मिझोरमच्या राज्यपालपदाऐवजी राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय के. शंकरनारायण यांनी घेतल्यानंतर आता त्यांच्या जागी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सी. विद्यासागर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली. दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आलेआहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी व गुजरात विधानसभेचे सभापती वजूभाई वाला यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्र सरकारला सत्तेत येऊन मंगळवारी तीन महिने पूर्ण झाले. या पाश्र्वभूमीवर कर्नाटक, राजस्थान, गोवा व महाराष्ट्र या राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती घोषित करण्यात आली. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले राव हे तेलंगणमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. आंध्र विधानसभेवर ते तीनदा निवडून आले आहेत तर वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्रिपद भूषवले होते. भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मृदुला सिन्हा गोव्याच्या राज्यपालपदाचा पदभार स्वीकारतील. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर तेथील राज्यपाल बी. व्ही. वांछू यांनी राजीनामा दिला होता. तर ८२ वर्षीय कल्याणसिंह मार्गारेट अल्वांकडून राजस्थानच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारतील. हंसराज भारद्वाज कर्नाटकच्या राज्यपालपदावरून पायउतार होतील व त्यांची जागा वजूभाई वाला घेतील.
शीला दीक्षित यांचा राजीनामा
दरम्यान, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी मंगळवारी केरळच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात दीक्षित यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. राजीनाम्यानंतर दीक्षित यांनी प्रसारमाध्यमांशी अधिक काही बोलण्यास नकार दिला.
अनुभवीप्रशासक
महाराष्ट्राचे भावी राज्यपाल सी. विद्यासागर राव हे भाजपचे तेलंगणमधील ज्येष्ठ नेते आहेत.  वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात राव यांनी गृहराज्यमंत्रिपद भूषवले होते.
* आंध्र प्रदेशातील करीमनगर जिल्ह्य़ातील मेटपल्ली (आता तेलंगण) या मतदारसंघातून राव १९८५, १९८९ व १९९४ असे तीनदा आंध्र प्रदेश विधानसभेत निवडून आले
* अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य. १९७२ मध्ये उस्मानिया विद्यापीठात विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून निवड
* १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात मिसा कायद्याखाली अटक
* १९८५ ते १९९८ या कालावधीत आंध्र विधानसभेत भाजपचे संसदीय नेते
* गोदावरीचे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे बांधण्याच्या मागणीसाठी १९९८ मध्ये पदयात्रा
* २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पराभव
* १९९८ मध्ये लोकसभेवर निवडून गेले
* १९९९ मध्ये पुन्हा करीमनगर मतदारसंघातून विजयी झाले.
* वाजपेयींच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्रिपद
* १९९९ मध्ये आंध्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष
सामान्य कार्यकर्त्यांपासून ते महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या राज्यपालपदापर्यंत माझी वाटचाल केवळ भाजपचे कार्यकर्ते व नेत्यांमुळेच होऊ शकली आहे.  मी घटनात्मक चौकटीत राहून निभावेन. – सी. विद्यासागर राव