डोकलामवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत चीनमधील सरकारी माध्यमे सातत्याने युद्धाची धमकी देत होते. पण आता थेट चीनच्या लष्करानेच भारताला युद्धाचा इशारा दिला आहे. चीनच्या लष्कराने आज (सोमवारी) आव्हानात्मक भाषेत भारताला इशारा दिला. पर्वताला हलवणे एकवेळ सोपे आहे. पण चीनच्या सैन्याला नव्हे. त्यामुळे भारताने डोकलाममधून मागे हटावे, असे आव्हानच त्यांनी दिले. भारत मागे हटला नाही तर चीन डोकलाममध्ये आपल्या सैनिकांची संख्या वाढवेल, असा इशारा चीनच्या लष्करी प्रवक्त्याने दिला आहे.

चिनी लष्कराचे प्रवक्ते वू चिएन यांनी भारताला धमकी देत म्हटले की, चिनी सैन्याचा ९० वर्षांचा इतिहास आमची क्षमता सिद्ध करते. पर्वताला हलवणे एकवेळ सोपे आहे. पण चीनच्या सैनिकांना नव्हे. भारताने कोणत्याही भ्रमात राहू नये. आम्ही कोणत्याही किमतीवर आमच्या सीमेचे आम्ही संरक्षण करू.

डोकलाममध्ये रस्ता बांधणीवरून वाद सुरू झाला होता. याचा उल्लेख करत चिएन म्हणाले, जूनच्या मध्यात चिनी सैनिकांनी रस्त्याच्या निर्मितीची जबाबदारी घेतली होती. डोकलाम हा चीनचा भाग आहे आणि चीनने आपल्या क्षेत्रात रस्ता बनवणे ही सामान्य घटना आहे. उलट भारताने चीनच्या क्षेत्रात घुसखोरी करणे हा आंतरराष्ट्रीय सीमा उल्लंघनाचा एक गंभीर गुन्हा आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे.

भारताने आपले सैन्य मागे घेतल्यानंतरच चीन त्यांच्याशी चर्चा करेल, असे चीनने यापूर्वीच स्पष्ट केले होते. हाच मुद्दा पुन्हा उपस्थित करत चिएन म्हणाले, आम्ही भारताला त्यांचे सैन्य मागे घेण्याचा आग्रह करत आहोत. ही समस्या मिटवण्यासाठी काही अटी आहेत. या संपूर्ण परिसरात शांतता, सीमेवरील शांततेवर हे अवलंबून आहे.

दरम्यान, चीनमधील माध्यमे सातत्याने युद्धाची धमकी देत भारतावर दबाव निर्माण करत आहेत. परंतु, भारताने कोणत्याही परिस्थितीत दबावासमोर झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.