देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी ७ फेब्रुवारीला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. नोटाबंदीच्या काळात त्रासाला सामोरे जावे लागले असल्याने बँक कर्मचाऱ्यांकडून संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. नोटाबंदीच्या काळात लादण्यात आलेले निर्बंध मागे घेतली जावी आणि रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायम ठेवली जावी, या बँक कर्मचाऱ्यांचा दोन प्रमुख मागण्या आहेत.

‘नोटाबंदीनंतर निर्माण झालेली चलन टंचाई कमी करण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक योग्य ती पावले उचलेल,’ असे आम्हाला वाटले होते. मात्र अजूनही देशभरातील बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात चलन पुरवठा सुरू झालेला नाही. ग्राहकांना आठवड्याभरात २४ हजार रुपये काढण्याची मुभा आहे. मात्र चलन टंचाईमुळे आम्हाला ग्राहकांना २४ हजार रुपयेही पुरवणे शक्य होत नाही,’ असे अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे (एआयबीईए) सचिव सी. एच. वेंकटचलम यांनी म्हटले आहे.

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेसोबतच ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (एआयबीओए) आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) ७ फेब्रुवारीच्या संपात सहभागी होणार आहेत.

एक कोटीपेक्षा अधिक रकमेची देणी थकवणाऱ्या कर्जदारांची नावे जाहीर करावीत, कर्जवसुलीसाठी ठोस पावले उचलली जावीत, अशा मागण्या बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केल्या आहेत. रोख व्यवस्थापनेतील रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायम राहावी, नोटाबंदीच्या काळात नोटांच्या टंचाईमुळे जीव गमावावा लागलेल्या बँक ग्राहकांना, बँक कर्मचाऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणीदेखील बँक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. याशिवाय नोटाबंदीनंतरच्या ५० दिवसांमध्ये अथकपणे आणि ड्युटी संपल्यानंतरही काम करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना मोबदला देण्यात यावा, अशीही मागणी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून केली जाणार आहे.

‘रोख रकमेच्या व्यवस्थापनाचे निरीक्षण करण्यासाठी अधिकारी नेमून सरकार रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर हस्तक्षेप करत आहेत. रोख रकमेचे व्यवस्थापनाचे संपूर्ण काम रिझर्व्ह बँकेच्या अधिकारात येते,’ असे अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे (एआयबीईए) सचिव सी. एच. वेंकटचलम यांनी म्हटले आहे.

याआधी रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही गव्हर्नर उर्जित पटेल यांना पत्र लिहून सरकारच्या रिझर्व्ह बँकेच्या कामाकाजातील वाढत्या हस्तक्षेपाबद्दल जोरदार आक्षेप घेतला होता. सरकारकडून रिझर्व्ह बँकेच्या अधिकारावर होणारे अतिक्रमण हे मानहानीकारक असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी म्हटले होते.