांनी सांगितले.

राजस्थानच्या गुन्हे शाखेने या घटनेचा तपास केला. या तपासात हे सहा जण निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील बक्षीस मागे घेण्यात येत आहे, असे त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. जुलैमध्ये या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. या तपासाचा अहवाल अल्वर पोलिसांकडे सोपवला आहे. हे सहाही आरोपी निर्दोष असून त्यांची नावे या प्रकरणातून वगळण्यात यावीत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी, गो शाळेचे कर्मचारी आणि मोबाईल फोनमधील माहितीच्या आधारे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

हा विश्वासघात आहे. आम्ही स्वतः आरोपींची नावे ऐकली आहेत. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार आहे, असे पहलू खान यांचा मुलगा इर्शादने सांगितले. मारहाण झाली त्यावेळी इर्शाद पहलू खान यांच्यासोबत होता. या प्रकरणात पोलिसांनी आणखी सात जणांना अटक केली आहे. त्यातील पाच जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.