दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या समारंभासाठी आपल्याला निमंत्रणच देण्यात आले नसल्याचा दावा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने याबाबत भाजपवर टीका केली आहे.
केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्ट केले की, कोणत्याही नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले नाही. केजरीवाल यांनी गेल्या वर्षी समारंभादरम्यान निदर्शने करण्याचा इशारा दिला होता, याचे स्मरण हर्षवर्धन यांनी करून दिले.
तथापि, प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा केला जाऊ नये, असे भाष्य आपण कधीही केलेले नाही, राजशिष्टाचारानुसार आवश्यक असल्यास आपल्याला निमंत्रण दिले पाहिजे, असे केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांना निमंत्रण न देणे यावरून भाजपची ्र मानसिकता दिसून येते, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

‘आप’वर दिग्विजय सिंहांची टीका
आम आदमी पार्टी (आप) हा भाजपचा ‘ब’ संघ आहे, दिल्लीत २०१३ मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसने आप या तुलनेने कमी वाईट प्रवृत्तीला पाठिंबा दिला होता, असे मत काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी व्यक्त केले आहे.आप हा भाजपचा ब संघ आहे तर तुम्ही आपला पाठिंबा का दिलात असे तुम्ही विचारले तर आम्हाला भाजप आणि ब संघ यांच्यातून निवड करावयाची होती आणि ब संघ तुलनेने कमी वाईट आहे, असे दिग्विजयसिंह म्हणाले.