अमेरिकेत वृत्तसंकलनासाठी सीएनएनला ड्रोन विमानांचा प्रात्यक्षिक पातळीवर वापर करण्याची परवानगी हवाई वाहतूक नियंत्रकांनी दिली आहे, असे सांगण्यात आले. अजून त्याचा सरसकट वापर मात्र सुरू करण्यास संमती दिलेली नाही
ड्रोन विमानांचा वापर आतापर्यंत लष्करी कामासाठी केला जात होता, छोटय़ा विमानांचा वापर खासगी प्रतिमाचित्रणासाठी करण्यावर अमेरिकेत बंदी आहे. त्यासाठी विमानतळापासून १२२ मीटर किंवा ४०० फूट अंतराची मर्यादा आहे. सीएनएनचे उपाध्यक्ष डेव्हीड व्हिजिलांटे यांनी सांगितले, की उच्च तंत्राधिष्ठित व्हिडिओ पत्रकारितेसाठी ड्रोन विमानांना वार्ताकन व छायाचित्रणासाठी परवानगी दिली आहे. अ‍ॅटलांटाच्या जॉर्जिया टेक रीसर्च इन्स्टिटय़ूट मध्ये त्याची प्रात्यक्षिके करण्यात आली आहेत. सीएनएनचे मुख्यालय तेथे आहे.
 सीएनएनची मालकी टाइम वॉर्नरकडे आहे. निर्मनुष्य वार्तासंकलनासाठी ड्रोन विमानांचा वापर करता येणार आहेत, त्यामुळे वृत्तसंस्थांना मोठी संधी आहे, असे एफएएचे प्रशासक मायकेल ह्य़ुरेटा यांनी सांगितले.
 वार्ताकनासाठी ड्रोन विमानांचा वापर करण्यासाठी विधेयक मंजूर करावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. यामुळे संवेदनशील पत्रकारिता करता येईल व विकासाला हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे.