आर्थिक लाभ मिळवण्यासाठी तिस्ता सेटलवाल यांच्या संस्थेसह अनेक स्वयंसेवी संस्थांना मनमानीपणे एफसीआरए नोटिसा पाठवल्याच्या प्रकरणाच्या संबंधात गृहमंत्रालयाचे अवर सचिव आनंद जोशी यांना सीबीआयने रविवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
गेले काही महिने आपल्याला ‘मानसिक छळ’ सहन करावा लागत आहे, असे टिपण लिहून ठेवून गेल्या आठवडय़ात ‘बेपत्ता’ झालेल्या जोशी यांना रविवारी नवी दिल्लीत ताब्यात घेण्यात आले. आम्ही जोशी यांना स्थानबद्ध केले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे, असे सीबीआयचे प्रवक्ते देवप्रीत सिंग यांनी सांगितले.
अलीकडेच विदेशी व्यक्तींच्या विभागात तैनात करण्यात आलेल्या जोशी यांना विदेशी योगदान नियमन कायद्याशी संबंधित फायली हाताळता येत होत्या. काही स्वयंसेवी संस्थांबाबत पक्षपात करण्यासाठी ते लाच घेत असल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येऊन यासंबंधी सीबीआयला माहिती देण्यात आली होती.एफसीआरएखाली नोंदणी झालेल्या ज्या स्वयंसेवी संस्था आणि सहकारी संस्थांना विदेशातून मोठी रक्कम देणगीच्या स्वरूपात मिळत होती, त्यांना जोशी हे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून व मनमानीपणे नोटिसा पाठवत होते.