राज्य शासन चालवत असलेल्या बंगळुरू विजपुरवठा कंपनीत सहाय्यक पदावर काम करणाऱया एका कर्मचाऱयाने त्याला कुरिअरमधून जिवंत साप पाठवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. विशेष म्हणजे, हे जीवघेणे पार्सल त्याच्यासोबत काम करणाऱया एका महिला कर्मचारीच्या पतीने दोघांवरील संशयातून पाठवल्याचा दावा त्याने केला आहे. पोलीस देखील या घटनेमुळे चक्रावले असून याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करून त्यावरील कारवाईबाबत कायदेशीर सल्ला घेत असल्याचे सांगितले.
किथ डिसिल्वा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कार्लायलयात दुपारी बाराच्या सुमारास एका कुरिअर बॉयने त्यांच्या नावे एक पार्सल आणले. पण ते पार्सल उघडल्यानंतर त्यात जिवंत साप असल्याचे पाहून डिसिल्वा यांचा थरकाप उडाला. घाबरगुंडी उडालेल्या डिसिल्वा यांनी पार्सलमधील साप कसाबसा कार्यालयाच्या बाहेर नेऊन सोडल्याचा दावा केला आहे. पार्सलमध्ये एक चिठ्ठी मिळाली असून यापुढे तुला अशाच भयानक परिणामांना सामोरे जावे लागेल असे त्या चिठ्ठीत लिहील्याचे देखील डिसिल्वा यांनी सांगितले. डिसिल्वा यांना याप्रकरणी त्यांच्यासोबत काम करणाऱया महिला कर्मचाऱयाच्या पतीवर आरोप केला आहे. देवी प्रसाद हे नेहमी आपल्या पत्नीवर संशय घेतात. त्यांच्या पत्नीने माझ्यासोबत काम करण्याला त्यांचा नेहमी विरोध राहिला आहे. कामानिमित्त त्यांच्या पत्नीला मी घरी फोन केला असता त्यांनी अनेकवेळा आपल्याला धमकावले देखील आहे. त्यांनीच हा जीवघेणा प्रकार केल्याचे डिसिल्वा यांचे म्हणणे आहे. दरम्यान, डिसिल्वा यांना पार्सलने आलेला साप प्रत्यक्षात पाहिलेला एकही साक्षीदार नाही पण सापाचे फोटो आणि पार्सलसोबत मिळालेली चिठ्ठी तक्रारीसोबत डिसिल्वा यांनी सुपूर्द केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत.