स्वातंत्र्यदिनानिमित्त काश्मीरमध्ये आज भाजपच्यावतीने ‘तिरंगा यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, खोऱ्यातील तणावाची परिस्थिती पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्याक्ष अैजाझ हुसैन यांच्यासह २५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले. यामुळे येथिल आजची ‘तिरंगा यात्रा’ रोखण्यात आली.

भाजयुमोच्या या कार्यकर्त्यांना विविध भागातून ताब्यात घेण्यात आले तसेच त्यांना राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी येथे मोबाईल इंटरनेट सेवा प्रशासनाकडून स्थगित करण्यात आली आहे.

भाजपच्यावतीने देशभरात ‘तिरंगा यात्रा’ काढणार असल्याचे यापूर्वीच घोषित करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनानंतर उद्यापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. यामध्ये विविध गटांचे नेते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचणार आहेत. भाजपचे प्रत्येक खासदार आपल्या मतदार संघात ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ चा जयघोषही करणार आहेत. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या तिरंगा यात्रेची कल्पना मांडली होती. त्यावेळी सात दिवसांसाठी या यात्रेचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी ही यात्रा १६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्याच्या सूचना मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना केल्या आहेत. त्याचबरोबर दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.