तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सल्लागार श्रीनिवास अय्यर रामास्वामी उर्फ चो यांचे बुधवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. आज सकाळी ४.१५च्या सुमारास त्यांनी अपोलो रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार, उपहासात्मक लेखक, भाजपचे माजी राज्यसभा खासदार अशा अनेक भूमिका त्यांनी बजावल्या होत्या. त्यांना गेल्या आठवड्यात छातीत दुखत असल्याने अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी सकाळी आलेल्या हदयविकाराच्या झटक्यातून ते सावरू शकले नाहीत. चो हे जयललिता यांचे अत्यंत भरवश्याचे सल्लागार आणि विश्वासून साथीदार म्हणून ओळखले जात. तुघलक या राजकीय नियतकालिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची धुराही त्यांनी सांभाळली होती. मोदी त्यांना ‘राजगुरु’ असे संबोधत. ऑगस्ट २०१५ साली जेव्हा रामास्वामी रुग्णालयात दाखल होते त्यावेळी जयललिता यांनी त्यांची भेट घेतली होती. दरम्यान, काल संध्याकाळी जयललिता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर तमिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.