आपल्या जीभेवर नियंत्रण ठेवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार दिल्यानंतरही पक्षातील वाचाळ नेते आणि काही मंत्री त्यांचे ऐकण्यास तयार नाहीत. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हे नेते आणि मंत्री थेट पक्षालाच अडचणीत आणतात. असेच एक उदाहरण पुन्हा एकदा केंद्रीय महिला व बालकल्याण राज्यमंत्री कृष्णा राज यांच्या निमित्ताने पुढे आले.
नोटाबंदीच्या निमित्ताने संपूर्ण देशातील वातावरण सध्या तापले आहे. या मुद्द्यावरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच कृष्णा राज यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करून सरकारलाच अडचणीत आणले आहे. जे देशाला लुटत होते, त्यांचाच बॅंकेच्या रांगेत मृत्यू होत असल्याची वादग्रस्त टिप्पणी कृष्णा राज यांनी केली. ‘दैनिक भास्कर’ या हिंदी वृत्त संकेतस्थळांवर या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने काढलेल्या परिवर्तन यात्रेमध्ये कृष्णा राज सहभागी झाल्या होत्या. यावेळी बांदामध्ये त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, नोटाबंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर देशातील विविध जनधन खात्यांमध्ये जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेवर केंद्र सरकारचे लक्ष आहे. ज्यांनी आपला काळा पैसा या खात्यांमध्ये वळवला. त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर जे आतापर्यंत देशाला लुटत आले आहेत, त्यांच्याच रांगेत थांबल्यामुळे मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृष्णा राज यांनी परिवर्तन यात्रेमध्ये तेथील सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि प्रमुख विरोधक बहुजन समाज पक्षावरही यावेळी जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशमधील जनतेला आता मुलायम सिंह यादव यांची कोणतीही गरज नाही, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात ८ तारखेला ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. देशातील काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी आपण हे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण या निर्णयानंतर देशातील रोकड उपलब्धतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घसरले आहे. विविध बॅंकांबाहेर त्याचबरोबर एटीएम बाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे. सरकारने रोकड काढण्यावर निर्बंध घातलेले असल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. एकीकडे बॅंकांमध्ये आवश्यक रोकड उपलब्ध नाही, तर दुसरीकडे चलनात आणलेल्या २००० रुपयांच्या नव्या नोटामुळे सुट्ट्या पैशांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज रोखून धरले असून, हिवाळी अधिवेशनाचे संपूर्ण कामकाज यामुळे पाण्यात जाण्याची शक्यता आहे.