रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात आंदोलक विद्यार्थ्यांबरोबर उपोषणाला बसले आहेत. मात्र, राहुल गांधी यांची ही कृती म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपने केली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला राजकारणात कोणतेही स्थान उरले नसल्याने राहुल गांधी रोहित वेमुल्लाच्या आत्महत्येचे राजकारण करत आहेत. चेन्नईतदेखील आठवडाभरापूर्वी तीन मुलींनी आत्महत्या केल्या होत्या, मग राहुल गांधी तिकडे का गेले नाहीत?, असा सवाल तेलंगणा भाजपचे प्रवक्ते कृष्णा सागर राव यांनी विचारला. या माध्यमातून राहुल गांधी त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठीच ते हैदराबाद विद्यापीठात उपोषणाला बसले आहेत, असा आरोप कृष्णा सागर यांनी केला. राहुल गांधींनी यापूर्वी १८ जानेवारी रोजी रोहित वेमुल्लाच्या आत्महत्यनेतंतर हैदाराबाद विद्यापीठाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते.

दरम्यान, आपण आज रोहितचे कुटुंबिय आणि मित्रांच्या सांगण्यावरून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी याठिकाणी आल्याचा दावा राहुल यांनी केला आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, रोहितचे स्वप्न आणि आकांक्षांनी भरलेले तरूण जीवन अचानकपणे उद्ध्वस्त झाले. बंधने आणि अन्यायाच्या विळख्यातून मुक्त होऊ पाहणारा भारतातील प्रत्येक विद्यार्थी रोहित वेमुल्लाचे काहीतरी देणे लागतो, असे राहुल यांनी म्हटले.