जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी केलेल्या संयुक्त चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी याचा खात्मा करण्यात आला होता. लष्कराने घेराव घातल्यानंतर मरण जवळ आल्याची चाहूल लागल्यानंतर बुरहान ढसाढसा रडायला लागला होता, अशी माहिती लष्करी सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे बुरहानच्या शौर्याचे गोडवे गाणाऱ्या फुटीरतावाद्यांच्या दाव्यांमधील फोलपणा समोर आला आहे. जिहादसाठी मरायची भाषा करणारा बुरहान लष्करासमोर हतबल झाल्याचे लष्कराकडून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट होते. बुरहानसह त्याच्या दोन साथीदारांना देखील लष्कराच्या कारवाईत ठार करण्यात आले होते. लष्कराने केलेल्या कारवाईनंतर बुरहानच्या समर्थनार्थ काश्मीरच्या खोऱ्यात संतापाची लाट उसळली होती. बुरहानला काहींनी असंतुष्टाचा जनक म्हटले होते, तर कोणी त्याला क्रांतीकारकाची देखील उपमा दिली होती. बुरहान वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी दहशतवाद्यांच्या ताफ्यात सामिल झाला होता. काश्मीरमध्ये बुरहानच्या दफन विधीला २० हजारापेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. बुरहानच्या मृत्युमुळे काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेवर देखील परिणाम दिसून आला होता. पाकिस्तान सरकारने देखील बुरहानच्या मृत्यूनंतर भारतावर टीका केली होती. बुरहानच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ पाकिस्तान सरकारने १९ तारखेला काळा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.