राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून पुन्हा राज्यसभेत प्रवेश केलेले भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी सभागृहात पाऊल ठेवल्यापासून आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत. आता तर त्यांनी थेट राज्यसभा उपाध्यक्षांच्या निर्णयालाच आव्हान दिले आहे. स्वामींनी बुधवारी ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाविषयी सभागृहात बोलताना सोनिया गांधी आणि काँग्रेसविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर सभागृहाचे कामकाज थांबविण्याची वेळ आली होती आणि स्वामींचे वक्तव्य कामकाजातून वगळण्यातही आले होते. मात्र, स्वामींनी वक्तव्य वगळण्याच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे. माझे वक्तव्य कामकाजातून वगळण्याचा उपाध्यक्ष पी.जे. कुरियन यांचा निर्णय मनमानी, अतार्किक आणि सभागृहाच्या नियमांविरोधात असल्याचे स्वामींनी म्हटले. याशिवाय, काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वामी यांनी बुधवारी सोनिया गांधींसंदर्भात केलेल्या विधानानंतर विरोधक प्रचंड संतापले होते. स्वामी रस्त्यावरची भाषा राज्यसभेत बोलत असल्याची टीका गुलाब नबी आझादी यांनी केली होती. स्वामी यांनी आपले विधान मागे घेईपर्यंत तुम्हाला सभागृहात बोलूच देणार नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेसने घेतला होता. दोन दिवसांत दोन वेळा स्वामी यांचे वक्तव्य संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहे.