चीनचे मत

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याचा प्रश्न भारत आणि पाकिस्तानने थेट चर्चेद्वारे आणि गंभीर सल्लामसलत करून सोडवावा, असे चीनने म्हटले आहे. मसूद अझर परस्पर संबंधात नकारात्मक वातावरण तयार करीत असल्याने त्याच्यावर बंदी घालण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रसंघात केलेले प्रयत्न चीनने हाणून पाडले त्यानंतर चीनने वरील मत व्यक्त केले आहे.

मसूद अझरच्या प्रश्नाशी जे संबंधित आहेत त्यांनी थेट चर्चा करावी आणि त्या प्रश्नावर तोडगा काढावा, असे चीनचे परराष्ट्रमंत्रालय प्रवक्ते हुआ चुनिंग यांनी म्हटले आहे. अझरवर संयुक्त राष्ट्रसंघाने बंदी घालावी यासाठी भारत प्रयत्नशील होता मात्र अखेरच्या क्षणी चीनने त्यामध्ये खोडा घातला त्याबद्दल भारताने नाराजी व्यक्त केली आहे.भारताने या बाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर चीनच्या भूमिकेत बदल झाला आहे का, असे विचारले असता चुनिंग म्हणाले की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादविरोधी समितीच्या नियमांनुसार, संबंधित देशांनी थेट चर्चा करावी. या प्रश्नावर चीन पाकिस्तानच्या सातत्याने संपर्कात असल्याने हा प्रश्न लवकरच सुटेल, असा विश्वासही चीनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.