काश्मीरप्रश्नी नेहमी पाकिस्तान सैन्याला दोषी ठरविणे चुकीचे आहे असे वक्तव्य माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटोनी यांनी केले आहे. काश्मीरमध्ये जो हिंसाचार सुरू आहे त्यात पाकिस्तान सैन्याला दोषी ठरवून त्यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस भूमिका न घेणे ही सगळ्यात मोठी चूक आहे, आता काश्मीरप्रश्नी बोलण्यासाठी सरकारने नवे ‘वक्तव्य’ शोधावे अशी टीका अँटोनी यांनी केली आहे. काश्मीरप्रश्नी लवकरच तोगडा काढण्याची गरज आहे आणि सरकारने याबाबत दिरंगाई करून चालणार नाही. सगळ्या पक्षांशी चर्चा करून काश्मीर प्रश्नावर योग्य तो निर्णय सरकारने घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. युद्धपातळीवर या प्रश्नावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सरकारने करायला हवेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत सरकारला काश्मीरी जनतेची त्यातूनही सरकारविषयी असंतोष खदखदत असलेल्या तरूणांची मने जिंकून घेणे गरजेचे असल्याचा सल्लाही माजी संरक्षण मंत्र्यांनी दिला.
काश्मीरी लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत या मी जाणून आहे असेही ते म्हणाले. काश्मीर खो-यात पाकिस्तान सैन्याकडून अशांतता पसरवली जाते हे जगजाहिर आहे. पाकिस्तानच्या कुरापती या सुरूच राहणार आहेत आणि त्यांना कोणीही अडवू शकत नाही. पण यासाठी पाकिस्तान सैन्यावर आरोप करणे आणि त्यांना शिक्षा न करणे ही गोष्ट चुकीची आहे असे मत देखील त्यांनी मांडले. ८ जुलैला हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचाराचे वातावरण आहे. तसेच दीड महिन्यापासून काश्मीरमधल्या अनेक भागात संचारबंदी लागू आहे. काश्मीरमधील हिंसाचारात पाकिस्तानने देखील नाक खुपसायला सुरूवात केली आहे, त्यामुळे आतांरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरचा मुद्दा चर्चिला जात आहे. या पार्श्वभूमिवर माजी संरक्षण मंत्र्याने हे वक्तव्य केले.