भाजपने पीडीपीच्या साथीने २०१५ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित शहांनी भाजपच्या मंत्र्यांची बैठक घेत त्यांना राज्यातील सामान्य जनतेशी संवाद साधण्याचा सल्ला दिला. काश्मीर खोऱ्याचा दौरा करुन सामान्य लोकांशी संवाद साधा आणि पक्ष बळकट करा, असे अमित शहा मंत्र्यांना म्हणाले. जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोहरा लोकसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराची माहिती देण्यासाठी नवी दिल्लीला पोहोचले असताना अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमधील भाजपच्या मंत्र्यांची बैठक घेतली. वोहरा मंगळवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

‘मंत्र्यांनी फक्त आपल्या विधानसभा मतदारसंघापर्यंत मर्यादित राहू नये. काश्मीरच्या अंतर्गत भागांचा दौरा करावा. काश्मीर खोऱ्यातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवाव्या, असे आदेश अमित शहा यांनी सर्व मंत्र्यांना दिले आहेत,’ असे जम्मूतील नौशेराचे भाजप आमदार रविंद्र रैना यांनी सांगितले. अमित शहांनी पक्षाच्या मंत्र्यांना जबाबदारी वाटून दिली आहे. राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेल्या भाजप आणि पीडीपी यांच्यातील संबंध ताणलेले असताना अमित शहांनी राज्याचा दौरा केला आहे. त्यामुळे अमित शहांचा हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो आहे. भाजप आणि पीडीपीमधील संबंधांमधील कटुता गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील युती तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

‘काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी, ही केंद्र आणि राज्य सरकारची प्राथमिकता आहे. आपल्यामध्ये या परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता आहे आणि आपण या परिस्थितीतून मार्ग काढू. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि इथे राहणारे लोक भारतीय नागरिक आहेत. भाजप कायम या नागरिकांच्या सोबत आहे. येथील सर्व नागरिकांची सुरक्षा करणे राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे. काश्मीर खोऱ्यात शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही आमची सामूहिक जबाबदारी असून ती आम्ही पूर्ण करु,’ असे अमित शहा यांनी भाजपच्या मंत्र्यांना संबोधित करताना म्हटले.

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणी मागील वर्षी मारला गेल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वाणी मारल्यानंतर हिंसक घटनांमध्ये अनेक पटीने वाढ झाली आहे. लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावरुन उतरुन आंदोलने करत आहेत. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्कर आणि सुरक्षा दलांचा वापर केला जातो आहे. अनेक ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा दलाचे जवान समोरासमोर आल्याने संघर्ष होतो आहे. यामध्ये लष्कर आणि सुरक्षा दलांचे अनेक जवान शहीद झाले आहेत. यासोबतच अनेक नागरिकांचादेखील मृत्यू झाला आहे. नुकत्याच झालेल्या श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीदरम्यानदेखील हिंसेच्या अनेक घटना घडल्या होत्या.