आर्थिक लाभासाठी शस्त्रे निर्यात करण्याचा धोका
इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी गटाने यापूर्वी रासायनिक शस्त्रांचा वापर केला असून, लहान प्रमाणात अशी शस्त्रे तयार करण्याची त्यांची क्षमता आहे, असे सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांनी म्हटले आहे. आर्थिक फायद्यासाठी आयसिस या शस्त्रांची निर्यातही करू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आयसिसने युद्धभूमीवर रासायनिक युद्धसामुग्री वापरल्याच्या अनेक घटना आम्हाला माहीत आहेत, असे सीआयएचे संचालक जॉन ब्रेनन यांनी ‘सीबीएस न्यूज’ या दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. या मुलाखतीचे अंश गुरुवारी प्रक्षेपित करण्यात आले.
आयसिस ज्यांचा वापर करू शकते अशा रासायनिक पदार्थ आणि दारूगोळ्यांच्या व्यापाऱ्यांशी आयसिसचा संपर्क आहे, असे ब्रेनन यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सीबीएस न्यूजच्या म्हणण्यानुसार, क्लोरिन व मस्टर्ड गॅस लहान प्रमाणात तयार करण्याची आयसिसची क्षमता आहे.
ही दहशतवादी संघटना आर्थिक लाभासाठी रासायनिक शस्त्रे पाश्चिमात्य देशांना निर्यात करू शकते, असा इशारा ब्रेनन यांनी दिला. यामुळेच या संघटनेने शस्त्रास्त्रांची वाहतूक आणि तस्करी यासाठी वापरलेले मार्ग तोडून टाकण्याची आवश्यकता आहे. आयसिसचा नि:पात करण्यात, तसेच सीरिया व इराकमध्ये त्यांच्याजवळ प्रत्यक्षात काय आहे हे तपासून पाहण्यात सीआयएचा सक्रिय सहभाग आहे असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
आयसिसने इराक व सीरियामध्ये रासायनिक शस्त्रे वापरली असल्याचे नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक जेम्स क्लॅपर यांनी गुप्तचर खात्याबाबतच्या सिनेट सिलेक्ट कमिटीला सांगितले होते.
या दोन्ही देशांना अजूनही रासायनिक शस्त्रांचा धोका आहे. सिरियाने रासायनिक शस्त्रविषयक परिषदेत भाग घेतल्यापासून त्या देशाने विरोधकांविरुद्ध अनेकदा ही शस्त्रे वापरली असल्याचे ते म्हणाले.
आयसिसनेही मनुष्याच्या अंगावर फोड आणणाऱ्या ‘सल्फर मस्टर्ड’सह इतर विषारी रसायनांचा वापर इराक व सीरिया या देशांमध्ये केला आहे. १९९५ साली जपानमध्ये ओम शिन्रिकोने सरिन वायू वापरल्यानंतर एखाद्या दहशतवादी गटाने प्रथमच रासायनिक शस्त्रे वापरली आहेत. रासायनिक युद्धात वापरला जाणाऱ्या ‘मस्टर्ड गॅस’मुळे उघडय़ा त्वचेवर तसेच फुफ्फुसांमध्ये फोड येऊ शकतात.