केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज, बुधवारी झालेल्या बैठकीत जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १० पेक्षा अधिक जुन्या नोटा जवळ बाळगल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच काही ठराविक प्रकरणांमध्ये दंड भरण्याबरोबरच ४ वर्षांपर्यंत तुरुंगाची हवाही खावी लागणार आहे.
Government approves ordinance on deadline to deposit old notes: Sources
— ANI (@ANI) December 28, 2016
बँकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. नोटाबंदीच्या ५० दिवसांत आतापर्यंत बँकांमध्ये ९० टक्के म्हणजे १४ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. उर्वरित १० टक्के रक्कम अद्याप जमा होऊ शकलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत जुन्या नोटा बाळगण्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार १० पेक्षा अधिक नोटा जवळ बाळगल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या अध्यादेशानुसार ३० डिसेंबरनंतर १० पेक्षा अधिक जुन्या नोटा बाळगता येणार नाहीत.
चलनातून बाद केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा ३० डिसेंबरनंतर जवळ बाळगल्यास जबर दंड बसणार आहे. तसा अध्यादेश केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जारी करण्यात आला. जुन्या नोटा जमा करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. ते अद्याप बँकेत जमा झालेले नाहीत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुन्या नोटा बाळगण्यासंदर्भात जारी केलेल्या अध्यादेशानुसार, आता उर्वरित जुन्या नोटा बँक क्षेत्रात परत येतील. त्याची आगामी २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचा ताळमेळ बसवण्यासाठी मदतच होणार आहे, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत आरबीआयच्या ठराविकच कार्यालयांमध्ये जुन्या नोटा जमा करता येणार आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, १० पेक्षा अधिक जुना नोटा आढळल्यास दंडात्मक कारवाईसह तुरुंगातही जावे लागण्याची शक्यता आहे. काही ठराविक प्रकरणात दंडाच्या कारवाईसह चार वर्षांपर्यंत तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बोगस नोटांच्या काळ्या धंद्यासह दहशतवाद्यांना होणाऱ्या पैशांचा पुरवठा रोखता यावा, यासाठी नोटाबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.