अमेरिका, ब्रिटन आणि भारताच्या गुप्तचर खात्यांकडे २६/११ च्या हल्ल्याविषयी माहिती येत होती. मात्र या तीनही यंत्रणांनी आपापसात समन्वय दाखवला नाही. अमेरिका आणि ब्रिटनने तर वारंवार हेडलीविषयी येणाऱ्या तक्रारींकडे आणि त्याच्या असंख्य इमेलकडे ढुंकूनही पाहिले नाही, असे एका अहवालात पुढे आले आहे.  
पाकिस्तानी- अमेरिकी नागरिक असलेल्या डेव्हिड हेडलीने मुंबई हल्ल्यापूर्वी आणि नंतरही लष्कर-ए-तोयबा आणि आयएसआयच्या सूत्रधारांशी ‘अतिशय संशयास्पद’ ई-मेल्सची देवाणघेवाण केली होती. अशा रीतीने हेडलीचा २६/११ च्या मुंबई हल्ल्यात सहभाग असल्याचे दर्शवणाऱ्या संदेशांची मालिकाच घडली होती, परंतु गुप्तचर संस्थांना त्याची माहिती मिळू शकली नाही, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या संशोधन अहवालात म्हटले आहे.
हेडली हा मुंबईवरील हल्ल्याचा कट रचणाऱ्यांपैकी एक आहे, याचा सुगावा अमेरिका, ब्रिटन किंवा भारतातील कुठल्याही गुप्तचर संस्थेला लागू शकला नाही, असे सांगणाऱ्या या अहवालाने न्यायालयाचा रेकॉर्ड आणि अमेरिकी दहशतवादविरोधी अधिकारी यांचा हवाला दिला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनएसए) यापैकी काही ई-मेल्स मिळवल्या, परंतु जुलै २००९ मध्ये एक कट रचल्याबाबत तो एफबीआयच्या तपासाचे लक्ष्य ठरला, तोपर्यंत त्याचा मुंबई हल्ल्याशी संबंध असल्याचे त्यांनाही लक्षात आले नाही. २००१ ते २००८ या कालावधीतील त्याच्या दहशतवादी कारवायांबाबत एफबीआयने किमान चार वेळा चौकशी केली होती. इतकेच नव्हे, तर हेडली मोरक्कन बायको फैझा औतुल्ला हिने डिसेंबर २००७ ते एप्रिल २००८ या कालावधीत तीन वेळा इस्लामाबादमधील अमेरिकी दूतावासात जाऊन हेडली हा भारतात मोहिमा चालवणारा दहशतवादी असल्याचे सांगितले होते, असा गौप्यस्फोटही अहवालाने केला आहे.
आधीचे हल्ले किरकोळ वाटावेत असा हल्ला..
पाश्चिमात्य देशांना लक्ष्य केल्यानंतर आयएसआय व लष्कर-ए-तोयबा या दोन्ही संघटना एकत्र आल्या. त्यानंतर पूर्वीचे हल्ले अगदी मामुली व किरकोळ स्वरूपाचे होते, याची झलक दाखवून देण्यासाठी मुंबई येथील २६/११ हल्ल्याचा कट या अतिरेकी संस्थांनी रचला होता.
२००८ मध्ये मुंबईत जो हल्ला झाला होता, त्या बाबत ‘इन २००८ मुंबई कीलिंग्ज, पाइल्स ऑफ स्पाय डेटा बट अ‍ॅन अनकम्प्लिटेड पझल’ हा चौकशी अहवाल न्यूयॉर्क टाइम्स व प्रो-पब्लिका, फ्रंटलाइन यांनी प्रसिद्ध केला आहे. लष्कर-ए-तोयबाचे पहिले लक्ष्य भारत व नंतर काश्मीर होते परंतु पुढे त्यांना पाश्चिमात्य देशात हल्ले करण्यात स्वारस्य वाटू लागले, असे त्यात म्हटले आहे.
लष्कर-ए-तोयबा व आयएसआय एकत्र आल्यानंतर पाश्चिमात्य देशात अल-काईदा शैलीच्या हल्ल्यांकडे  ते वळले. त्याचा परिणाम म्हणून आयएसआयचे काही अधिकारी व दहशतवादी प्रमुखांनी आपले ऐक्य दाखवण्यासाठी भारतात कमांडो स्टाइल हल्ला करण्याचा कट रचला. त्यातही अमेरिकी, ज्यू, ब्रिटिश नागरिक मारले जातील याची दक्षता घेतली. दरम्यान, हल्लेखोरांशी संवाद साधण्यासाठी पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाच्या सूत्रधारांनी इंटरनेट फोनची यंत्रणा विकत घेण्यासाठी या संघटनेचा तंत्रज्ञान प्रमुख झरार शाह याने स्वत:ला भारतीय उद्योजक असल्याचे भासवले होते.
संगणकावरील माहितीही बरेच काही सांगू शकते. विश्लेषण महत्त्वाचे असते तेच नव्हते अशी प्रतिक्रिया भारताचे माजी सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी दिली.