भारतासोबत अशांततेचे संबंध असण्यासाठी पाकिस्तान दोषी असल्याचा ठपका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ठेवला असून, या दोन शेजारी देशांमध्ये तणाव का आहे याचे इस्लामाबादने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. हे सरकार स्थापन झाले त्या दिवसापासून आणि त्यापूर्वीही पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यासाठी भारताने एकामागोमाग एक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिष्टाचारविरहित मार्गासह अनेक बाबतींत पुढाकार घेतला, मात्र पाकिस्तानच्या प्रोत्साहनाने पठाणकोट व उरीवरील हल्ल्याचा प्रतिसाद मिळाला, असे एचटी नेतृत्व परिषदेतील भाषणात जेटली म्हणाले.

भारत- पाकिस्तान संबंधांचा विचार करता हे सामान्य असल्याचे म्हटले जाऊ शकत नाही. दोन देशांमध्ये तणाव असतील, तर ते कशामुळे याबाबत आत्मपरीक्षण करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे, असेही जेटलींनी सांगितले.

अमेरिकेत झालेल्या नेतृत्वबदलाच्या परिणामाबाबत विचारले असता जेटली म्हणाले, की यामुळे दोन देशांदरम्यानचे संबंध आणखी बळकट होण्याची अपेक्षा आहे. भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध पूर्वी होते त्याच पातळीवर सुरू राहतील आणि कदाचित आणखी वृद्धिंगत व परिपक्व होतील याबद्दल शंका नाही.

अमेरिकेसाठी ही निवडणूक असामान्य होती. जगातील सर्वात शक्तिशाली लोकशाहींपैकी एक असलेला देश मुक्त निवडणूक प्रक्रियेतून जो निर्णय घेतो, तो आपल्याला मान्य करायलाच हवा, असे मत जेटली यांनी व्यक्त केले.