नेपाळमध्ये शुक्रवारी एक प्रवासी बस महामार्गावरून घसरून सुमारे शंभर मीटर खोल नदीत कोसळल्यामुळे किमान २१ लोक ठार, तर १७ लोक जखमी झाले.

ही प्रवासी बस रौताहात जिल्ह्य़ातील गौर येथून पोखराला जात असताना ती देशाच्या नैऋत्येकडील चितवन जिल्ह्य़ात महामार्गावरून खाली घसरली आणि सुमारे १०० मीटर खाली असलेल्या त्रिशुली नदीत कोसळून बुडाली, अशी माहिती चितवनचे पोलीसप्रमुख बसंता कुंवर यांनी दिल्याचे वृत्त ‘दि काठमांडू पोस्ट’ने दिले आहे. पोलीस व स्थानिक रहिवाशांनी जखमींना वाचवले आणि बुडालेल्या बसच्या सांगाडय़ातून मृतदेह बाहेर काढले. मृतांची ओळख अद्याप पटायची आहे. जखमींना भरतपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे असे कुंवर यांनी सांगितले. या अपघाताचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. नेपाळमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे असून निगा न राखली गेलेली वाहने व निकृष्ट रस्ते त्यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.गेल्या आठवडय़ात, एक बस मध्य नेपाळमध्ये एका रस्त्यावरून उलटून ३१ प्रवासी ठार झाले होते.