पाकिस्तानने गिलगिट-बल्टिस्तान हा आपला पाचवा सीमा भाग असल्याचे जाहीर केल्यावरून ब्रिटनने पाकिस्तानवर टीका केली आहे. यासंदर्भात एक ठराव ब्रिटन संसदेत पास करण्यात आला आहे. गिलगिट आणि बल्टिस्तान हा भारतातील जम्मू आणि काश्मीरचा कायदेशीर भाग असून १९४७ मध्ये पाकिस्तानने अवैधरीत्या बळकावला असल्याचे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.
२३ मार्च रोजी हा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला आणि कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते बॉब ब्लॅकमन यांनी हा ठराव पुरस्कृत केला. अशा प्रकारच्या घोषणा करून वादग्रस्त प्रदेशाच्या वादात आणखी भर पडत असल्याचे या ठरावात म्हटले गेले आहे. या वादग्रस्त प्रदेशातील लोकांचे मूलभूत हक्क डावलण्यात आले असून यात स्वातंत्र्यांच्या हक्काचाही समावेश असल्याचे यात म्हटले आहे.
या प्रस्तावात गिलगिट बल्टिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रोजेक्टला (सीपीइसी) विरोध करताना हे बेकायदा असल्याचे म्हटले आहे. याचदरम्यान चीन इस्लामाबादबरोबर सीपीइसीला वेग देण्याची तयारी करत असल्याचे चीनच्या परराष्ट्रीय विभागाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. सीपीइसीमुळे दोन्ही देशांच्या नागरिकांना मोठा फायदा होईल, असेही या प्रवक्त्याने म्हटले आहे.
भारताचा तीन देशांबरोबर दीर्घ काळापासून सीमारेषेवरून मोठा वाद सुरू आहे. यातील बांगलादेशबरोबरील वाद काही दिवसांपूर्वीच भारताने परस्पर सांमजस्याने सोडवला आहे. केंद्र सरकारने या दोन्ही देशातील नागरिकांना दोन्ही कोणत्याही एका देशात राहण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तर चीन आणि पाकिस्तानबरोबर अजूनही वाद सुरूच आहे.
चीनकडून वारंवार अरूणाचल प्रदेशवर आपला हक्क सांगितला जातो. काही दिवसांपूर्वी तिबेटचे धर्म गुरू दलाई लामा यांच्या अरूणाचल प्रदेश दौऱ्यावरून त्यांनी आक्षेप नोंदवला होता. पाकिस्तानबरोबरही भारताचा जम्मू-काश्मीरवरून संघर्ष सुरूच आहे. गिलगिट बल्टिस्तान हा भाग पाकिस्तानच्या उत्तरेकडील प्रशासकीय भाग असून वादग्रस्त पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेला हा भाग लागून आहे.